मध्यंतरी एका बातमीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते – अमेरिकेत एफबीआने सिल्क रोड नावाच्या वेबसाइटवर बंदी आणली होती. फ्लिपकार्ट.कॉमसारखे स्वरूप असणाऱ्या या वेबसाइटमध्ये फक्त एक समस्या होती- इथे निनावी विक्रेते काळ्या बाजारातील ड्रग्ज खुलेआम कोणालाही विकू शकत होते. दुसरी एक बातमी तर त्याहूनही धक्कादायक होती. या बातमीनुसार सिल्क रोडसारखीच एक वेबसाइट अस्तित्वात आहे. या दुसऱ्या वेबसाइटचा हेतू अगदी सरळ आहे- जगातल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या हत्यांची सुपारी द्यायची. म्हणजे एखाद्या माथेफिरूला एखाद्या नेत्याला टपकवायचे असेल तर एकदम सोपे- या वेबसाइटवर अकाऊंट तयार करून (अर्थातच खोटे), त्या नेत्याच्या हत्येसाठी किती रकमेची सुपारी द्यायची त्याची तयारी आहे हे प्रसिद्ध करायचे आणि हत्या झाल्यावर मारेकऱ्याने ओळख पटवून बक्षीस घेऊन जायचे. एकदम साधा-सोपा मामला! सुदैवाने या सुपाऱ्या अजून फळल्या नाहीत.
या दोन्ही वेबसाइटमध्ये एक कळीचे साम्य आहे ते म्हणजे त्यांची आíथक पद्धती. या दोन्ही वेबसाइटवर जे व्यवहार अपेक्षित होते ते कुठल्याही राष्ट्रीय चलनात होणार नव्हते. ते बिटकॉइनमध्ये होणार होते. किंबहुना बिटकॉइन अस्तित्वात असल्यामुळेच अशा वेबसाइट अस्तित्वात येऊ शकल्या. बिटकॉइनचे हे सगळेच प्रकरण तोंडात बोट घालायला लावणारे आहे.
बिटकॉइनचे व्यवहार
या आभासी चलनाची टांकसाळही आभासी आहे आणि ‘सातोशी नाकामोतो’च्या अल्गोरिदमवर आधारलेली आहे. या अल्गोरिदमनुसार सोने, पेट्रोल किंवा इतर मौल्यवान खनिजांप्रमाणे बिटकॉइन्सही काही मर्यादित संख्येतच तयार होतील. या अल्गोरिदमनुसार फक्त २ अब्ज १० कोटी बिटकॉइन्सच व्यवहारात येऊ शकतील. पूर्वीच्या नवे सोने शोधणाऱ्यांप्रमाणेच नव्या बिटकॉइन्स शोधणाऱ्यांना ‘माइनर्स’ म्हणतात. नव्या बिटकॉइन्स मिळवण्यासाठी प्रचंड गुंतागुंतीच्या आणि अत्यंत किचकट गणिताप्रमाणे असणाऱ्या बिटकॉइन अल्गोरिदमच्या भागांची उत्तरे शोधावी लागतात. एखादे उत्तर जेव्हा सापडते तेव्हा हा अल्गोरिदम नवीन बिटकॉइन्स त्या माइनरच्या खात्यात जमा करतो. नव्या बिटकॉइन्स मिळवण्यासाठी पहिली पायरी म्हणजे एक खाते असणे. या खात्यामधून बिटकॉइन्सची देवाणघेवाण होते. हे खाते तयार करण्यासाठी बिटकॉइनचे ओपन सोअर्स सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे लागते आणि ‘ब्लॉकचेन’ डाऊनलोड करावी लागते. ब्लॉकचेन म्हणजे ६-७ जीबी साइझ असलेली एक खातेवही. सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून ब्लॉकचेन डाऊनलोड केल्यावर माइनरला एक खातेक्रमांक मिळतो. नव्या मिळालेल्या बिटकॉइन्स या खात्यावर जमा होतात.
एखाद्या देशाच्या चलनाच्या पुरवठय़ावर शासनाचे आणि केंद्रीय बँकेचे पूर्ण नियंत्रण असते. त्यामानाने बिटकॉइनचा कारभार मात्र एकदम पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीचा आहे. यातील ब्लॉकचेन म्हणजे एक प्रचंड मोठी, सार्वजनिक खातेवही. जगात कुठेही होणारा बिटकॉइनचा प्रत्येक व्यवहार या खातेवहीत नोंदवला जातो. प्रत्येक माइनर सगळे व्यवहार बघू शकतो. नवीन तयार झालेल्या बिटकॉइन्सला या माइनर्सच्या कम्युनिटीची मान्यता लागते. ती मिळाल्यावरच अशा बिटकॉइन्स त्या माइनरच्या खात्यात जमा होतात.
नव्या बिटकॉइन मिळवणे हे मात्र सोपे काम नाही. बिटकॉइन अल्गोरिदमचे सोपे सोपे भाग याआधीच सोडवून झाले आहेत. त्यामुळे नव्या बिटकॉइन मिळवणे आता वरचेवर अधिकाधिक जिकिरीचे काम झाले आहे. बिटकॉइनचा अल्गोरिदमच असा आहे की नव्या बिटकॉइन तयार होण्याचे प्रमाण वरचेवर कमी होत जाईल. २ अब्ज १० कोटींचा आकडा गाठण्यासाठी २१४० साल उजाडेल. या सगळ्यात माइनरची स्वत:ची बुद्धी तर पणाला लागतेच, पण त्यासाठी कॉम्प्युटिंगची प्रचंड क्षमता असणारे कॉम्प्युटर्सही लागतात. यामुळे हे काम प्रचंड खर्चीकही आहे. काही माइनर्सनी त्यांच्या कॉम्प्युटर सव्र्हरमधून निघणाऱ्या प्रचंड उष्णतेवर नियंत्रण मिळण्यासाठी लागणारा खर्च कमी करण्यासाठी आइसलँडसारख्या आíक्टक देशांत तळ ठोकला आहे. बिटकॉइन मिळवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे तयार झालेल्या बिटकॉइन्स दुसऱ्याकडून विकत घेणे. आपल्या शेअर बाजाराप्रमाणे बिटकॉइनच्या खरेदी-विक्रीसाठी इंटरनेटवर अनेक बाजार आहेत. तिथे तुम्ही तुमच्या चलनात पसे देऊन बिटकॉइन विकत घेऊ शकता.
बिटकॉइनचे अर्थकारण
पूर्वी चलनाचे मूल्य त्या देशाकडील सोन्याच्या साठय़ावर ठरायचे. १९७१ नंतर मात्र चलनमूल्य पूर्णपणे बाजारात नियंत्रित होते. चलनाचे मूल्य मागणी-पुरवठय़ाच्या गणितावर, त्याचबरोबर त्या चलनावर असलेल्या विश्वासावर अवलंबून असते. बिटकॉइनला कुठल्याही देशाची किंवा बँकेची मान्यता नाही. एखाद्या देशाची पत ढासळल्यावर ज्याप्रमाणे तेथील चलनात प्रचंड चढउतार कमी कालावधीत होऊ शकतात तसे काहीसे बिटकॉईनचे आज आहे. आजच्या घडीला १ कोटी २१ लाख बिटकॉइन्स व्यवहारात आहेत. जानेवारी २०१३ मध्ये एका बिटकॉइनला १३ अमेरिकन डॉलरचा भाव होता. नोव्हेंबर २०१३ मध्ये एका दिवशी तो १२०० च्याही वर पोहोचला होता. सध्या तो ७०० अमेरिकन डॉलरच्या आसपास आहे. अशा उतारचढावांमुळे आणि त्यांच्या वापरावरील मर्यादांमुळे सट्टेबाजारासारखा गुंतवणुकीसाठी बिटकॉइन्सचा वापर सध्या जास्त होतो.
बिटकॉइनबद्दल विविध देशांच्या शासन आणि बँकांमध्ये संदिग्धताच जास्त आहे. बहुतेक देशांमध्ये यासंदर्भात ‘थांबा आणि वाट पाहा’चे धोरण आहे. बऱ्याच देशांनी बिटकॉइनला परकीय चलनाचा दर्जा देऊन तसे नियम राबवायला सुरुवात केली आहे. अमेरिकेने मात्र याबाबतीत पुढाकार घेत बिटकॉइनमधील व्यवहारांना कायदेशीर मान्यता देण्याकडे कल दाखवला आहे.
जगभरात अनेक हॉटेल्स, विमान कंपन्या आणि विद्यापीठांनी बिटकॉइन स्वीकारायला सुरुवात केली आहे.
भारतात बिटकॉइन
भारतात बिटकॉइन वापरणारे जवळपास ५० हजार लोक आहेत. मुंबईत दोन व्यापारी संस्थांनी (एक पिझ्झा रेस्टॉरंट आणि दुसरे सलून-स्पा) बिटकॉइन स्वीकारायला सुरुवात केली आहे. रिझव्र्ह बँकेने मात्र २४ डिसेंबरला एक पत्रक काढून जनतेला या बाबतीत सावधानतेचा इशारा दिला आहे. बिटकॉइनसंदर्भात अनेक कायदेशीर, आíथक आणि तांत्रिक धोके असल्यामुळे याचा वापर करू नये असा सल्ला रिझव्र्ह बँकेने दिला आहे. तरीही बिटकॉइनच्या वापरात येत्या काही वर्षांत भारत एक आघाडीचा देश असेल.
काय आहे बिटकॉइन?
बिटकॉइन हे एक आभासी चलन आहे. २००८ मध्ये ‘सातोशी नाकामोतो’ याने आपल्या शोधनिबंधात बिटकॉइनची संकल्पना आणि कार्यपद्धती सर्वप्रथम विशद केली. आता हा ‘सातोशी नाकामोतो’ कोण आहे- स्त्री की पुरुष किंवा एक व्यक्ती आहे की गट आहे- हे कुणालाच माहीत नाही. या शोधनिबंधात मांडलेल्या अल्गोरिदमवर सध्या बिटकॉइनचे सगळे काम चालते. आपल्याला माहीत असलेल्या पद्धतींपेक्षा अत्यंत वेगळी आणि क्रांतिकारक म्हणता येईल अशी ही पद्धत आहे.
या बिटकॉइनच्या ना नोटा आहेत ना नाणी. पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बिटकॉइनचे सगळे व्यवहार होतात. या बिटकॉइनवर कुठल्याही देशाच्या शासनाचे नियंत्रण नाही किंवा आजपर्यंत कोणत्याही देशाची त्याला मान्यताही नाही. वैचारिक देवाणघेवाण असो किंवा व्यापारउदीम असो- इंटरनेटमुळे राष्ट्रीय सीमांची बंधने आपल्या व्यवहारांवर दिवसेंदिवस कमी होत चालली आहेत. बिटकॉइन हे इंटरनेटच्या याच सुविधेवर आधारलेले आहे. इंटरनेट पायरसी ज्या संकेतांवर आधारलेली आहे तशाच संकेतांवर बिटकॉइनचे काम चालते.
संग्रहित लेख, दिनांक 29th Dec 2013 रोजी प्रकाशित
बिटकॉइनचे व्यवहार
मध्यंतरी एका बातमीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते - अमेरिकेत एफबीआने सिल्क रोड नावाच्या वेबसाइटवर बंदी आणली होती. फ्लिपकार्ट.कॉमसारखे

First published on: 29-12-2013 at 02:28 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bitcoin currency