‘भू जल’ या सामुदायिक संसाधनाचा वापर विहिरी, झरे, किल्ल्यांवरील टाकी या आणि इतर माध्यमांतून पूर्वापार चालत आलेला आहे. पाणी उपसण्याची यांत्रिक साधने उपलब्ध नव्हती, तोपर्यंत विहिरीवर रहाट असत, दोर बांधून घागरीने पाणी काढले जाई. शेतीसाठी बैलांच्या मदतीने मोट आणि नंतर पर्शियन व्हील्सच्या साह्य़ाने पाणी काढण्यास सुरुवात झाली होती; पण अशी सर्व साधने आणि प्राण्यांची वापरण्यात येणारी शक्ती याला मर्यादा असल्यामुळे भूजलाचा उपसा सीमित होता. भूजलाचे नैसर्गिक पुनर्भरण त्यामानाने अधिक होत असल्याने त्याची पातळी संतुलित राहात होती.

परंतु पाण्याची वाढणारी मागणी पुरवण्यासाठी वेगवेगळे शोध लागण्यास सुरुवात झाली. पुढे सेंट्रिफ्युगल पंप आणि ऑइल इंजिनचा वापर होऊ  लागल्याने शेतीसाठीच्या पाणीउपशात वाढ होऊ  लागली. वाढत गेलेल्या विद्युतीकरणामुळे नंतर विजेच्या मोटारींचा वापर सुरू झाला. पाणीउपशामध्ये वाढ होऊ  लागली; पण तरीही सेंट्रिफ्युगल पंप स्वत:च्या जागेपासून केवळ ३० फुटांपर्यंतचेच पाणी खेचू शकत असल्याने खोलवरून पाणी काढण्यासाठी व्हर्टिकल टर्बाइन पंपाचे तंत्र विकसित झाले. त्यामुळे खोलवरचे भूजलसुद्धा इंजिन किंवा मोटर ठेवून उचलून घेता येऊ लागले. याच्या पुढचा शोध म्हणजे सबमर्सिबल पंपाचा. त्यात टर्बाइन आणि त्याला फिरवणारी विजेची मोटर ही दोन्ही पाइप्सला जोडून नलकूपात सोडण्याची सोय करणे शक्य झाले. या नव्या विकसित झालेल्या तंत्रज्ञानामुळे गेल्या ४०-४५ वर्षांमध्ये भूजल उपसा अनियमित प्रमाणात वाढतच राहिला. अशा तऱ्हेच्या प्रभावी तंत्रज्ञानाचा वापर करून, हवे तिथे बोअर घेऊन, मिळेल तेवढे पाणी उपसण्यावर काहीच र्निबध नसल्यामुळे नवनवीन समस्या उद्भवू लागल्या. प्रतिवर्षी विहिरींच्या पाण्याच्या पातळीत होणारी लक्षणीय घट लक्षात घेता सर्वानी मिळून ‘भूजल व्यवस्थापन’ करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. भूजलाचे व्यवस्थापन समजून घेण्याआधी निसर्गचक्रात भूजलाचा समतोल कसा राखला जातो ते थोडक्यात जाणून घेऊ या. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे, जलचक्रात होणाऱ्या बाष्पीभवन, उत्सर्जन, पाणी वाहून जाणे या सगळ्या क्रियांवर भूजलाचे पुनर्भरण अवलंबून असते. ते आपण छोटय़ाशा समीकरणातून समजून घेऊ या.

axis mutual fund, axis multicap fund
अशी होते म्युचुअल फंडाची ‘अल्फा’निर्मिती
Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
multi asset portfolio, investment, shares, stocks, mutual fund, commodity market, gold, expensive paintings, crypto currency, finance article
मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती

भूजलाचे पुनर्भरण = नैसर्गिक विरेचन + वा – भूजलसाठय़ातील बदल

याचा अर्थ भूजलाच्या माध्यमातून एकंदर बाहेर पडणारे पाणी हे जास्तीत जास्त भूजलधारकामध्ये पुनर्भरणामुळे येणाऱ्या पाण्याएवढेच असू शकते. जर पुनर्भरण जास्त आणि बाहेर जाणारे पाणी कमी असेल तर भूजलसाठय़ामध्ये वाढ (+) होते. याउलट, पुनर्भरण कमी आणि बाहेर जाणारे पाणी जास्त असेल तर भूजलसाठय़ामध्ये घट (-) होते. सहसा कमी-जास्त पर्जन्यमानानुसार, एखाद्या वर्षी भूजलसाठय़ामध्ये घट-वाढ असे होतच राहते; पण सलग दहा-वीस वर्षांचा कालावधी लक्षात घेतला तर अशी नैसर्गिक वाढ आणि घट एकमेकांना निष्प्रभ करून निसर्गाचा दीर्घ समतोल टिकून राहतो; पण काही कारणांमुळे भूजलसाठय़ामध्ये सतत वाढ होत राहिली तर पाण्याची पातळी जमिनीसमीप येऊन पाणथळ जमिनी तयार होतात आणि जर ओळीने अनेक वर्षे भूजलसाठय़ामध्ये घट होत राहिली तर भूजलाचा साठा कमी कमी होऊन संपून जातो. मागील काही काळापासून प्रतिवर्षी पाण्याचे साठे लवकर लवकर संपुष्टात येत आहेत. ही परिस्थिती बघता, ‘भूजल व्यवस्थापन’ करणे किती अपरिहार्य आहे हे आपल्या लक्षात आले असेलच.

भूजल व्यवस्थापन म्हणजे नेमके काय? तर, आपल्याला उपलब्ध असणाऱ्या भूजलाचा वापर, आपल्या गरजा म्हणजे ‘पेयजल’, ‘सिंचन’ जास्तीत जास्त उत्तमरीत्या भागवण्यासाठी अशा पद्धतीने करणे, की ज्यामुळे भूजलाच्या नैसर्गिक उपलब्धतेवर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होता ते आपल्याला प्रदीर्घ कालावधीसाठी वापरता येईल. भूजल व्यवस्थापनामध्ये उपलब्धतेचे नियोजन आणि मागणीचे नियंत्रण म्हणजेच ‘डिमांड-सप्लाय चेन’ यावर लक्ष देणे आवश्यक ठरते. ‘मागणीचे नियोजन सुनिश्चित करणे’ हा भूजल व्यवस्थापनाचा गाभा आहे.

कोणत्याही पाणलोट क्षेत्रात भूजल व्यवस्थापन करण्यासाठी सर्वप्रथम भूजलाचा ताळेबंद मांडण्यात येतो. भूजलाच्या ताळेबंदामुळे आपल्या पाणलोट क्षेत्रात असणारी भूजलाची उपलब्धतता आणि असणारी मागणी याचे आडाखे बांधण्यात मदत होते. नैसर्गिकरीत्या काही भागांतून जमिनीत पाणी अधिक प्रमाणात मुरते, तर काही भागांत इतर भागांतून पाणी अधिक येते. भूजलाचा ताळेबंद मांडताना, पावसाचे प्रमाण किती, किती पाणी वाहून गेले, कुठे आणि किती पाणी मुरले आणि पाण्याचा उपसा किती झाला, अशी माहिती प्रामुख्याने गोळा करावी लागते. ही मूलभूत माहिती गोळा करून भूजलाचा ताळेबंद शास्त्रीय पद्धतीने मांडता येतो. त्यामुळे चालू वर्षांत भूजलाचा वापर आणि विनियोग कसा करावा याचा अंदाज तज्ज्ञ मंडळी घेऊ  शकतात.

सामान्य माणसाला सहज लक्षात येईल असा सोपा पर्याय हा भूजलाची पातळी स्थिर आहे, वाढते आहे, की कमी होत चाललेली आहे, याचे निरीक्षण करणे होय. दिवसेंदिवस वा वर्षांनुवर्षे पाण्याची पातळी कमी होत असेल, तर भूजलाचा उपसा हा नैसर्गिक पुनर्भरणापेक्षा जास्त होत आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. भूजलाच्या परिस्थितीचे अनुमान त्याच्या पातळीवरूनच लक्षात येऊ  शकते; त्यामुळे ती पातळी वारंवार मोजणे याला खूप प्राधान्य आहे. पाणी ही एक सामुदायिक संपत्ती आहे. ती कृत्रिमरीत्या निर्माण करता येत नाही, हे लक्षात घेऊन लोकांनी भूजलाच्या व्यवस्थापनात सहभागी होणे अत्यावश्यक आहे.

अमृता कुलकर्णी-गुरव

ई-मेल : amruta.gurav@gmail.com

संपर्क :  ७४४७४३९९०१, ९९२२५५०००६