शेतकरी आत्महत्यांसाठी सिंचनाचा अभाव हे अनेक कारणांपैकी एक कारण. पश्चिम विदर्भात त्याची तीव्रता प्रकर्षांने जाणवते. अमरावती जिल्ह्य़ातील वरूड, मोर्शी हे तालुके संत्री बागांनी फुललेले, पण भूजलाच्या प्रचंड उपशामुळे ‘डार्क झोन’मध्ये गेलेले. लोकांना पाण्याचे महत्त्व कळले, पण तोवर मोठा उशीर होऊन गेला होता. गेल्या वर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पध्रेसाठी वरूड तालुक्याची निवड झाली. गावागावांमध्ये श्रमदानाची चळवळ उभी झाली. यंदाच्या दुसऱ्या पर्वात सुमारे ४० गावे स्पध्रेत मोठय़ा जोमाने उतरली आहेत. जलसंधारणाच्या या कामात लोकसहभागाची मोठी शक्ती दिसून आली आहे.

अमडापूरच्या सरपंच सारिका सोनारे सांगतात, ‘बदमाश लोकांचे गाव म्हणून आम्हाला हिणवले जात होते, पण आमच्या चांगल्या कामामुळे गाव प्रकाशझोतात आले पाहिजे, अशी आमची इच्छा होती. गावकऱ्यांचे, विशेषत: महिलांचे चांगले सहकार्य मिळाले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पध्रेच्या निमित्ताने गावात दररोज श्रमदानातून जलसंधारणाची कामे घेतली जात आहेत. दगडी बंधारे, वनतळे, शोषखड्डे अशी अनेक कामे एकाच वेळी सुरू आहेत. या कामांमधून आम्ही आमचे गाव बदमाश लोकांचे नाही, तर चांगल्या कामासाठी एकत्र येणाऱ्यांचे आहे, हे सिद्ध करून दाखवू.’

अपुऱ्या पाण्याच्या संकटावर पाणलोट व्यवस्थापनाच्या माध्यमातून मात करता येऊ शकते, हे ओळखून गावकरी आता एकत्रित होऊ लागले आहेत. जमिनीची धूप थांबवण्यासाठी, पावसाचे पाणी अडवून, जिरवून वर्षभर वापरण्यासाठी आपण काय करू शकतो, याविषयी गावा-गावांमध्ये मंथन सुरू झाले आहे. वरूड तालुक्यातील ४० आणि धारणी तालुक्यातील शंभरावर गावे या स्पध्रेत सहभागी झाली आहेत. अभिनेते भारत गणेशपुरे हे अमडापूर येथे श्रमदानासाठी आले होते. सारिका सोनारे सांगतात, ‘आमच्या परिसरातील सावंगा, टेंभुरखेडा, वाठोडा या गावांमध्ये स्पध्रेसाठी चांगले काम झाल्याचे आम्हाला समजले, तेव्हा आम्ही या गावांमध्ये जाऊन आलो. तेथूनच आम्हाला प्रेरणा मिळाली. या स्पध्रेत गावातील महिलांच्या बळावरच उडी घेतली. गेल्या चौदा दिवसांपासून दररोज गावातील ८० ते १०० लोक श्रमदान करतात.’

मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांना या गावकऱ्यांचे कौतुक आहे, ते सांगतात, ‘वृद्ध असो किंवा दहा-पंधरा वर्षांची मुले, गावासाठी आम्ही एकत्रितपणे काम करू शकतो, ही संघटनशक्ती अनेक गावांनी दाखवून दिली आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांपासून सर्व यंत्रणा सक्रियपणे गावकऱ्यांना मदत करीत आहे. तरुणांचा मोठा पुढाकार आहे. साखळी पद्धतीने वेगाने काम होते. आम्ही अवघ्या तीन तासांमध्ये दगडी बंधारा बांधला.’

या श्रमदानात गावातील अंगणवाडी सेविका इंदू देशमुखदेखील सहभागी झाल्या आहेत. सकाळी ७ ते ९ पर्यंत श्रमदान केल्यानंतर त्या अंगणवाडीत जातात. त्यांनी सांगितले, ‘गावात पाण्याची कमतरता आहेच. लोकांना पाण्याचे मोल कळले आहे. या कामांचा फायदा भविष्यात नक्कीच होणार आहे.’

गावातीलच वैशाली खानवी या विद्यार्थिनीनेही श्रमदान केले. नुकतीच तिने दहावीची परीक्षा दिली आहे. ती लोकसहभागाविषयी सांगते, ‘मुळात मला श्रमदानाची आवड आहे. गावासाठी आपण काही तरी करू शकतो, हे समाधान आहे. या भागात पाण्याची खूप गरज आहे. पाण्याची साठवणूक केली तर गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. गावातच भरपूर पाणी उपलब्ध होऊ शकेल.’

परिमल बेले हा दहा वर्षांचा मुलगा सांगतो, ‘श्रमदान करताना आनंद वाटतो आहे. उन्हाळ्याची सुटी निव्वळ खेळण्यात घालवण्यापेक्षा मातीकामासाठी मोठय़ांची मदत करण्याचे समाधान आहे.’

गावकऱ्यांनी आजवर डीप सीसीटी, गॅबियन, वनराई बंधारा, एलबीएस, शोषखड्डा हे प्रकार कधी ऐकलेही नव्हते. खोल खड्डय़ाच्या माध्यमातून जमिनीत पाणी मुरवणे, बांधाद्वारे जमिनीची धूप थांबवणे, छोटय़ा नाल्यावर दगडी बांध बांधणे अशी अनेक कामे प्रशिक्षण मिळालेल्या लोकांनी सुरू केली, तेव्हा गावकऱ्यांनी त्यांचा उत्साह वाढवला. अनेक स्वयंसेवी संस्थांनीदेखील या कामात पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षीच्या स्पध्रेत वरूड तालुक्यातील वाठोडा गावाला २० लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार मिळाला होता. आपणही पुरस्कारासाठी पात्र ठरायचे, या जिद्दीने अनेक गावे कामाला लागली आहेत. वाद आणि मतभेद कुठल्या कुटुंबात किंवा गावात नसतात, पण समस्यांवर मात करून, आपसातले मतभेद बाजूला करून, मनाचा मोठेपणा, सामंजस्य दाखवून गावकरी एकत्र येत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा कलंक मिटवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांपैकी एका इलाजाची ही सुरुवात आहे.

– मोहन अटाळकर

mohan.atalkar@expressindia.com