विचारवंत, व्याख्याते व लेखक प्रा. नरहर कुरुंदकर यांचे ‘इसापनीती’ हे भाषण आणीबाणीच्या काळात खूप गाजले. या भाषणाचा हा संपादित अंश.

बंधुभगिनींनो, आजच्या व्याख्यानासाठी इसापनीती हा विषय मी मुद्दाम निवडलेला आहे. सध्या या देशात आणीबाणी चालू आहे. आणीबाणी चालू असल्यामुळे राजकारणावर शासनाची स्तुती करणे याखेरीज दुसरे काही बोलणे शक्य नाही. आपण शासनाची खरी-खोटी स्तुती करू शकतो. त्याला अजून मनाई नाही, कारण आजच्या राज्यकर्त्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच शासनाच्या अधिकृत vvभूमिकेला खरा अगर खोटा पाठिंबा कोणत्याही भाषेत देण्याची मोकळीक आपल्याला आहे. आता आणीबाणी म्हटल्यानंतर काही बंधने येणार हे स्वाभाविकच आहे. राजकीय प्रश्नावर शासनाच्या विरोधी आपण काही बोलायचे नाही हे एक असे सर्वानी पत्करलेले बंधन आहे. म्हणून मी असे ठरवले आहे की, आणीबाणी आहे तोपर्यंत राजकारणावर बोलायचेच नाही आणि वर्तमानकाळाविषयी कोणताही प्रश्न घेऊन आपण बोलू लागलो, की जवळून-दुरून राजकारणाला स्पर्श होतोच. राजकारण सर्वस्वी वज्र्य मानण्याच्या माझ्या इच्छेमुळे मी मुद्दाम इसापनीती हा विषय निवडलेला आहे. व्याख्यानाचा आजच्या राजकारणाशी काही संबंध नाही हे कृपा करून आपण लक्षात घ्यावे.
इसाप बोलतो प्राचीन ग्रीक लोकशाहीविषयी, त्या राजकारणाच्या संदर्भात; पण आपल्याला असे वाटते की, तो जणू आपल्याच राजकारणाविषयी बोलतोय. जुन्या ग्रीक राजकारणावर त्याने केलेली टीका आपल्याला आपल्याच राजकारणावरील टीका वाटण्याचा संभव आहे. म्हणून गैरसमज टाळण्यासाठी हे मुद्दाम सांगितले पाहिजे की, या व्याख्यानाचा संबंध परदेशाच्या भूतकाळाशी आहे, स्वदेशाच्या वर्तमान काळाशी नाही.
खरोखरच इसाप नावाचा कुणी माणूस होऊन गेला काय? नक्की सांगता येणार नाही. नानाविधvv01 कथा सांगणारा तो कल्पित वक्ता असेल. नाही तरी आपण अकबर-बिरबलाच्या कथा खूपच ऐकतो. सम्राटाची खुशामत करणे यातच ज्यांना आपल्या बुद्धीची इतिकर्तव्यता वाटते असे बिरबल दर पिढीत पाहायला सापडतातच. कालपरत्वे अधिराज्य गाजवण्याचे आणि खुशमस्कऱ्यांचेही प्रकार बदलतात. एकाने किंचाळावे, देशात सर्वाधिक लोकप्रिय कोण? उरलेल्या हुजऱ्यांनी सांगावे- आमचे साहेब! ही भाटांची मिथ्या स्तोत्रे शोधण्यासाठी जुन्या रजपूत काव्याची गरज नाही. आपली रोजची वर्तमानपत्रेसुद्धा पुरतात.
स्वातंत्र्य हे मूल्यच असे आहे, जे सहजगत्या मिळाले म्हणजे माणसे बेजबाबदारपणे उधळताना लाजत नाहीत आणि जेव्हा स्वातंत्र्य टिकविण्यासाठी किंमत मोजण्याची पाळी येते त्या वेळी राष्ट्राचे सर्व तप, मांगल्य आणि वैराग्य शत्रूंच्या हवाली करून माणसे चामडी वाचवण्याच्या उद्योगाला लागतात! सुरक्षिततेच्या मोहाने त्यांना असे वाटते की, आपण फक्त जिभाच कापून देत आहोत. आपण खूर आणि शेपूट चिकटवून घेत आहोत, हे माणसांना कळत नाही! माणसाची जात तप, वैराग्य विकते, तिथे इसाप म्हणजे नाइलाजाने पत्करलेला शहाणपणा. तो सोडायला तर माणसे उत्सुक असणारच. एका विशिष्ट ध्येयवादामुळे निर्माण झालेला शहाणपणा क्षणकाळ पराभूत झाल्यासारखा वाटतो; पण पराभव माणसांचा होतो, विचार तुरुंगातही मरत नाहीत.
इसापची एक कथा अशी आहे की, सापाचे पिल्लू सळसळत वाटेने चालले होते. त्या सापाच्या रस्त्यात एक कानस आडवी पडलेली होती. सापाचे पिल्लू त्या कानशीला म्हणाले, अगं, बाजूला सरक. हा रस्ता माझ्या वहिवाटीचा आहे; पण कानशीने काही उत्तर दिले नाही. साप म्हणाला, तुला कळत नाही काय? तू माझी वाट का अडवतेस? मला निष्कारण भांडण्याची इच्छा नाही. रस्ता माझा आहे. तू बाजूला सरक. तरीही कानस गप्प होती. तेव्हा सापाने कानशीला बाजूला सरक, नाही तर दंश करीन, अशी धमकी दिली. शेवटी साप कानशीवर चालून गेला आणि तो कानशीला चावू लागला. कानशीला चावे काढता काढता सापाचे दात पडले. या वेळेपर्यंत गप्प बसलेली कानस आता बोलकी झाली आणि म्हणाली, गडय़ा, ज्याच्याशी घासल्याने लोखंडी गजाचे तुकडे पडतात त्याच्याशी चावण्याचा खेळ करू नये. नाही तर आपले दात पडतात. पुढच्या आयुष्यात एवढा धडा जरी तुझ्या लक्षात राहिला तरी तुझे कल्याण होईल. इसापच्या समोर एखादा धटिंगण संसदेचा नेता होता काय? की त्याच्यासमोर नांगी टाकणे सर्वाना हिताचे वाटत होते.  बलवंतांच्याही काही दुबळ्या जागा असतात. आपल्या ताकदीच्या अहंतेमुळे काही खुळेपणा बलवंतांच्या ठिकाणीसुद्धा निर्माण होतो. त्याचा फायदा घेतला पाहिजे. या दृष्टीने विहिरीतल्या प्रतिबिंबाकडे सिंहाचे लक्ष वेधून सिंहाला विहिरीत उडी मारण्यास व अशा रीतीने आपला बचाव करून घेण्यास शिकणारा इसापचा ससा पाहण्याजोगा आहे. अन्याय करणाऱ्या धटिंगणासमोर पड खाऊन आपला जीव वाचवायचा हे इसाप सांगतोच, पण ते सांगण्याचा हेतू अन्याय सहन करणे हा नसतो, तर प्रतिकाराची रीत शोधून काढणे हा असतो, हेही लक्षात घ्यायला हवे.    
स्वातंत्र्य आपणच आपल्या ताकदीवर मिळवायचे असते, टिकवायचे असते. स्वातंत्र्याचे महत्त्व ज्यांना समजते आणि स्वातंत्र्यासाठी जगण्या-मरण्यास जे तयार असतात त्यांच्या हातापायांत असणाऱ्या बेडय़ा अलंकार ठरतात. एवढी आस्था नसणाऱ्यांना जे चांदीचे वाळे मिळतात त्यांच्या बेडय़ाच होत असतात. कोणत्याही समाजातील शहाण्या माणसांनी आपल्या शहाणपणाचा लाभ सत्तेला देण्यापूर्वी, खरे म्हणजे सर्व समाजाला, पण निदान स्वत:ला तरी स्वातंत्र्य मागून घेतले पाहिजे! स्वत:ला शहाणे म्हणवणाऱ्यांना एवढेही भान राहात नाही, हेच एक दुर्दैव आहे.
(जनबोध प्रकाशन प्रकाशित, नरहर कुरुंदकर यांच्या ‘छायाप्रकाश’ या पुस्तकावरून साभार)
संकलन – शेखर जोशी

ashok gehlot son vaibhav loksabha election
भाजपाने पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा तापवला, अशोक गहलोतांच्या कार्यकाळातील मुद्द्यामुळे सुपुत्र अडचणीत?
Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध

नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा मंडळ यांच्या सहकार्याने आणि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा होत आहे.