शाळा तीही विना दप्तराची? आश्चर्य वाटले? पण खरे आहे. कारण, इथली मुले टॅबलेटवर शिकतात. अभ्यासाकरिता टॅबलेटचा वापर करणारी ही देशातील पहिली शाळा आहे. शिरूरमधील ‘वाबळेवाडी जिल्हा परिषद’ शाळा. पण यापेक्षाही मोठी अशी या शाळेची ओळख आहे.. ती म्हणजे, हसत खेळत कृतीतून शिक्षण देणारी शाळा.
पुणे नगर रोडवरील शिक्रापूर गावापासून चार किलोमीटरचे अंतर पार केले की वाबळेवाडीची ही शाळा लागते. प्रत्येक मूल हे वेगळे आहे. त्यांना सरसकट एकाच पद्धतीने न शिकविता त्यांच्या कलेनुसार शिकवायचे, यावर पुणे जिल्ह्य़ातील या पहिल्या ‘आयएसओ’ प्रमाणपत्रधारक शाळेचा दृढ विश्वास. ‘शाळा’ गावाचे ज्ञान केंद्र बनावे, हे स्वप्न उराशी बाळगून दत्तात्रेय वारे, संध्या नाणेकर आणि एकनाथ खैरे हे शिक्षक नवोन्मेषाने शिकवीत असतात. या शिक्षकांच्या प्रयत्नांना पालक आणि ग्रामस्थांचे पाठबळ लाभल्याने शाळा नावारूपाला आली. म्हणूनच भारतातूनच नव्हे तर अमेरिका, सिंगापूर, जपान येथील शिक्षणतज्ज्ञ या शाळेला आवर्जून भेट देतात.
वाबळेवाडी, शिक्रापूर परिसरातील शेतकरी, स्थानिक व परराज्यातील कामगारांची मुले या शाळेत प्रामुख्याने येतात. साधारणपणे चार वर्षांपूर्वी या शाळेचा पट होता अवघ्या ३२ विद्यार्थ्यांचा. परंतु आज ९० विद्यार्थी येथे शिकत आहेत. यातील २५ ते ३० विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून येथे आले आहेत हे विशेष, तर ३० विद्यार्थ्यांना जागेअभावी शाळेत प्रवेश देता आला नाही.
दप्तरमुक्त शाळा
शाळेत दप्तर आणावे लागत नाही. प्रत्येकाला मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांचा जुना व नवा असे पुस्तकांचे दोन संच दिले जातात. त्यातील एक तो अभ्यासासाठी घरी ठेवतो आणि शाळेतला शाळेतच वापरून ठेवला जातो. त्यासाठी स्वतंत्र कपाट करण्यात आले आहे. पाटीचे महत्त्व अबाधित ठेवत शाळेने आवारात, खोल्यांमधील फरशीवर काळ्या रंगाच्या ५० पाटय़ा तयार केल्या आहेत. विद्यार्थी त्यावरच लिखाण करीत असतात. पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मशीन आहे. त्यामुळे पाण्याची बाटलीला सुट्टी. त्यामुळे मुले जेवणाचा डबाच काय तो घेऊन येतात.
पाठांतर, घोकंपट्टीला नाही थारा
शिकायचे ते कृतीतून, अनुभवातून. केवळ परीक्षेकरिता नाही तर आयुष्यभरासाठी. त्यामुळे, येथे प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार, गतीनुसार शिकता येते. वर्गाना वयाची, पटसंख्येची मर्यादा नाही. गणिताच्या प्रयोगशाळेत पहिलीच्या वर्गातील मुलांच्या गटात चौथीतील मुलगा प्रयोग करताना दिसतो किंवा एखाद्या पहिलीतील मुलगा चौथीच्या मुलांसोबत भाषिक खेळ खेळताना दिसतो. पाठांतराऐवजी पाढे, गणितातील क्रिया, इंग्रजी अथवा मराठी शब्दांची निर्मितीची रचना समजावून सांगितली जाते. अगदी खेळताखेळता गणितातील अवघड संकल्पना मुले आत्मसात करताना दिसतात. छोटय़ा काडय़ा, दगड, गोटय़ांचा वापर करून पाढय़ांची निर्मिती कशी होते हे तक्त्याद्वारे शिकविले जाते. पाढे आपोआप पाठ होऊन जातात. पहिलीतील मुलांना अंकगणिताची ओळख व्हावी म्हणून छोटे चेंडू, गोटय़ा अशा वस्तू दिल्या जातात. त्या मोजायच्या आणि फरशीवरील गोलात ती संख्या लिहायची किंवा गोलात लिहिलेल्या संख्येइतक्या वस्तू मोजायच्या. खेळातून आयत, चौरस, त्रिकोण, चौकोन या भूमितीय संकल्पनाही ठसविल्या जातात. यामुळेच अगदी २३ आकडय़ांच्या अंकसंख्येचीही मुले सहज मांडणी करू शकतात.
अंक अक्षर उद्यान
मुले खेळातून खूप काही शिकतात. विशेषत: गणित विषय खेळाच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने शिकता यावा, मराठी, इंग्रजी मुळाक्षरे यांचे ज्ञान व्हावे यासाठी ‘अंक अक्षर उद्यान’ करण्यात आले आहे. हिरवळीमध्ये फरश्या बसविण्यात आल्या असून त्यावर १ ते १००पर्यंतचे आकडे रंगविण्यात आले आहेत. मराठी व इंग्रजी मुळाक्षरेही त्यावर रंगविली आहेत. यावर खेळताखेळता मुले वजाबाक्या, बेरजा, गुणाकार, भागाकार करतात. अंकांचा तुलनात्मक अभ्यासही होतो, तर मुळाक्षरांपासून इंग्रजी-मराठी शब्द तयार होतो.
गणित-विज्ञान प्रयोगशाळा
केवळ शिक्षकांनी सांगितले म्हणून विद्यार्थ्यांनी त्यावर विश्वास का ठेवायचा? विद्यार्थ्यांना या प्रत्येकाचा पडताळा करून पाहता येणे गरजेचे आहे. स्वत प्रयत्न करून, विचार करून मूल जी गोष्ट शिकते ती त्याच्या आयुष्यभर स्मरणात राहते, असे इथले शिक्षक दत्तात्रय वारे गणित-विज्ञान प्रयोगशाळेच्या निर्मितीमागील भूमिका स्पष्ट करताना सांगतात. या प्रयोगशाळेत सापशिडीच्या आधारे गणित समजून घेतले जाते. मणी, गोटय़ा, नाणी, नोटांच्या मदतीने गणितातील बेरीज, वजाबाकी, गुणाकार मुले सहजपणे शिकतात. प्रयोगशाळेत अंकगणित ओळख तक्ता, तुलनात्मक संख्यांचा अभ्यास, संख्याविस्तार, भूमितीतील संकल्पना या विविध खेळाद्वारे, चित्राद्वारे आकर्षकरीत्या मांडल्या आहेत.
पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांना प्रयोगासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू येथे आहेत. सूर्यमाला, बायोगॅस, अपारंपरिक ऊर्जेसंदर्भातील माहिती व मॉडेल्स आहेत. त्याचा विज्ञानातील वेगवेगळ्या संकल्पना जाणून घेण्यास उपयोग होतो. यामुळे गणित-विज्ञानाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण न होईल तरच नवल.
दररोजच मूल्यमापन
मुले काय शिकली, विषय कितपत समजला आहे, हे पाहण्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कार्ड तयार करण्यात येते. या कार्डवरील प्रश्नांद्वारे विद्यार्थ्यांचे त्यांच्या नकळत मूल्यामापन केले जाते. या मूल्यमापनाची माहितीही ठेवली जाते.
कार्यानुभव व खेळाकडे विशेष लक्ष
अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमधील कलागुणांच्या विकासाकरिता स्वतंत्र कला विभाग शाळेत आहे. हस्तकला, चित्रकला, विणकाम, भरतकाम, मातीकाम, कागदी वस्तू बनविणे, कोलाज, मेहंदी, रांगोळी विद्यार्थी शिकतात. यामुळे मुलांना स्वनिर्मितीचा मोठा आनंद मिळतो. विशेष म्हणजे शाळेच्या एक पालक मीनाक्षी सोनकंटाळे या विनामूल्य शिकवून या विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत.
गोल्फवगळता इतर सर्व खेळाचे साहित्य शाळेत आहे. विद्यार्थ्यांना नेमबाजी शिकविता यावी यासाठी दत्तात्रय वारे यांनी स्वत: पुण्यात बालेवाडीला जाऊन याचे प्रशिक्षण घेतले. म्हणूनच शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर नेमबाजीच्या स्पध्रेकरिता निवड झाली आहे.
टॅबलेट संगणक प्रयोगशाळा
ज्ञानाला माहितीचे कोंदण मिळून विद्यार्थ्यांना अद्ययावत राहता यावे यासाठी शाळेत तब्बल ३० टॅबलेट पालकांनी व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शाळेत आणले आणि शाळेत टॅबलेट संगणक प्रयोगशाळा आकाराला आली. या टॅबलेट लॅबची पाहणी करून खुद्द संगणकतज्ज्ञ विजय भटकर यांनी शाळेच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. टॅबलेटमुळे मुलांना ई-लर्निगद्वारे शिकता येते. फनलर्निगचीही वेगवेगळी सॉफ्टवेअर्स टॅबमध्ये आहेत. शाळा परिसरात वायफाय सुविधा असल्याने विद्यार्थ्यांना विकिपीडिया, यूटय़ूबद्वारे विविध संकल्पना समजावून घेता येतात. यामुळे पहिली ते पाचवीतील ३२ विद्यार्थी सरकारची ‘एमएससीआयटी’ची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले.
लोकसहभागातून सौरऊर्जा
ग्रामीण भागात विजेचा लपंडाव पाजवीलाच पुजलेला. पण यावर मात करण्यासाठी पालक आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. शाळेला लागणारी वीज सौरऊर्जेद्वारे वापरली जाते. इतकेच नव्हे तर शाळेची विजेची गरज भागवून गावातील रस्त्यांनाही वीजपुरवठा केला जातो.
प्लॅस्टिक, चॉकलेट-गोळ्यामुक्त शाळा
शाळेत प्लॅस्टिकच्या वस्तू वापरल्या जात नाहीत. तसेच, चॉकलेट व गोळ्याही मुले आणत नाही. त्याऐवजी विद्यार्थ्यांच्या वाढदिवशी खारीक, खोबरे, शेंगदाणे वाटले जातात. मुले घरातले प्लॅस्टिक पहिल्या सोमवारी आणतात आणि शाळेतील एका खड्डय़ात टाकतात. प्लॅस्टिकचा पुनर्वापर करणारे लोक ते घेऊन जातात. कारण, शाळाच नव्हे, तर संपूर्ण गावच प्लॅस्टिकमुक्त करण्याचे शाळेचे स्वप्न आहे.
ज्ञानभाषा आणि संवादभाषा
विद्यार्थ्यांची ज्ञानभाषा ही त्यांची मातृभाषा असावी म्हणून मराठी व संवादाची भाषा म्हणून इंग्रजी, अशा दोन्ही भाषा शाळेत शिकविल्या जातात. इतर शिक्षकांप्रमाणे इथल्या शिक्षकांसमोरही अनंत अडचणी आहेत. पण, सतत नवोन्मेषाच्या शोधात असलेल्या शिक्षकांना अडचणी, मर्यादांचे रडगाणे गायला आवडत नाही. म्हणूनच या शाळेत पट्टी हातात घेऊन विद्यार्थ्यांना दरडावणारे शिक्षक दिसत नाहीत. मुलांनी शाळेत यावे, विविध प्रकारच्या कृतीद्वारे अनुभव घ्यावा, निरीक्षण करावे व शिकत जावे, अशी ही शाळा. मुलांना कृतीतून, प्रयत्नांतून, अनुभवातून स्वत:च्या शिक्षणाची दिशा शोधण्याची प्रेरणा देणारी ही शाळा लाखांत उठून दिसते ती त्यासाठीच!

संगणक प्रयोगशाळेची सुपारी फुटली
शाळेचे रंगरूप पालटण्यात पालकांचे व ग्रामस्थांचेही तितकेच सहकार्य लाभले आहे. त्यांनी आतापर्यंत सुमारे १७ लाख रुपये शाळेकरिता दिले आहेत. शाळेला टॅबलेट संगणकांची गरज आहे हे कळल्यानंतर त्या वर्षी तमाशासाठी देण्यात आलेली १.२० लाखांची सुपारी रद्द करून ती रक्कम शाळेला देण्यात आली.

Son Post Father marksheet
वडिल म्हणायचे, “पोरा परिक्षेत पास हो”, मुलानं वडिलांचीच दहावीची मार्कशीट केली व्हायरल; VIDEO पाहून व्हाल हसून लोटपोट
Funny Answer Sheets Viral
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांने सांगितला नवा उपाय; व्हायरल उत्तरपत्रिका वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात
Magnus Carlsen believes R Pragyanand is expected to perform well chess match
प्रज्ञानंदकडून चांगली कामगिरी अपेक्षित – कार्लसन
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?

सतीश पांडुरंग धुमाळ

संकलन : रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia.com