ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ, श्वेता बोलतेय. सॉरी, आत्ता घरी नाहीये. बीपच्या आवाजानंतर तुमचा मेसेज सोडा. थँक यू!’
‘कम ऑन यार! तुला माहितेय- मला या मशीनशी बोलायला नाही आवडत. कितीदा सांगितलं सेलफोन वापरत जा. बर्थडेला मी तुला सेलफोन गिफ्ट करतोय आणि तो तू वापरणारेस. ओके? नो मोर डिस्कशन! आणि हो, आज मी घरी लेट येईन. फायनल रीडिंग्ज घ्यायच्यात. बाय. लव यू!’
ीीी
ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ, श्वेता बोलतेय. सॉरी, आत्ता घरी नाहीये. बीपच्या आवाजानंतर तुमचा मेसेज सोडा. थॅंक यू!’
‘हॅल्लोऽऽऽऽ, एकदम एक्स्पेक्टेड रिझल्ट्स मिळालेत. एक बिग सरप्राइज आहे! आज रात्री सेलिब्रेट करूया! लवकर परत ये. मीपण पोहोचेन अध्र्या तासात घरी. ओके? लेट्स सेलिब्रेट युहूऽऽऽऽऽ!’
ीीी
ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ, श्वेता बोलतेय. सॉरी, आत्ता घरी नाहीये. बीपच्या आवाजानंतर तुमचा मेसेज सोडा. थॅंक यू!’
‘ए नको ना करूस असं! उचल ना फोन! का वागतेस अशी? मला माहितेय- तिथेच आहेस.. मुद्दाम उचलत नाहीयेस. का चिडलीयस? बोल ना नीट. माहितेय ना- तू नीट नाही बोललीस की माझा मूड पण बिघडतो मग सगळा. किती खूश होतो मगाशी माहितेय? डिमेंशन फोल्ड फायनली शोधून काढलाय मी. आता एका विश्वातून दुसऱ्या विश्वात जाणं शक्य होईल- माहितेय? प्लीज- फोन उचल ना..’
ीीी
ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ, श्वेता बोलतेय. सॉरी, आत्ता घरी नाहीये. बीपच्या आवाजानंतर तुमचा मेसेज सोडा. थँक यू!’
‘काय झालंय? तू का चिडलीयस इतकी? आय नो- मी तुझ्या आईशी नीट बोललो नाही काल. सॉरी खरंच! एकतर माझा मूड आधीच ठीक नव्हता; त्यात पुन्हा त्या असं टिप्पिकल बोलत होत्या ना! आय जस्ट हेट- व्हेन शी कॉल्स मी जावईबापू. मला एकदम गांधीजी झाल्यासारखं वाटतं. म्हणतात- नातवाचं तोंड कधी बघायला मिळणार? आई शपथ.. असलं डोकं सटकलं ना! आय मीन- सॉरी. तुझ्या आईची चूक नाही म्हणत मी; पण एकंदरीत आपली मागची जनरेशनच ना..! सगळे डोक्यात जातात. यांचं समाधान नेमकं कशात आहे तेच कळत नाही. शिक्षण झालं की नोकरी, नोकरी मिळाली की लग्न, लग्न झाल्यावर नातवंड.. यापलीकडे काही लाइफ आहे की नाही? मूल काय नुस्तं जन्माला घातलं म्हणजे झालं? त्याचं पुढे सगळं व्यवस्थित व्हायला नको? आपलं ठरलंय ना? सांग ना आईला नीट समजावून. एकतर इथे आपल्यालाच एकमेकांचं तोंड बघायला वेळ नाही; त्यात त्या बाळाचे हाल कशाला? आय नो- मी हेच नीट शब्दांत सांगायला हवं होतं. जरा जास्तच उर्मटपणे बोललो. आम रियली रियली सॉरी.’
ीीी
ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ, श्वेता बोलतेय. सॉरी, आत्ता घरी नाहीये. बीपच्या आवाजानंतर तुमचा मेसेज सोडा. थँक यू!’
‘रात्रीचे साडेअकरा वाजलेयत. मला माहितेय- तू बसलीयस तिथेच. कसला राग आलाय तुला एवढा? तो विशाल तुला काहीतरी सांगतो आणि तू त्यावर विश्वास ठेवतेस? ठीके. मी मान्य करतो- माझं स्नेहावर होतं प्रेम कॉलेजमध्ये असताना. मग त्यात गैर काय? पुढे काही नाही झालं.. मी सोडून दिला विषय. आता त्याच त्या जुन्या गोष्टी कशाला उगाळायच्या? आता इतक्या वर्षांनी ती अशी अचानक भेटल्यानंतर मला नेमकं कसं रिअ‍ॅक्ट व्हायचं, कळलंच नाही. मनात कुठेतरी तिच्याबद्दल काहीतरी वाटत असेल कदाचित अजून- म्हणून बोलत राहिलो तिच्याशी. पण याचा अर्थ असा नाही ना गं, की मी तुला फसवतोय. ती भूतकाळ आहे माझा. मी तो नाही बदलू शकत. मी काय करू आता त्याला? तूच सांग ना आता! तू भांड माझ्याशी. ओरड माझ्यावर. चीड खूप. रागाव हवं तेवढं. पण बोल ना- प्लीऽऽऽज! उचल ना फोन एकदाच. प्लीज, फक्त एकदाच!’
ीीी
ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ, श्वेता बोलतेय. सॉरी, आत्ता घरी नाहीये. बीपच्या आवाजानंतर तुमचा मेसेज सोडा. थँक यू!’
‘हॅलो, प्लीज फोन उचल ना गं! आय नो- मी तुला नेहमी डॉमिनेट करायला बघतो. माझ्या प्रायॉरिटीज् तुझ्या कामांपेक्षा जास्त इम्पॉर्टन्ट आहेत अशा आविर्भावात असतो. माझे विचार तुझ्यावर लादत असतो सारखे.. माहितेय मला. पण मी सुधारतोय ना आता हळूहळू? ऐकतोय की नाही मी तुझं हल्ली? कळतंय, माझं काय काय चुकतंय ते. एकटय़ानेच झालो गं मी लहानाचा मोठा. कुणी भावंडं पण नाहीत. माहितेय ना? सगळेच लाड करायचे माझे. मागितलेलं सगळं मिळायचं. सांगितलेलं सगळे ऐकायचे. कधीच कुठली गोष्ट शेअर करावी लागली नाही कुणासोबत. त्यामुळे खूप मनमानी करायचो पूर्वी.. हे जाणवतंय आता. तू खूप समजून घेतलंस मला नेहमी- आय नो! खूप सहन केलंस माझं मनमानी वागणं. पण कधीच उलटून बोलत नाहीस. कधी चिडली नाहीस. नेहमी शांतपणे सहन करतेस. नंतर कळतं- चूक माझीच होती; पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. मला कल्पना आहे- खूप चुका केल्यात मी. कुठलंही नातं दोन लोकांनी मिळून टिकवायचं असतं.. आपल्यात ते तू एकटी सांभाळत्येयस. खरंच, इथून पुढे मी नाही वागणार कधी असं. प्लीज, ऐक ना.. फोन उचल ना एकदाच- प्लीज!’
ीीी
ट्रिंग ट्रिंग..
‘हॅलोऽऽऽ’
‘..’
‘हॅलोऽऽऽ’
‘..’
‘कोण बोलतंय?’
‘श.. श्.. श्वेता?’
‘आ.. आकाश?’
‘कशी आहेस?’
‘..’
‘बोल ना.. प्लीज, तुझा आवाज ऐकायला मी.. मी.. किती कॉल केलेत.. माहितेय..?’
‘..’
‘बोल नाऽऽ तुला माहितेय, मी किती फिरलोय तुला शोधायला? रीडिंग्स परफेक्ट आलीयत. वी हॅव मेड इट! फायनली! वी हॅव डिस्कवर्ड डिमेंशन फोल्ड. कन्फ.. कन्फर्मड्!’
‘कुठून.. बोलतोयस.. तू?’
‘आत्ताच आलोय माहितेय इथे. थकलोय गं जाम तुला शोधून! तुला माहितेय- समांतर विश्वात उघडणारा दरवाजा सापडलाय. यू कॅन ट्रॅव्हल अक्रोस द युनिव्हर्स यार! आपण शोध लावलाय याचा. मी हेच सांगायला तुला कॉल केला, पण तू उचललाच नाहीस, माहितेय? मी वेडय़ासारखा शोधतोय तुला ते सांगायला तेव्हापासून. पण तू नव्हतीसच!’
‘म्हणजे? कुठे होते मी.. तेव्हा?’
‘नव्हतीसच गं तू! कुठेच नव्हतीस.. मी घरी परत आलो तुला सरप्राइज द्यायला त्या रात्री.. पण.. तू.. आलीच नाहीस माहितेय.. फक्त एक.. फोन आला.. तू.. हॉस्. हॉस्पिटलमध्ये असल्याचा. अ‍ॅक्.. सिडंट झालेला.. तुझा त्या रात्री.. मला सुचेचना काही.. माहितेय? त्यानंतर.. विश्वासच बसला नाही त्या गोष्टीवर. त्यानंतर काही दिवस असेच सुन्न बसून काढले. मग मग एक दिवस ठरवलं- या फोल्डमध्ये शिरायचं.. आणि पोहोचायचं- त्याच दिवशी.. त्याच वेळी.. पण दुसऱ्या विश्वातल्या.. आणि.. आणि फोन करायचा तुला.. तिथून. पण तू उचलायचीसच नाही तिथेही.. ‘मी बाहेर आहे..’ तोच मेसेज ऐकू यायचा- रात्री साडेअकरा वाजताही.. मग मी समजून जायचो.. की तू नाहीस त्या विश्वातही आता. पण मग त्रास व्हायचा खूप.. त्या गोष्टीचा.. मग बोलून टाकायचो जे मनात येईल ते.. तुला जे जे सांगायचं राहून गेलेलं ते सगळं तुझ्या त्या रेकॉर्डेड आवाजालाच सांगायचो.. मग परत शिरायचो या फोल्डमध्ये आणि निघून जायचो दुसऱ्या समांतर विश्वात- त्याच दिवशी, त्याच वेळेला.. तिथे पोहोचल्यावर पुन्हा कॉल करायचो तू उचलशील या अपेक्षेने.. पण.. तोच एक मेसेज ऐकू यायचा दरवेळी. असं वाटलं, की जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा ती सगळ्या समांतर विश्वातूनही निघून जाते कायमची कदाचित.. पण आज तू फोन उचललास.. मला यायचंय आता घरी.. खूप बोलायचंय तुझ्याशी.. मी..’
‘नको! तू.. जा परत. नको येऊस इथे! तू जा परत- जिथून आलायस तिथे.’
‘ए, नको ना बोलूस असं.. मी नेमक्या कुठल्या विश्वातून आलोय हे पुन्हा शोधून काढणं अशक्य आहे गं..’
‘तुला जावंच लागेल आकाश.. कारण.. या विश्वात तू नाहीयेस आता..’
प्रसन्न करंदीकर – Kprasanna.mangesh@gmail.com