भागवत धर्माची पताका खाद्यांवर घेऊन पंजाबपर्यंत आलेल्या संत नामदेवांच्या सातशे वर्षांपूर्वीच्या अर्थपूर्ण घटनेला पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा प्रयत्न  ‘घुमान’मध्ये वेगवेगळ्या निमित्ताने दिसून आला. महाराष्ट्र व पंजाब यांच्यातले सांस्कृतिक धागेही या वेळी उकलले गेले. ज्या गावी संत  नामदेवांनी आपला अंतिम श्वास घेतला त्या गावात निर्माण झालेले हे साहित्याचे वातावरण आपल्याला अक्षरश: भारावून टाकणारे आहे, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध पंजाबी लेखक पद्मश्री सुरजित पातर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. पातर हे देशभरातल्या प्रादेशिक भाषांमध्येही लोकप्रिय असलेले पंजाबी भाषेतील अत्यंत महत्त्वाचेvv07 कवी आहेत.
पातर हे  शुक्रवारी संमेलनस्थळी दिवसभर थांबले होते. सकाळी ध्वजारोहण समारंभात त्यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अत्यंत आवडीने त्यांनी मराठी पुस्तकांचीही खरेदी केली.
महाराष्ट्र आणि पंजाब यांचे अनोखे नाते आहे. हे पातर यांनी या वेळी स्पष्ट केले. संत नामदेव यांची पदे पंजाबी माणूस अत्यंत भक्तिभावाने गातो. हा वारसा केवळ संत साहित्यापुरताच नाही तर तो ‘भगतसिंग-राजगुरू’ यांच्या त्याग आणि बलिदानापर्यंत जाऊन पोहोचतो असेही ते म्हणाले. संत  नामदेवांनी आपले काम हे सर्वात आधी महत्त्वाचे आहे असे मानले.
‘सोने की सुई, रुपे का धागा
नामा का चित्त, हरी मे लागा’
या नामदेवांच्या रचनेचा संदर्भ  पातर यांनी दिला. विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेल्या संत नामदेवांनी शिवण्याचे जे काम केले ते केवळ वस्त्रापुरतेच मर्यादित नाही तर त्यांनी समाजालाच एका धाग्यात गुंफण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले.  पातर यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला आहे. ‘सरस्वती सन्मान’ या देशपातळीवरील महत्त्वाच्या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मराठीतील प्रसिद्ध कवी िवदा करंदीकर यांच्यासोबत आपल्याला कोलकात्याच्या भाषा परिषदेचा सन्मान मिळाल्याची नोंदही पातर यांनी सांगितली. मराठीतल्या अनेक महत्त्वाच्या कवींच्या कविता आपल्याला परिचित आहेत. हे सांगताना त्यांनी करंदीकरांसह नामदेव ढसाळ यांच्याही कवितेचा उल्लेख केला. मराठी व िहदीतील ज्येष्ठ कवी, समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी ‘कवितांतरण’ या संपादित ग्रंथात पातर यांच्या दहा कविता समाविष्ट केलेल्या आहेत. मराठी कविता सध्या अत्यंत महत्त्वाच्या वळणावर असून, मराठी साहित्याने नेहमीच प्रगल्भ अशी भूमिका घेतली आहे, असेही ते  म्हणाले. मराठीतल्या काही कवींशी आपली निखळ मत्री असून एका पुस्तकाच्या मलपृष्ठावर चंद्रकांत पाटील यांच्यासह आपला फोटो असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
पहिल्या दिवशी‘मराठी-पंजाबी’ या ऋणानुबंधाचा संमेलनात वारंवार उच्चार होत होता. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आपल्या भाषणात पंजाबची शेतीनिष्ठा आणि देशाच्या रक्षणासाठी बलिदान करण्याची वृत्ती या दोन्ही गुणांचे महाराष्ट्राशी साम्य असल्याचे सांगितले. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी ‘भगतसिंग-राजगुरू’ या संबंधाला उजाळा दिला. महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही प्रांतांत धर्म आणि राजकारण हातात हात घालून चालते. याचा उल्लेख  डॉ. सदानंद मोरे यांनी आवर्जून केला. महाराष्ट्र आणि पंजाबचे नाते हे असे संमेलनात दिवसभर कुठे ना कुठे उलगडत राहिले. शेवटी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी या संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि पंजाबचे जे नाते निर्माण झाले आहे ते पक्के नाते निर्माण झाले आहे. ते पुढेही चालू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्याचा परिणाम म्हणून आता पुढच्या वर्षी नागपुरात पंजाबी साहित्य अकादमी संमेलन भरवणार असून त्यासाठी नितीन गडकरी व शरद पवार यांनी तयारी दर्शविली आहे. म्हणजे सध्या घुमानमध्ये सुरू असलेला मराठीचा उत्सव हा जर पूर्वार्ध मानला तर पुढच्या वर्षी नागपुरात होणारा पंजाबीचा उत्सव हा उत्तरार्ध मानला पाहिजे. संत नामदेवांनी सातशे वर्षांपूर्वी ‘सोने की सुई, रुपे का धागा’ ही जी संकल्पना मांडली ती किमान भाषेपुरती का  होईना पण दोन प्रांतांना जोडण्याचे काम करू लागली.