‘राजसंन्यास’ या नाटकातून छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी झाल्याचे सांगून ज्येष्ठ नाटककार आणि कवी राम गणेश गडकरी यांचा पुण्यातील संभाजी उद्यानातील पुतळा ‘संभाजी ब्रिगेड’च्या कार्यकर्त्यांनी हटवला आणि मुठा नदीपात्रात फेकून दिला, असे बातमीच्या स्वरूपाने समजते. पहिला मुद्दा असा आहे की, गडकरींचा पुतळा आत्ताच का हटवण्यात आला. कारण संभाजी उद्यानात २३ जानेवारी १९६२ रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते हा पुतळा बसविण्यात आला होता. तेव्हा याबाबत कोणत्याही पक्षाने वा राजकीय संघटनांनी विरोध दर्शविला नाही. कारण पुणे हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. तेव्हा या संघटनांना सांस्कृतिक वारसा जपायचा होता. आता मात्र सांस्कृतिक वारशाची पर्वा नाही. दुसरा मुद्दा असा की, ही घटना फक्त गडकरींच्या पुतळ्यापुरती मर्यादित नसून ती राजकीय आणि सामाजिकसुद्धा आहे. एकीकडे अशा प्रकारच्या संघटना अस्मितेची चिंगारी पेटवून तरुणांना भडकावून देतात, तर दुसरीकडे महापुरुषांना श्रद्धेच्या बाकावर नेऊन बसवतात. अशा कृत्यामुळे या संघटना चच्रेत तर येतात, शिवाय आम्ही कोणत्या टोकापर्यंत जाऊ शकतो, हेसुद्धा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या या महाराष्ट्रात अशा घटना घडणे योग्य नाही. कारण मागचा इतिहास उकरून काढून आम्ही आज काहीच साध्य करीत नाही. हा इतिहासही असा आहे ज्याला सतत पुराव्यांची गरज भासत असते. त्यामुळे एक साहित्यिक या नात्याने गडकरींनी जे लेखनस्वातंत्र्य घेऊन लिहिले ते त्या वेळच्या महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारलेदेखील; पण आता या श्रेय घेणाऱ्या संघटना ते स्वीकारायला तयार नाहीत. कारण भावनिक मुद्दा जागवून त्यांना आपले अस्तित्व राजकीय फायद्यासाठी टिकवून ठेवायचे आहे. पूर्वीच्या साहित्यिकांनी अर्थात गोिवदाग्रजांनी महापुरुषाला कसे बदनाम केले आणि आम्हीच या महापुरुषांचे कसे तारणहार आहोत, असे मृगजळ निर्माण करण्याचे काम या संघटना करीत आहेत. महापुरुष असो वा साहित्यिक, यांचे पुतळे उभे केले की अस्मितांची प्रतीके उभी राहतात. प्रत्येक पुतळ्याच्या पाश्र्वभूमीवर पक्षांची वा संघटनांची अस्मिता आणि इतरांची ईर्षां मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. कुणी ही अस्मिता पुतळा तोडूनमोडून दाखवतो, तर कुणी पुतळा तोडल्यावर आपली अस्मिता जागी करतो. आता गडकरींच्या बाबतीत असे झाले की, शिमगा गेला तरी कवित्व उरावे; अर्थात गडकरींना जाऊन आज किती तरी वर्षे लोटली; परंतु आताही त्यांचे साहित्य मराठी मनावर प्रेमाचा वर्षांव करीत आहे. अशा कारणांमुळे उलट त्यांच्या नाटकांबद्दल, कवितांबद्दल नव्या तरुण पिढीमध्ये उत्सुकता निर्माण होण्याची शक्यता आहे. जसे की त्यांच्या ‘पहिले चुंबन’ या कवितेबद्दल जास्त उत्सुकता वाटते आणि ती आहेसुद्धा.

आता तिसरा मुद्दा समोर येतो तो म्हणजे गडकरींच्या जातीचा. ते ज्या जातीत जन्मले त्यात त्यांचा काय दोष; पण त्यांनी ज्या जातीतून लिखाण केले, हा मात्र त्यांचा विरोधक दोष म्हणावा लागेल. आज बहुतांश साहित्यिकांची मांदियाळी जातीच्या जोरावर चालते, मग ती साहित्य संमेलने असो वा त्यांच्या साहित्यिकी निवडणुका. साहित्यिक ज्या जातीबद्दल गोड गाणे गाणार, किंबहुना ज्या जातीतल्या थोर व्यक्तीविषयी पोपटपंची घोकणार तो साहित्यिक त्या जातीचा तारणहार ठरतो; मात्र गडकरी येथे आपली जात सोडून अन्य जातीला मारणहार ठरत आहेत, असे या संघटनांना वाटायला लागले आहे. साहित्यिक माणूस ज्या जातीतून लिहितो आणि विशेषत: ज्या जातीबद्दल लिहितो त्या जातीसाठी अन् स्वत:साठी तो हिरो ठरतो; परंतु त्याने आपल्या जातीत राहून दुसऱ्या जातीबद्दल जरा काही वेगळे लिहिले तर तो अन्य जातींसाठी खलनायक ठरतो. आज याच जातीच्या कारणांमुळे कसदार नवोदित साहित्यिक फार कमी प्रमाणात उदयाला येतात. त्यांनी थोडे जरी वेगळ्या वळणाचे लिहिले तर ते एक तर जातीविरोधात होतात, नाही तर जातीला पूरक ठरतात. मग जातीच्या कचाटय़ात लिहिणारे साहित्यिक आमच्या महाराष्ट्राला हवे आहेत का? हाही जातीबाहेरचा प्रश्न आहे. मुळात प्रश्न असा आहे की, सध्या महाराष्ट्रात कोणता वैचारिक संघर्ष चालू आहे? कदाचित डावे विरुद्ध उजवे असाही संघर्ष असू शकतो. तेव्हा पुतळा वगैरे तोडणे हा एक दिखावा असू शकतो. यामागची नेमकी भूमिका कोणती, असेही प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि समजा, गडकरी संभाजी महाराजांच्या जातीचे असते, तर एवढा पुतळा तोडण्याची संधी या संघटनांना मिळाली नसती.

book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार

माणिकलाल जैस्वाल

(शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद)