अमूर्त कलेचं समकालीन कलेत आज काय महत्त्व आहे? अमूर्तता ही मूर्ततेच्या पलीकडे घेऊन जाणारी असते, असं मानलं जातं. जाणिवेच्या आणि नेणिवेच्या पातळीवर ती तुम्हाला भेटत राहते. एक काळ असा होता जेव्हा आधुनिकता म्हणजे अमूर्तता असाही एक विचार पुढे आला. आधुनिकतेच्या अनुभवातून, माणसाच्या आतबाहेर चालू असलेल्या खळबळीतून कला विरूपतेकडे आणि कालांतराने अ-रूपाकडे वळली. पण १९६०- ७० मध्ये तिची मांडणी ‘शुद्ध’ रूपाकडे घेऊन जाणारी केवलाकारवादी कला अशा प्रकारे होऊ लागली. रूपवादी चिकित्साही त्या अनुषंगाने या मांडणीला पुढे घेऊन जाणारी होती. भारतीय आधुनिक कलेच्या बाबतीत बोलायचं झालं तर नसरीन मोहम्मदीसारख्या कलाकारांनी चित्रातल्या प्रतिमेबद्दल तत्त्वचिंतक प्रश्न उभे करत अमूर्ततेची कास धरली. एकीकडे, अमूर्त कलेनं त्या काळात कलाकारांच्या श्रद्धास्थानांना धक्का दिला असला तरी नंतर त्या अमूर्ततेभोवती गूढतेचं वलय निर्माण झालं.

लेखाच्या शीर्षकात एकप्रकारचा आंतर्वरिोध दिसेल. अमूर्ततेत ‘कथन’ असू शकत नाही आणि कथन हे ‘मूर्त’ रूपातच आपल्या समोर येत राहतं. चित्रकलेच्या बाबतीत वास्तववादी किंवा निसर्गवादी मांडणी ही कथन स्वरूपात येत राहते. कथनं ही मूर्त असतात, त्यांना आकार असतो, स्थळ काळ असतो, ती ठोस असतात. तथ्य असतात आणि त्यांची एकप्रकारे जुळणी केलेली असते.  त्यामुळे तसं बघायला गेलं तर ‘अमूर्त’ आणि ‘कथन’ या शब्दांतच मुळात विरोधाभास आहे. पण त्यापुढे जाऊन आत्ताच्या संदर्भात आपण अमूर्ततेकडे वेगळ्या नजरेतून आणि समजेतून पाहू शकतो. अमूर्ततेकडे महायुद्धाच्या काळात युरोपात आकाराला आलेली आणि विकसित झालेली केवळ एक शैली म्हणून आज पाहता येत नाही. अमूर्त असला तरी त्यात काही ना काही आकार असतो, घाट असतो, फॉर्म दिसतो. कलाविष्कारानुरूप आणि काळानुसार अमूर्ततेची व्याख्याही बदलते.

आजच्या संदर्भात कलाकारांच्या कलाकृती पाहताना लक्षात येतं की अमूर्ततेतून समकालीन जाणिवा आणि संवेदना व्यक्त होत राहतात. चित्राचा अवकाश व्यापून टाकणारे रंग, घाट आणि पोत याच आधुनिकतेतून आणि समकालीन दृश्यात्मकतेतून उमटलेले दिसतात. आर्ट स्कूलच्या वातावरणात असलेल्या अमूर्त चित्ररचनेच्या प्रभावातूनही ही भाषा घडत जाताना दिसते. यात केवलाकारवादी भूमिका असली तरी आजूबाजूच्या वस्तू, परिसर यांच्याशी नाळ जोडलेली दिसते. केवळ आध्यात्मिक किंवा नेणिवेच्या पातळीवर हा शोध राहात नाही. आजच्या काळात काही कलाकार ही कलाभाषा व्यक्त होण्याकरिता वापरतात. त्याचा घाट हा अमूर्त कला चळवळीच्या परंपरेतून आलेला दिसतो; पण तरी त्यांचं विषयांना भिडणं हे त्यांच्या भवतालातून घडणारं असतं. त्या त्या काळातले संदर्भ, तिथला इतिहास, वास्तव, नसíगक प्रक्रिया यातून ते घडतं आणि बदलत जातं. त्यामुळेच त्या अमूर्त कलाकृती आपल्या काळाची कथनं ठरतात, आध्यात्मिकता किंवा प्रतिरूपात्मकता यांच्या पलीकडे जाऊन हा ऐवज कलाकार मांडताना दिसतात. त्यातूनच ही अमूर्त कथनं समकालीन ठरतात.

झरीना हाश्मी या पिट्रमेकर. त्यांच्या कलाकृतीतून त्या भौगोलिक रचनांकडे आणि त्याच्या माणसाने केलेल्या तुकडय़ांकडे नव्याने पाहायला लावतात. निरनिराळ्या प्रकारचे कागद, त्यांचे पोत, त्यावर मिनिमल पद्धतीने केलेल्या पिट्र्स, वास्तुरचना, भौमितिक आकार हा त्यांच्या कलाभाषेचा अविभाज्य भाग. यातून त्या घर, देश याबद्दलच्या आठवणी यावर व्यक्त होतात. घराचं अवकाश निरनिराळ्या वस्तूंच्या अमूर्त मांडणीतून आपल्यासमोर येतं. विस्थापनाच्या अनुभवातून या कल्पनांची पुनर्माडणी करतात. राजकीय सीमा, त्यातून होणारी हिंसा, त्या हिंसेच्या सामूहिक आठवणी कागदावरच्या खुणा, छिद्रं, टिपा यातून प्रतीत होत राहतात.  यातून त्या स्वतच्या मुळांचा शोध घेत राहतात. कागदाचे पापुद्रे, त्यावरल्या रेषा, त्यात मिसळून जाणारी उर्दू लिखावट हे सगळं त्यांच्या भावनिक ओघाचा भाग बनतं.

रंग आणि कागदाचं अगदी जिव्हाळ्याचं नातं शीला माखिजानी आणि मनीषा पारेख यांच्या कलाकृतीतही दिसून येतं, जरा वेगळ्या पद्धतीने. शीला माखिजानी यांची हस्तकला आणि रेषा यातून जणू काही एखादा परफॉर्मन्स आपल्यासमोर आकाराला येतो. कागद फाडून, त्यांच्या घडय़ा घालणं, कागदांना शिवणं, धाग्यांनी त्यावर आकृतिबंध तयार करणं या प्रक्रियेतून त्यांची चित्रं तयार होतात. एखाद्या नर्तकाने गिरकी घेतल्यावर दिसतील तसे कागद आणि धाग्यांची रूपं चित्राच्या अवकाशात दिसत राहतात. त्यातून तिच्या कल्पनेतल्या जागा, अवकाश, शहरांच्या रचना, नकाशे अमूर्त रूपात उभे राहतात. ते अनेक प्रतलं, रंगांचे पट ओलांडतात, रंगीत धाग्यांच्या रेषा त्यांना आकारउकार देतात. अतिशय किचकट आणि गुंतागुंतीच्या या रचना शहराचे रस्ते, इमारती असू शकतात किंवा एखाद्या जैव गोष्टीला आडवा छेद दिल्यावर दिसणारी आतली रचना.

मनीषा पारेख यांना मुळात कागदाचा पृष्ठभाग, त्यातले उंचवटे आणि खोलगट भाग यातून आकार आणि पोत निर्माण करण्यात रुची आहे. कागदाचे पापुद्रे, त्यातली छिद्रं, रंगाचे थर, कापडाचे तुकडे या सगळ्यांच्या रचनेतून त्या पृष्ठभागाला एक प्रकारचा जिवंतपणा येतो. त्यांची चित्रं ही पूर्णपणे ‘अमूर्त’ आहेत असं त्यांना वाटत नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना संदर्भ असतात : जागेचे, काळाचे, घटनांचे, मानवी संवादाचे, आठवणींचे. कागद, कापड, पृष्ठभाग, त्यांचे पोत, कमी-जास्त पारदर्शीपणा यातून हे प्रवाही आणि लयबद्ध आकृतिबंध तयार होतात.

एकीकडे, मटेरिअल आणि घाट यांना महत्त्व असताना दुसरीकडे त्याची आशयाशी, त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाशी काही कलाकार सांगड घालताना दिसतात. वाढत्या सामाजिक सांस्कृतिक हिंसेच्या आणि तणावाच्या पाश्र्वभूमीवर रुमाना हुसेनसारख्या कलाकारांत बाईपणाची आणि अल्पसंख्याक असण्याची तीव्रतेनं जाणीव झाली. एकीकडे, हे अनुभव त्यांच्या शारीरतेतून मांडत त्यांनी परफॉर्मन्ससारख्या कलाप्रकाराचा शोध घेतला. तर, दुसरीकडे, गेरू, नीळ, टेराकोटा, कागद, कोळसा यांसारख्या गोष्टी वापरून अमूर्त रचना तयार केल्या. मडक्याचे अर्धगोलाकार तुकडे, माती, निळीत आणि मातकट रंगात रंगवलेले चुरगाळलेले कागद, त्यावरच्या लाटा या मानवी शरीर, त्वचेचे पापुद्रे आणि त्यावरचे ओरखडे, हिंसेमुळे उठलेले व्रण यांची आठवण करून देतात.

बरीचशी आत्मचरित्रात्मक मांडणी असलेल्या मीनल दमाणी यांच्या चित्रांत त्यांचे व्यक्तिगत आणि आजूबाजूचे संदर्भ येत राहतात. त्यातून स्वप्नं, फँटसी यांची मांडणी करता करता त्याची जागा अलीकडे दृश्य आकृतिबंधांनी घेतलेली दिसते. तिच्या जुन्या घराच्या फरशीचे तुकडे, त्यावरचे आकार यापासून ती हे आकृतिबंध तयार करते. मुंबईसारख्या जागेची कमतरता असणाऱ्या शहरातल्या घरात दाटीवाटीने राहताना आपल्या वाटय़ाला येणाऱ्या थोडय़ाशा जागेतून हे आकृतिबंध आकार घेतात.

विभा गल्होत्रा तिच्या चित्रातून आणि मांडणी शिल्पातून यमुना नदीबद्दल आणि एकूणच पर्यावरणाबद्दल भाष्य करते. भिंतीच्या कोपऱ्यातून वाहात येणाऱ्या तपकिरी काळ्या ‘फ्लो’मधून ती हेच दाखवते. घुंगरू, कापड, पॉलियुरेथिन यांच्या मिश्रणातून हे प्रवाही दिसणारं आणि पाण्यावरच्या तेलाच्या किंवा घाणीच्या तरंगांची आठवण करून देणारं ठरतं. प्रदूषित आणि विषारी पाण्याचा साठा बनलेल्या यमुना नदीतून ती गाळ गोळा करते. आणि बोर्डावर किंवा कॅनव्हासवर फवारे उडवून त्यापासून निरनिराळे आकार, आणि पोतांची मांडणी करते. १९६० च्या दशकातल्या अ‍ॅक्शन पेंटिंगची आठवण करून देणारं असलं तरी ते दुसऱ्या बाजूला आजच्या पर्यावरणीय अरिष्टावर भाष्य करतं. त्यामुळेच आजच्या संदर्भात त्या आविष्काराचे हे पलू ध्यानात घेणं मोलाचं ठरतं. केवलाकारवादी घाट वापरून आजच्या संदर्भात कलाकार त्याची कशी मांडणी करतात, हे पाहणं कला इतिहासाला अधिक रोचक बनवतं.

नूपुर देसाई

noopur.casp@gmail.com