व्यासंगी पत्रकार, लोकसत्ताचे माजी संपादक व विचारवंत अरूण टिकेकर यांचे गेल्या आठवडय़ात निधन झाले. त्यांच्या भगिनी वसुधा पंडित यांनी पत्रस्वरूपात जागवलेल्या त्यांच्या आठवणी..
चिरंजीव अरूण, अनेक आशीर्वाद.
तुला पत्र लिहायची पहिलीच वेळ आणि सवयीने आशीर्वाद असं लिहिलं खरं. पण वयानं मोठी असले तरी तुझं मोठेपण मोजता येणारं का आहे? हे जरी खरं असलं तरी थोडंसं मोठेपण घेऊ दे ना मला!
लहानापासून तू सोलापुरात वाढलास. प्राथमिक शाळेत असताना तुझं क्रिकेटचं वेड जाणवत होतं. खेळायच्या आधीच तू बॉबी तल्यारखानची नक्कल हुबेहूब करायला लागला होतास. दिवाळी आणि उन्हाळ्याची सुट्टी लागताच तुम्ही भावंडं मुंबईला आमच्याकडे यायचात. त्या वेळी तुझ्या अनेक गुणांची चुणूक बघायला मिळायची. पण त्याही वेळी वाचनवेड आणि काकांच्या (माझे वडील श्रीपाद रामचंद्र टिकेकर- तुझे काका) प्रत्येक हालचालींकडे तुझं बारकाईने लक्ष ठेवणं, आमचा दिनक्रम पचनी पाडायचा उत्साह लक्षात येत असे. दादांनी हाक मारताच त्यांना हवी असलेली वस्तू तत्परतेनं धावत आणून द्यायची तुझी धडपड जाणत असे. तुझी शाळेची क्रिकेटची टीम तू इतक्या धडाडीनं जमवली होतीस की तू सगळं सोडून क्रिकेटियर होणार की काय? अशी काळजी वाटायला लागली होती. तुझ्या वडिलांना म्हणजे माझ्या काकांना (चिंतामण रामचंद्र टिकेकर) खरं म्हणजे ते स्वत: ‘दूत’ या नावानं फिरतं ग्रंथालय चालवत होते. म्हणजे पुस्तकांचा पसारा तू लहानपणापासूनच पाहत, वाचत वाढलास. हरीभाई देवकरण शाळेत तू तर हुशार, पहिल्या नंबरचा विद्यार्थी, सगळ्यांना गोळा करून मंडळ बनवणं, नवीन प्रघात तयार करणं हे तुझे पराक्रम सर्वाना दिसून आले होते. शिक्षकदिनी तुला प्रिन्सिपॉल निवडलं जायचं.
आणि शालेय शिक्षण संपल्यावर तू मुंबईला दादांच्या (काकांच्या) कडे पुढच्या शिक्षणासाठी येणार, हे ठरलेलंच होतं. तसा तू आलास आणि आपल्याला एकमेकांची ओळख जास्त व्हायला सवड मिळाली. मित्र जमवणं म्हणण्यापेक्षा ते तुझ्या त्याही वेळच्या गुणांमुळे तुझ्याभोवती आपोआप जमत आणि तुझं वैशिष्टय़ म्हणजे ते सगळे मित्र नाना कारणांमुळे कितीही दूर गेले तरी तुझ्या सहवासासाठी पुन्हा तुझ्याजवळ येत, आजतागायत विविध ठिकाणी, विविध कार्यालयांत गुंतलेले मित्र तुझ्या अतिजवळचेच राहिले आहेत. तुझं आणखी कौतुक म्हणजे तुझी काकू नोकरीसाठी घराबाहेर पडते तेव्हा घरात मित्र आणायचे नाहीत, हे धोरण तू पत्करलंस- कुठलंही वैषम्य न बाळगता हसतमुखानं. हे सगळं मला त्या त्या वेळी कळत होतंच; पण मी पण शिकत होते. मत व्यक्त करण्याएवढी मोठी, कर्तबगार नव्हते. तुला किंवा मला जाणवलेल्या भावना न बोलताही आपण समजून घेत होतो. आपण दोघंही आपापल्या कॉलेज अभ्यास, मित्रमंडळांत गुंगलो होतो. तू तर दिवसभर बाहेरच राहायचास. दादा तुला नाना गोष्टी सांगत. कुठे कुठे पाठवत. अभ्यास सांभाळून तू सगळं जमवत होतास. कॉलेज संपायच्या आधीच तू नाटक-सिनेमाची परीक्षणं लिहू लागला होतास. इंग्लिशमध्ये अ‍ॅटिकस आणि मराठीत नचिकेत म्हणून तू लिहायला लागला होतास. तुझं लिखाण तंतोतंत दादांसारखं व्हायला लागलं. शब्दांची जुळणी, विचार मांडायची पद्धत, हस्ताक्षर या सगळ्यांत तुझ्या मनावर, विचारांवर दादांचा ठसा स्पष्टपणे उमटू लागला होता.
एमएच्या अभ्यासासाठी डॉ. महिषींकडे दादांच्या सांगण्यावरूनच तू जायला लागलास. ते तुझे अभ्यासांतले गुरू! पण पुढे तू त्यांच्या गळ्यातला ताईत झाला होतास. माणसं जोडण्याच्या तुझ्या स्वभावामुळे तू अशा कित्येक थोरामोठय़ांना आपलंसं केलंस, करत आलायस. लाला लजपतराय कॉलेजात तू पहिली प्रोफेसरशिप केलीस. तिथे युवा संघटना तयार करून नवीन कलाकार तयार करायची संधी पुष्कळांना दिलीस.
त्याच सुमारास दादांनी (श्री. रा. टिकेकर) तुला इतिहास संशोधनाचं वेड लावलं. त्यांच्यासारखाच तूही भरमसाट वाचन करायला लागला होतास. कुठून कसे संदर्भ शोधावेत त्या धोरणानं सखोल आणि मार्मिक वाचन करायला लागलास. धनुर्धारी म्हणजे रामचंद्र विनायक टिकेकर हे आपले आजोबा. त्यांनी भाषांतरित केलेलं पुस्तक म्हणजे ‘वाईकर भटजी’ गोल्डस्मिथचं व्हिकार ऑफ वेकफिल्ड हे मूळ पुस्तक. पण ते भाषांतरित आहे हेच मुळात कुणाला समजलं नव्हतं. माझ्या लहानपणी ते तर शाळा- कॉलेजातनं अभ्यासाला होतं. तसंच त्यांचं दुसरं पुस्तक ‘पिराजी पाटील’ हे दुष्काळग्रस्त महाराष्ट्राचं वर्णन करणारं पुस्तकही अभ्यासाला होतं. हा धनुर्धारींचा वारसा दादांनी पुढे नेला आणि तो तू पुढे चालवलास. धनुर्धारींची तत्त्वनिष्ठा, सत्याची चाड आणि प्रखर नीतिमत्ता दादांनी स्वत: पाळून पत्रकार कसा असायला हवा, कुठून कशी चौफेर माहिती मिळवावी याचे धडे तुला दिले आणि तूही त्यांचं तंतोतंत पालन केलंस. त्यामुळे जाज्वल्य पत्रकारिता, प्रखर तत्त्वनिष्ठा आणि सत्याची कास हे पत्रकाराचे उत्तम गुण तुम्ही तिघांनी पत्करले होते. असे तुम्ही काका-पुतणे गाजलात आणि ठसा ठेवून गेलात.
हे सगळं आठवतंय. आता आताशा आपल्या लहानपण जागवणाऱ्या आठवणी काढून आपण फोनवर बोलून हसत होतो. पण आता ह्य़ासाठी तू कुठे उरलायस? सतत लोकांच्या गराडय़ात वावरायची सवय असलेला तू कुठे आणि कुणाशी गप्पा मारत असशील? माझ्यासारख्या बिनकामाच्या म्हातारीला टाकून कुठल्या देशात मुशाफिरी करायला गेलायस कुणालाही न सांगता, कळवता? हे पत्र तुला मिळाल्यावर लगेच उत्तर देशील ना?
तुझी बहीण,
वसुधा पंडित

DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !