ज्या काळात साहित्य व्यवहारात मासिकांना मध्यवर्ती स्थान होतं, त्या काळात साहित्यिकांबरोबरच काही संपादकांनाही तेवढीच प्रतिष्ठा प्राप्त झालेली होती. ‘सत्यकथा’चे संपादक राम पटवर्धन हे त्यांपैकी एक महत्त्वाचं नाव. मौज-सत्यकथाचे संपादक म्हणून श्री. पु. भागवत यांचं एक वलय होतंच. पण असं असूनही राम पटवर्धनांनी आपलं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. पटवर्धनांच्या निधनामुळे वाङ्मयीन नियतकालिकांच्या सुवर्णयुगातील अखेरचा दुवा आता निखळला आहे.
माझा पटवर्धनांशी परिचय होता तो मुख्यत: ‘सत्यकथे’च्या माध्यमातून. काही निमित्ताने त्यांच्या भेटी होत. चर्चा होई. बोलण्याच्या ओघात काही वाक्यं ते बोलून जात, ती अर्थपूर्ण असत. मी मौज परिवारातला लेखक नव्हतो. नाही म्हणायला माझं अनिल डांगे यांच्या कथेवरील एक टिपण ‘सत्यकथे’त पटवर्धनांनी प्रसिद्ध केलेलं होतं. त्यानंतर ब्रेख्तच्या नाटय़विचारावरचा एक लेख मी ‘सत्यकथे’साठी दिला होता. तो लेख समंजसपणे लिहिलेला आहे. पण तो आवर्जून छापावा असं वाटत नाही असं त्यांनी कळवलं होतं. नंतर प्रभाकर पाध्ये यांच्या ‘सौंदर्यानुभव’ पुस्तकावर एक लेख मी दिला होता. सौंदर्यशास्त्राच्या चर्चेत या लेखाच्या निमित्ताने डॉ. आनंद कुमारस्वामींना आणलं म्हणून त्यांनी तो लेख स्वीकारला, पण नंतर ‘सत्यकथा’च बंद पडलं! त्यामुळे मी तसं म्हटलं तर मौजच्या परिघावरचा किंवा परिघाबाहेरचा लेखक असं म्हणायला हरकत नाही.

१९८३ मध्ये साहित्य अकादमीतर्फे मुंबईत ग्रंथपरीक्षणावर एक शिबीर घेण्यात आलं होतं. विविध भाषांमधले वृत्तपत्रांमध्ये परीक्षणं लिहिणारे लेखक, मान्यवर लेखक आणि संपादक यात सहभागी झाले होते. राम पटवर्धन त्यासाठी तीनही दिवस हजर होते. मराठी वृत्तपत्रात येणारी दुय्यम दर्जाची परीक्षणं आणि प्रथितयश लेखकांची परीक्षणं लिहिण्यामधली उदासीनता याबद्दल पटवर्धन त्यांच्या खास शैलीत म्हणाले होते, ‘पुस्तक परीक्षण हा सध्या बटू किंवा वामनांचा प्रांत झालेला आहे!’ सत्यकथेच्या कार्यालयात गप्पांच्या ओघात ते अशीच मार्मिक टीकाटिप्पणी करीत. कविता साभार परत केल्यामुळे नाराज झालेला एक होतकरू कवी तक्रारीच्या सुरात त्यांना म्हणाला, ‘प्रथितयश कवींच्या सुमार कविता तुम्ही छापता. मग आमच्याही छापा की!’ त्यावर पटवर्धन म्हणाले, ‘तुम्ही त्यांच्यासारख्या आधी उत्तम कविता लिहून दाखवा. मग तुमच्याही सुमार कविता छापू.’ सुरुवातीला ‘सत्यकथे’वर संपादक म्हणून वि. पु. भागवतांचं नाव असायचं आणि कार्यकारी संपादक म्हणून राम पटवर्धनांचं. त्यावर एकाने भाबडेपणाने त्याचा अर्थ विचारला होता. त्यावर पटवर्धनांचं उत्तर होतं, ‘भरतानं रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य केलं तसं आहे ते.’ आम्ही सारं काम करतो, पण ते त्यांच्यासाठी आहे या भावनेने, असं त्यांना सुचवायचं होतं. पटवर्धनांना विष्णुपंतांबद्दल आदर होता. त्याबद्दल ते एकदा म्हणाले होते, ‘श्री. पुं.ना लेखकांच्या मनात आदराचं स्थान आहे ते योग्यच आहे, पण खरी व्हिजन कुणाला असेल तर ती विष्णुपंतांना होती.’ वि. पु. भागवतांबद्दल पटवर्धनांनी लिहिलं आहे की, विष्णुपंतांचा पिंड केवळ साहित्यापेक्षा मानवी जीवनाच्या अधिक विस्तृत आणि व्यापक अशा क्षेत्रांबद्दल आस्था बाळगणारा होता. ‘सत्यकथे’ने निव्वळ साहित्यावर भर न देता इतर कला, सामाजिक विचार यांनाही स्थान दिलं. त्याची सुरुवात विष्णुपंतांनी केली असली तरी पटवर्धनांनी आपल्या परीने तेच धोरण अवलंबलं.
‘सत्यकथे’चे तसं पाहिलं तर दोन कालखंड पडतात. अगदी सुरुवातीचा १९३३ ते १९४५ चा कालखंड सोडून दिला तर १९४५ ते १९६० पर्यंतचा पहिला आणि १९६० ते १९८६ पर्यंतचा दुसरा असे हे दोन कालखंड आहेत. त्यापैकी पहिल्या कालखंडात नवकथेचा सर्वाधिक प्रभाव होता आणि नवकवितेचाही. १९६० नंतरच्या काळात नवनवीन लेखक लिहू लागले आणि ‘सत्यकथे’मध्ये येणाऱ्या कथा-कवितांचं स्वरूपही बदललं. राम पटवर्धनांचा संपादक म्हणून ठसा उमटला तो या दुसऱ्या कालखंडात. जी. ए. कुलकर्णी यांची रूपककथा, ग्रेस यांची कविता; विलास सारंग, श्री. दा. पानवलकर, विद्याधर पुंडलिक, आशा बगे, गौरी देशपांडे, सानिया यांच्या कथा; दिलीप चित्रे, वसंत आबाजी डहाके, गुरुनाथ धुरी यांच्या कविता यांचा हा काळ होता. याशिवाय अनिल डांगे, रत्नाकर पटवर्धन यांसारखे फक्त ‘सत्यकथे’पुरतेच लिहिणारे काही लेखक होते. याव्यतिरिक्त संभाजी कदम, विश्वनाथ खैरे, गंगाधर पाटील, अशोक रानडे यांच्यासारखे वेगळ्या विषयांवर वैचारिक स्वरूपाचं लेखन करणारे लेखक होतेच. जया दडकर हे आणखी एक नाव. याच्या जोडीला र. कृ. जोशी यांच्यासारखे अक्षरकवितांचे प्रयोग करणारे होते ते वेगळेच. पटवर्धनांच्या ‘सत्यकथे’चं एकूण स्वरूप यावरून लक्षात यावं. अनिल अवचटांचं ललित लेखन आलं ते याच काळात. ‘सत्यकथे’वर टीका अधिक उघडपणे होऊ लागली. लघु अनियतकालिकांची चळवळ, दलित साहित्य यामुळे मराठी साहित्याच्या कक्षा विस्तारल्या आणि ‘सत्यकथा’ हे विशिष्ट जाणिवा जोपासणारं नियतकालिक राहिलं.
राम पटवर्धनांची संपादकीय कारकीर्द बघताना हे सारे संदर्भ लक्षात घ्यायला हवेत. चांगला संपादक हा नेहमी नवीन विषयांच्या आणि नवीन लेखकांच्या शोधात असतो. पटवर्धन नेहमीच अशा चांगल्या साहित्याच्या शोधात असत. बोलण्याच्या ओघात असा काही विषय आला तर ते त्या व्यक्तीला तसा लेख लिहून देण्यास सांगत. एखाद्या लेखकाने कथा पाठवली, त्यात काही विकासाच्या शक्यता दिसल्या तर लेखकाला सांगून त्याच्याकडून अधिक परिपूर्ण कशी होईल याची दक्षता घेत. न स्वीकारलेलं लेखन परत पाठवताना ते पत्रामध्ये अशा पद्धतीने कारणं देत की त्यामुळे लेखक दुखावला न जाता त्याची लेखनाची उमेद कायम राही. संपादक आणि लेखक यांच्या नात्यामध्ये एकमेकांबद्दलचा आदर आणि विश्वास असावा लागतो. तो एकदा प्रस्थापित झाला की लेखक एका अर्थानं संपादकासाठी, त्याची दाद मिळावी यासाठी लिहीत असतो. संपादकालाही नवनिर्मिती करणारी प्रतिभा असावी लागते. पटवर्धनांपाशी तशी प्रतिभा होती. ‘पाडस’ कादंबरीच्या भाषांतरातून जशी ती व्यक्त झाली तशीच त्यांनी जे लेखक भोवती जमवले, जुने लेखक सांभाळले, विविध लेखनप्रकारांना ‘सत्यकथे’मधून त्यांनी उत्तेजन दिलं. प्रसंगी होणाऱ्या टीकेचा धोकाही पत्करला. यातून जी साहित्यविषयक नवी जाणीव निर्माण झाली ती ‘सत्यकथे’पुरती मर्यादित नव्हती, तर एकूण मराठी साहित्यालाच समृद्ध करणारी होती. साहित्यातल्या प्रवाहांची चर्चा करताना साहित्यिकांची नावं घेतली जातात, पण राम पटवर्धनांसारख्या साक्षेपी संपादकांचं योगदानही तितकंच महत्त्वाचं असतं.

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
Nagpur MIDC police arrested the youth who molested the girl crime news
विवाहितेच्या अंगावर चिठ्ठी फेकली, पुढे झाले असे की…
election material making work increase due to parties splits
पक्षफुटींमुळे प्रचार साहित्याला ‘अच्छे दिन’; झेंडे, टोप्या, फेटे निर्मितीस सुरुवात, चिन्हे जास्त असल्याने कामात वाढ
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक