दादर- शिवाजी पार्कचा परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी भारताच्या वास्तवाचे प्रतिनिधी ठरणाऱ्या माणसांनी फुलतो. विचारवंत नेत्याची स्मृती विचारांतून आणि अभ्यासातून जपणारे इथे येतात, परंतु गंडेदोऱ्यांचा धंदाही वाढू लागला आहे. सुसंघटित नेतृत्वाचे वैचारिक अधिष्ठान नसतानाच्या आजच्या काळात वैचारिक वारसा टिकवायचा की अस्मितावादच वाढवायचा, हा प्रश्नदेखील याच परिसरात ठायी-ठायी दिसतो, त्याचा हा मागोवा..
भारतीय समाजप्रबोधनाचा कळसाध्याय असलेले भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत दादरच्या शिवाजी पार्क येथे होणारी गर्दी मुंबईकरांना नवीन नाही. महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी ३ डिसेंबरपासूनच मुंबईत येतात. गेल्या ५६ वर्षांत गर्दीचा आकडा वाढतच आहे.
बाबासाहेब आंबेडकरांसारख्या ‘क्रियावान पंडिता’ने हजारो वर्षे अपमान व अन्याय सोसणाऱ्या लाखो गरीब व निरक्षर लोकांना स्वाभिमानाने जगण्यास तसेच अन्याय व अत्याचार यांच्याविरुद्ध लढण्यास शिकवले. डॉ. आंबेडकरांचा व त्यांच्या समृद्ध वैचारिक वारशाचा ‘प्रभाव’ गेल्या ५६ वर्षांत देशभरात वाढत आहे. त्याचेच एक चित्र म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाला, ‘चैत्यभूमी’ला अभिवादन करण्यासाठी येणारे लाखो अनुयायी.
या संख्यात्मक वाढीकडे ‘श्रद्धे’चा भाग म्हणून अथवा ‘विभूतीपूजे’चा भाग म्हणून ‘दुर्लक्ष’ करता येणार नाही.
इथे येणारे कोण आहेत? डॉ. आंबेडकरांच्या विचारांमधून नवचेतना, प्रेरणा घेऊन दलित, शोषित, कामगार, आदिवासी आदी व्यवस्थेशी संघर्षरत असणारे घटक प्रामुख्याने आहेत. एका महामानवाच्या ‘स्मृतिदिना’निमित्त स्वयंस्फूर्तीने लाखो लोक येतात. दादर स्थानकातील आंबेडकरी अनुयायांच्या गर्दीकडे पाहणाऱ्यांच्या मनात, एवढे लोक जमण्याइतके येथे काय असते, प्रश्नाने कुतूहल निर्माण होते. कुतूहल असणारे ‘खरं चित्र काय’ हे पाहण्यासाठी निदान शिवाजी पार्क परिसराकडे जातात तरी, पण या गर्दीकडे पाहून नाराजी व्यक्त करणारे, पूर्वग्रह मनात ठेवून हिणकस शेरेबाजी करण्यातच धन्यता मानतात. आंबेडकरी विचारांचा हा प्रभाव असू शकतो, हे त्यांच्या लक्षात येत नाही.
 ‘आंबेडकर इन हंगेरी,’ अशा शीर्षकाचा लेख काही वर्षांपूर्वी दक्षिणेतून निघणाऱ्या एका इंग्रजी दैनिकात आला होता. लेखाचे शीर्षक होते युरोप खंडात ‘रोमा’ (जे ‘जिप्सी’ म्हणूनही ओळखले जातात) ही एक भटकी जमात आहे. युरोप खंडात त्यांची संख्या दखल घेण्याजोगी आहे व आजही भटके ‘जिप्सी’ नागरी हक्कांपासून वंचित आहेत. दैनंदिन जीवनात त्यांना भेदभावाला सामोरे जावे लागते. हंगेरीमध्ये ते एकूण लोकसंख्येच्या सात टक्के आहेत. हंगेरीतील रोमा समाजातील ऊी१ष्टि‘ ळ्रु१ आणि ड१२द्म्२ खष्टल्ल२ या स्थानिक सुशिक्षित नेतृत्वाने २००७ सालापासून डॉ. आंबेडकरांना प्रेरणास्थान मानून संघटना बांधली आहे व या दबाव गटाच्या साहाय्याने ते तेथील सरकारशी रोमांच्या न्याय्य हक्कांसाठी झगडत आहेत. त्यांच्या संघटनेने जिप्सींच्या मुला-मुलींसाठी हंगेरीत डॉ. आंबेडकरांच्या नावाने तीन शाळा सुरू केल्या आहेत. जिथे कुठे अन्यायग्रस्त, वंचित आहेत, त्यांच्यासाठी डॉ. आबेडकरांचा वैचारिक प्रभाव व जीवनकार्य किती प्रेरणादायी आहे याचे हे उदाहरण अर्थातच एकमेव नाही.
डॉ. आंबेडकरांवर अनुयायांचे उत्कट प्रेम, निष्ठा की, जी त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या पाच  दशकांनंतरही कायम आहे, त्या गर्दीला ‘जत्रेचे स्वरूप आणू नका’ याचे भान देणारे कार्यकर्तेही गेल्या काही वर्षांत तयार झाले आहेत. केवळ त्यांचे प्रयत्न पुरेसे नाहीत, असे दिसते. त्यामुळे या परिसरात वाटेलतिथे होणाऱ्या जेवण-वाटपाच्या कार्यक्रमांवर यंदा बंदी घालण्यात आली आहे. हे उपायही आवश्यक आहेत.  
हे नाकारण्यात अर्थ नाही की, एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर जमणारा जनसमुदाय काबूत ठेवणे सोपे काम नाही. त्यामुळे स्थानिकांची ‘गैरसोय’ होत असेल. काही स्थानिक रहिवासी इथे जमणाऱ्या जनतेकडे पाहून नाके मुरडत असले तरी अनेक पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनामुळे, बौद्धजन पंचायत समिती, समता सैनिक दला आदींच्या  कामामुळे अप्रिय घटना घडत नाही. शिवाजी पार्कमधील अनेक रहिवासीदेखील या शिस्तीची दखल घेतात. इथे जमणारी गर्दी ही ‘वास्तव भारताचे प्रातिनिधिक रूप’ आहे, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. चैत्यभूमीच्या परिसरात जमलेल्या जनसागरामध्ये कायम त्या-त्या वेळच्या सामाजिक, राजकीय विचारांचे प्रतिबिंब पडलेले जाणवते. विविध पुरोगामी संघटनांतर्फे केली जाणारी पथनाटय़े, कविसंमेलने, पत्रके आदींमधून याचे प्रतिबिंब शिवाजी पार्कवर ठायी ठायी उमटत असते.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, डॉ. आंबेडकरांच्या किंवा आंबेडकरी चळवळीला नव्या दिशा देणाऱ्या, प्रबोधन परंपरेचा वारसा सांगणाऱ्या पुस्तकांची विक्री. बाबासाहेबांना आदरांजली वाहून परत जाताना या ठिकाणी आलेले अनुयायी एक तरी पुस्तक येथून घेऊन जातात. केबळ डॉ. आंबेडकर नव्हे, प्रबोधनकार ठाकरे, राहुल सांकृत्यायन ते आ. ह. साळुंखे यांच्या पुस्तकांना एकाच दिवशी सर्वाधिक मागणी असण्याचा प्रसंग हाच असतो.शिवाजी पार्कमध्ये शेकडो लहान वा मोठय़ा, नामांकित वा नव्या प्रकाशन संस्थांचे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतील पुस्तकांचे स्टॉल असतात. ५ आणि ६ डिसेंबर या दोन दिवसांत दर वर्षी येथे किमान एक कोटीची पुस्तकविक्री होते.
महापरिनिर्वाणदिनी शिवाजी पार्कवर समतेचे अखंड गोडवे गायले जात असताना; महापरिनिर्वाण दिनाच्या ‘गांभीर्या’ला तडा जाईल अशा काही घटना घडत असतील तर त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. वैचारिक  पुस्तकांची जशी विक्री होते, तसेच डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित गाण्यांच्या सीडी, व्हीसीडी यांचीही मोठय़ा प्रमाणात विक्री होते. पण आपला व्यवसाय करण्याच्या नादात हे सीडी विक्रेते सातत्याने गाणी वाजवून शांततेचा भंग करतात. अगोदरच शिवाजी पार्क ‘शांतता क्षेत्र’ म्हणून उच्च न्यायालयाने घोषित केले आहे. प्रजासत्ताक दिनाचं शासकीय संचलन व महापरिनिर्वाण दिन यांना ‘विशेष बाब’ म्हणून उच्च न्यायालयाने यातून वगळले आहे. पण हे सीडी विक्रेते निव्वळ व्यावसायिक चढाओढीपायी महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य धोक्यात आणतात.
शिवाजी पार्कात जमलेल्या आंबेडकरी अनुयायांवर आकाशातून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्याचा प्रकार गेल्या चार-पाच वर्षांत सुरू झाला आहे. चैत्यभूमीच्या स्तूपावर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य म्हणून पुष्पवृष्टी एकवेळ समजू शकतो. पण शिवाजी पार्कात जमलेल्या आंबेडकरी अनुयायांवर पुष्पवृष्टी करून कोणाला ‘देवत्व’ दिले जाते  हे समजण्यास मार्ग नाही. मनगटाभोवती पांढरे धागे (गंडय़ासारखे) गुंडाळणे, पांढऱ्या माळा घालून हिंडणे या प्रकारांतून  आपण आपल्याच नेत्याचे दैवतीकरण तर करत नाही ना, कपाळाला ठळक निळ्या रंगाचा टिळा लावून आपण नवा ‘पंथ’ निर्माण करत नाही ना याचे भान सुटू लागलेले दिसते. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी ओळख झालेले कुणीही त्यांना असे गळ्यात अडकविणार नाहीत, याचा पोचही सुटलेला दिसतो, याचा विचार केला पाहिजे.
‘सहा डिसेंबरला शासनाने ‘ड्राय डे’ घोषित करावा.’ ही ‘भक्तिभावाच्या’ सुरात केली जाणारी मागणी म्हणजे असाच एक हास्यास्पद प्रकार. पंचशील व बावीस प्रतिज्ञांचे पालन करणारा बाबासाहेब आंबेडकरांचा निष्ठावान अनुयायी वर्षांतील ३६५ दिवस स्वत:हून ‘ड्राय डे’ पाळेल, त्यासाठी वेगळ्या एक दिवसाच्या ड्राय डेची मागणी कशाला हवी?
चैत्यभूमीवर येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांचे निरीक्षण केले तर एक गोष्ट आपल्या सहज लक्षात येईल की, ‘रिपब्लिकन’ नेते मिळतील त्या अधिकारपदासाठी तत्त्वशून्य तडजोडी करण्यात दंग असताना, डॉ. आंबेडकरांविषयी अपार आदर बाळगणाऱ्या खेडय़ापाडय़ातील लाखो गरीब अनुयायांची दु:स्थिती फारशी बदललेली नाही. ‘आंबेडकर’ या नावाभोवती असलेली ताकद आणि वलय यांतून  खेडय़ापाडय़ांतील डॉ. आंबेडकरांचे अनुयायी महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर स्वत:साठी एक ‘जागा शोधण्याचा’, स्वत:ची एक नवीन ओळख तयार करण्याचा प्रयत्न करतात. निळा रंग, पंचशील ध्वज, अशोकचक्र, गौतमबुद्ध, डॉ. आंबेडकरांच्या मूर्ती-प्रतिमा या प्रतीकांचा ते यासाठी आधार घेतात. यातून विभूतिपूजेचा नवा आविष्कार पाहायला मिळत असेल; पण यातून डॉ. आंबेडकरांच्या वैचारिक वारशाचा ऱ्हास होणार नाही ना हे पाहिले पाहिजे.
बॅ. एन. शिवराज बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहताना म्हणाले होते, ‘मृत आंबेडकर हे जिवंत आंबेडकरांपेक्षा अधिक प्रखर असतील.’ ((Dead Ambedkar is more dangerous than live one)) त्यामुळे सुशिक्षित आंबेडकरी अनुयायांची जबाबदारी अधिक आहे. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिलेल्या ‘सम्यक’ मार्गावरून चालणे अनुयायांची कसोटी पाहणारे आहे.