महाबळेश्वर येथे ७ नोव्हेंबर १९७० रोजी आयोजित केलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी
बॅ. नाथ पै यांनी केलेल्या भाषणाचा संपादित अंश

कविवर्य बोरकर, स्वागताध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, मराठी शारदेचे इथे उपस्थित असलेले उपासक आणि रसिक मित्रहो, मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्या सर्वश्रेष्ठ आणि प्रातिनिधिक अशा या संमेलनाचे उद्घाटन करण्याचे हे मौलिक भाग्य मला दिलंत त्याबद्दल परिषदेचा आणि आपणा सर्वाचा मी ऋणी आहे.
जो कलावंत असेल, साहित्यिक असेल, कवी असेल, प्रतिभाशाली असेल, त्याच्यासमोर एकच उदिष्ट सदैव असायला पाहिजे, मनुष्य-मानव! त्याची उंची कशी वाढवायची? त्याचं जीवन समृद्ध कसं करायचं? त्याच्या पाठीवरचं ओझं रतीभर का होईना कमी कसं करायचं, त्याच्या डोळ्यांतील अश्रू संपूर्ण पुसता आले नाहीत तरी एक आसू कसा पुसायचा ही ज्यांची वेदना असते, ही ज्यांची तळमळ असते, ही ज्यांची व्यथा असते, तो मनुष्य कधी शिल्पकार बनतो आणि मिश्चेल अंजलोच्या रूपानं पियेटा नावाचं अमर शिल्प त्या ठिकाणी उभं करतो. कधी बर्मिनीच्या रूपानं सौंदर्याचा साक्षात्कार घडवतो. कधी तो एलोऱ्याला येतो, कधी अजिंठय़ाला जातो, कधी एलिफंटाला जातो. त्यांचा वंश एक, त्यांची कुळी एक. त्यांचा रंग वेगळा होता, धर्म वेगळा होता, पंरतु मला असं सांगायचं आहे की, त्यांचा पिंड एक होता. त्यांची स्फूर्ती एक होती. त्यांचं ध्येयमंदिर एक होतं. त्यांना मिळणारी ही जी प्रेरणा होती ती एकच होती. खऱ्या कलेला, खऱ्या साहित्याला कालाचं बंधन नसतं. जुनी कला, नवी कला ही भाषा अपुरी आहे, अधुरी आहे, आणि उपरी पण आहे. काळाच्या सरळ, सलग, अखंड रेषेवर काल्पनिक छेद जो करत असतो, ते आम्ही मानव करत असतो, अन्यथा तिथं छेद नसतात. चांगल्या कलेला, साहित्याला, कुठंही काळाचं असं ठिगळ लावता येत नाही. लेबल लावता येत नाही. त्याला बंधन नसतं.
व्यक्तित्व ज्या वेळी या विश्व-अनुभवाशी समरस होतं, त्या वेळी महान कलाकृती साकार होत असते, जन्म घेत असते, उदयाला येत असते. हे लक्षात घेतल्यावर स्वत:च्या या मनोऱ्यात किती काळ कोंडून घ्यायचं, भोवतालची व्यथा, दु:ख आणि जखम केवढी मोठी आहे का, हा प्रश्न कलावंतांनी आणि साहित्यिकांनी स्वत:ला विचारला पाहिजे. आज देशामध्ये जी ध्येयहीनता आहे, सारी श्रद्धास्थानं आज कोलमडू लागली आहेत, आज तेजोभंग होऊ लागलेला आहे जनतेचा. कारण, यांचं तेज आज हरपू लागलं आहे. असं होत असताना साहित्यिकांनी काय करावं? तेजस्वी नेतृत्व आणि प्रतिभाशाली चारित्र्य ही एकाच जीवनाची दोन अंगं असतात. साहित्य दुबळं झालं, निश्चल झालं, रडकं झालं, तर नेतृत्व तेजस्वी, पराक्रमशाली, आकाशाला गवसणी घालणारं नसतं. आजच्या हिंदुस्थानात वाङ्मयाला आवाहन देणारं, आव्हान देणारं आणि काल्र्याला, अजिंठय़ाला, एलोराच्या लेण्याला शोभणाऱ्या, वाङ्मयीन लेणी निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. आणि यांचे पडसाद मराठी वाङ्मयात निघाले नाहीत, उठले नाहीत ही माझी वेदना आहे, हे माझं दु:ख आहे.
साहित्यिकांनो, तुम्ही तुमच्या हस्तिदंती मनोऱ्यात राहिलात आणि आम्ही आमच्या सत्तेच्या कैफात राहिलो तर कसं होईल! कारण तुमची जी साधनं आहेत, तुमची जी माध्यमं आहेत, ती आमच्या माध्यमापेक्षा फार श्रेष्ठ आहेत. म्हणून मी हे तुम्हाला सांगू इछितो. जे कालातीत आहे त्याचा वेध घेण्याची किमया साहित्यिकांमध्ये असते. तात्कालिकांत जे गुरफटलेलं असतं त्याला चिरंतन करण्याची जादू आणि सामथ्र्य तुमच्याकडे असतं. आमचं साधन असतं ते तुटपुंजं असतं. ते हातात आधी येत नाही, ते म्हणजे सत्ता. त्याच्यासाठी केवढी यातायात! आणि ती मिळाली तर सत्तेची छिन्नी हातात घेऊन राजकारणी आपल्या स्वप्नातील समाजपुरुषाची मूर्ती बनविण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु सत्तेचं हे असं दुर्दैव असतं की, तत्कालीन म्हणजे हातात असताना तिच्याइतकं प्रभावी काही नाही, आणि ती हातातून गेली की तिच्याइतकं दुबळं, कुचकामी काही नसतं. सत्तेची ही दुर्बलता असते. परंतु तुमच्या हातातील जी साधनं आहेत, जी माध्यमं आहेत ती मात्र चिरंजीव असतात.
जुन्याचा हव्यास धरणारा, जुन्यात जे चांगलं आहे ते प्राणपणानं जपणारा, विज्ञानानं उजळलेली नवी क्षितिजं काबीज करू पाहणारा, जन्मावर आधारलेला अन्याय आणि अज्ञानावर आधारलेल्या रूढी यांच्याविरुद्ध तुतारी फुंकणारा, आततायी राष्ट्रविघातक अशा प्रवृत्तींचा संहारक कर्दनकाळ, भारतीयत्वाचा जागता पहारेकरी आणि इतक्या प्रयत्नांनी हळूहळू अंकुर फुटलेल्या या राष्ट्रीयत्वाच्या वृक्षाचा हा पुजारी, असा महाराष्ट्र व्हायला हवा, असं मला वाटतं. ही प्रेरणा तुम्ही देऊ शकाल, ही स्फूर्ती तुमच्याकडून मिळू शकेल असं मराठी साहित्य हवं. हे झालं नाही, तर जी आम्हाला आमची दैवतं वाटत आहेत ती कोसळू लागतील, ती कोलमडू लागतील. हिंदुस्थानचं स्वातंत्र्य, हिंदुस्थानचं अखंडत्व जे काही शिल्लक असेल त्याचं अखंडत्व, हिंदुस्थानचं सार्वभौमत्व आणि हिंदुस्थानची लोकशाही ही सारीच कसोटीतून जात आहेत. त्यांच्या आव्हानांचा पडसाद मराठी साहित्यात हवा. याच्या संरक्षणाची प्रेरणा मिळेल असं साहित्य इथं व्हावं. ही प्रेरणा तुम्ही द्यावी, आणि त्याचे नम्र सेवक म्हणून काम करण्याची सुबुद्धी आम्हाला लाभावी, अशी प्रार्थना करून मी रजा घेतो.
(साधना प्रकाशन प्रकाशित, वासू देशपांडे संपादित ‘लोकशाहीची आराधना- बॅ. नाथ पै’ या पुस्तकातून साभार)
संकलन – शेखर जोशी

नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा मंडळ यांच्या सहकार्याने आणि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा होत आहे.