घर शाळेत आणि शाळा घरात शिरली पाहिजे. आई-वडिलांनी शिक्षक आणि शिक्षकांनी आई-वडील बनलं पाहिजे, हा विनोबांचा शिक्षणविषयक विचार. शिक्षण अर्थपूर्ण व आनंददायी बनण्यासाठी हा विचार खूपच उपयुक्त ठरू शकतो. तो प्रत्यक्षात आणला ग्राममंगल संस्थेच्या पुण्यातील ‘लर्निग होम’ या शाळेने.

ग्राममंगल संस्थेने आदिवासी मुलांसाठी शाळा सुरू केली. आदिवासींच्याच विश्वातल्या गोष्टी वापरून तिथे शिक्षण दिले जाते. मग याच धर्तीवर पुण्यासारख्या महानगरात तणावमुक्त शाळा सुरू केली तर? या उद्देशाने आणि ‘रचनावाद’ हाच शाळेचा पाया हवा, असे ठरवून दहा वर्षांपूर्वी प्रा. रमेश पानसे यांनी या शाळेची स्थापना केली. ही शाळा नाही हेच त्याचे वेगळेपण आहे. घरी शिकण्याऐवजी विद्यार्थी येथे येतात. त्यामुळे शाळा नसलेली शाळा असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

कॉंक्रीट टू अ‍ॅबस्ट्रॅक्ट

रचनावाद सिद्धांतानुसार अध्ययन प्रक्रियेत ज्ञानाची आणि अर्थाची रचना विद्यार्थीच करतो. जगाच्या अनुभवातून आणि वातावरणाशी होणाऱ्या व्यवहारातून ज्ञान व्यक्ती आपल्या स्वतमध्ये रचते, असा विचार मांडलेला आहे. रचनावादाचा भर ज्ञान व कौशल्ये यांचे संश्लेषण व्यक्तीच्या अनुभवात होण्यावर येथे भर असतो. प्रत्येक मूल स्वतंत्र क्षमतेचे असते, ही संकल्पना लक्षात न घेता त्यांच्यावर लहानपणापासूनच अपेक्षांचे ओझे पालकांकडूनच न कळत लादले जाते. त्यामुळे सध्याच्या स्पर्धेत मुले उमलण्याऐवजी कोमेजून जात आहेत. हेच लक्षात घेऊन तणावमुक्त शिक्षणासाठी आणि ‘कॉंक्रीट टू अ‍ॅबस्ट्रॅक्ट’ याच दृष्टिकोनातून शाळेत मुलांना घडवले जाते.

स्वयंकृती, गटकृती आणि शिक्षककृती

या शाळेत वही, पेन, पुस्तक यात विद्यार्थ्यांना बंदिस्त केले जात नाही. त्यांच्या विचारांना दिशा मिळेल, त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करता येतील, अशी कामे दिली जातात. स्वयंकृती म्हणजे विद्यार्थी स्वतहून करू शकतील, अशी ही कामे करतात. गटकृतीमधून गटात मुलांना विविध कामे दिली जातात. त्यातून ते अनेक गोष्टी शिकतात.

प्रकल्पातून विषयांचे आकलन

शाळेत वर्षांतून तीन प्रकल्प राबविले जातात. यंदा दागिने, खेळ व वाहतूक हे तीन प्रकल्प आहेत. प्रत्येक प्रकल्पात एक विषय मध्यवर्ती असतो. त्याला जोडून विज्ञान, गणित, मराठी, इतिहास, भूगोल आदी सर्व विषय शिकवले जातात. उदा. खेळ. खेळ हा विषय घेतला तर एखाद्या खेळात किती खेळाडू असतात, त्या खेळाचा इतिहास, खेळात विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर या आनुषंगिक गोष्टीतून गणित, विज्ञान, इतिहास या विषयांचे आकलन करून दिले जाते.

पाठय़पुस्तक ध्येय नाही

या प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांच्या क्षमता जोखल्या जातात व प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी पाठय़पुस्तक आवश्यक वाटल्यास ते जरूर वापरले जाते. मात्र, पाठय़पुस्तक हे ध्येय नाही. परंतु, प्रकल्पांमधील सादरीकरणातून, विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना जोखले जाते. त्यात त्यांचे मूल्यांकन होत असते. वर्षअखेरीस अमूक क्षमता आत्मसात केल्या असतील की पातळी (इयत्ता) पूर्ण झाली असे मानले जाते. त्यामुळे शाळेचा निकाल किती टक्के लागला, असले प्रश्न या शाळेला गैरलागू ठरतात. शाळेचे यश हे निकालापेक्षा विद्यार्थी पुढे जाऊन काय करतात त्यावरच असते, अशी येथील शिक्षकांची धारणा आहे. मात्र, दहावी हाच आगामी शिक्षणाचा पाया आपल्याकडील विद्यमान शिक्षणव्यवस्थेत असल्याने विद्यार्थी दहावीची परीक्षा बाहेरून देतात. असे असले तरीही परीक्षेची सर्व तयारी शाळा करून घेते. यंदा भरत आणि अथर्व डोईफोडे या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत अनुक्रमे ९४ आणि ८६ टक्के गुण मिळाले.

बालचित्रा

तीन वर्षांपासून शाळेत दिवाळीत बालचित्रा नावाचा उपक्रम राबविला जात आहे. त्या अंतर्गत कच्च्या मालापासून शिक्षक, विद्यार्थी मिळून वस्तू तयार करतात. त्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री असते. यातून सर्जनशीलता, विक्रीचे शास्त्र व कला, नफा – तोटा आदी गोष्टी विद्यार्थ्यांना आत्मसात होतात. उपक्रमातून मिळालेल्या निधीतून पहिल्या वर्षी शाळेत टय़ूब, पंखे बसविण्यात आले तर दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांसाठी लोखंडी स्टूल घेतले. हे पैसे केवळ शाळेच्या पायाभूत सुविधांवरच खर्च केले जातात.

शाळेने मान्यता घेतलेली नाही

पाठय़पुस्तकानुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सक्ती, परीक्षा, इतर अनाठायी बंधने यामुळे ही शाळा कुठल्याही शिक्षण मंडळाशी संलग्न नाही. किंबहुना शिक्षणाचे स्वातंत्र्य हवे यामुळेच शाळेने हा मार्ग जाणीवपूर्वक जोपासला आहे. अर्थात याचा मुलांच्या विकासावर परिणाम झालेला नाही. शाळेत सध्या ८० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. प्रवेशासाठी इच्छुकांची संख्या वाढते आहे.शिक्षक म्हणजे आपल्याच कुटुंबातील एक भाग आहेत, असे वाटले पाहिजे याकरिता शिक्षकांना ताई-दादा म्हटले जाते. शाळेत अठरा शिक्षक असून त्यातील सोळा ताई आहेत. ज्यांना मुलांबरोबर काम करायला आवडते, असेच शिक्षक शाळेत शिकवण्यासाठी येतात. ते आपापल्या विषयात तज्ज्ञ आहेत. अशी आहे ही घरंदाज शाळा.

 

संकलन – रेश्मा शिवडेकर

reshma.murkar@expressindia.com

प्रथमेश गोडबोले