एक काळ होता, फोटो काढणे म्हणजे चैन समजली जायची. आता मोबाइल क्रांतीमुळे प्रत्येकजण फोटोग्राफर झाला आहे. तर डिजिटल क्रांतीमुळे डीएसलआर कॅमेरे अगदी सर्रास अनेकांच्या गळ्यात दिसू लागले आहेत. मग अशा वेळी फोटोग्राफी हा करिअरचा पर्याय आहे का, असा प्रश्न नक्कीच पडू शकतो.  त्याचं उत्तर होय असं आहे, पण तो निवडण्यापूर्वी त्यातील सद्य:स्थिती समजून घेणं गरजेचं आहे.

हल्ली अनेक वेळा करिअर मार्गदर्शन शिबिरातून फोटोग्राफीबद्दल बिनदिक्कत काही गोष्टी चक्क ठोकून दिल्या जातात. जसं की वाईल्ड लाइफ फोटोग्राफीमध्ये प्रचंड स्कोप आहे. अनेक परदेशी मासिकांना आपल्याला छायाचित्रं विकता येतात. वगैरे वगैरे.. हे पूर्णपणे खरं नाही. एकतर आज आपल्या देशातदेखील वन्यजीव छायाचित्रकार म्हणून पूर्णवेळ काम करणारे फोटोग्राफर अगदी एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतदेखील नाहीत. वन्यजीव छायाचित्रण हा उच्च दर्जाचा व्यावसायिक छंद होऊ शकतो, पण तो पूर्णवेळ पोटापाण्याचा व्यवसाय होऊ शकत नाही. कारण यासाठी लागणारी साधनसामग्री ही खर्चीक आहे. वन्यजीवांची छायाचित्रं काढण्यासाठी करावा लागणारा प्रवास, अभयारण्यात राहण्याचा खर्च वगैरे गोष्टींची बेरीज केली तर ही छायाचित्रं विकून मिळणारा पैसा तुमची बँकेतील शिल्लक वाढवू शकत नाही.

सध्या ढोबळमानाने विचार केला तर इंडस्ट्रिअल फोटोग्राफी, वेिडग फोटोग्राफी, फोटो जर्नालिस्ट, फॅशन फोटोग्राफी यात फोटोग्राफर म्हणून करिअर करण्याची संधी आहे. त्याचबरोबर फोटोग्राफी शिकवणं हादेखील एक चांगला व्यवसाय सध्या तेजीत आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला आधी स्वत:ला एक दर्जेदार फोटोग्राफर म्हणून सिद्ध करावे लागेल.

फोटो जर्नालिझम अजूनही आपल्याकडे म्हणावे तसे विकसित झालेले नाही. मात्र या क्षेत्रातील नोकरी चांगला पगार मिळवून देऊ शकते. अनेक चांगली प्रकाशने उत्तम पगार देऊन फोटोग्राफर्सना नोकरी देतात. पण या ठिकाणी प्रचंड स्पर्धा आहे हे लक्षात घ्यावे लागेल.

इंडस्ट्रिअल फोटोग्राफीचा विचार करताना त्यापुढे दोन आव्हानं आहेत. मोठय़ा कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी लागणारी छायाचित्रणाची सुविधा बहुतांशपणे जाहिरात कंपन्यांच्या माध्यमातून पुरवली जाते. गेल्या सात-आठ वर्षांत जाहिरात कंपन्यांना त्यांच्या गरजेनुसार मॉडेलसहीत छायाचित्रं पुरवणाऱ्या स्टॉक इमेज कंपन्यांची बाजारपेठ चांगलीच विकसित झालेली आहे. साहजिकच जाहिरात कंपन्यांकडून स्वतंत्र छायाचित्रणाची मागणी कमी झाली आहे. स्टॉक इमेज बँकेकडे प्रसंगानुरूप असंख्य छायाचित्रे उपलब्ध असतात. त्यामुळे अशा इमेज बँकांना छायाचित्रे देण्याचे काम फोटोग्राफर म्हणून करता येऊ शकते. त्याबद्दलची व्यावसायिक व्यावहारिक रचनादेखील आपल्याकडे विकसित झालेली आहे. पण त्यात बरीच गुंतवणूक आहे. परदेशात अशा प्रकारच्या छायाचित्रकारांकडे स्वत:चे स्टुडिओ असतात. त्यात अनेक विषय डोळ्यांसमोर ठेऊन सेट, कपडेपट अशा सर्व सुविधा असतात.

इंडस्ट्रिअल फोटोग्राफीसाठी केवळ उत्पादनाच्या छायाचित्रांसाठी अजूनही मागणी आहे. पण त्यासाठी तुम्हाला तुमचं संपर्कजाळं चांगलंच विकसित करावं लागेल. मध्यम पातळीवरील उद्योगांसाठी अजूनही मध्यम खर्चातील बऱ्यापैकी दर्जाच्या छायाचित्रणाला मागणी आहे.

फोटोग्राफीमध्ये सर्वाधिक मागणी असणारा आणि लवकरात लवकर भांडवली खर्च काढून नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे वेिडग फोटोग्राफी. याचं मूळ युरोप-अमेरिकेत विकसित झालं आहे. तिकडे छायाचित्रकाराबरोबर करार केला जातो. छायाचित्रांचा वापर वगैरेवर अनेक नियम अटी असतात. तसे अजून आपल्याकडे झाले नसले तरी खूप वेगाने यात संधी निर्माण होत आहेत. वेिडग फोटोग्राफीमध्ये नातेवाईकांच्यामुळे तुलनेने खूप मोठय़ा समूहाशी आपण जोडले जातो. त्यामुळे या समूहाकडून व्यवसायाच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता इतर क्षेत्रांपेक्षा अधिक आहे.

स्वत:ची हौस म्हणून छंद म्हणून छायाचित्रणाची कामं करणारे अनेकजण आहेत. त्यांच्या छायाचित्रांना भरपूर बक्षिसंदेखील मिळतात. पण एक व्यवसाय म्हणून एखादा प्रकल्प मिळवणं वगैरे गोष्टी या त्या त्या व्यक्तीच्या व्यावसायिक कौशल्यावर अवलंबून असतात.

अर्थात संधी असल्या तरी हे क्षेत्र कौशल्याचे आहे. आपल्याकडे किती अद्ययावत आणि महागडी उपकरणं आहेत यापेक्षा आपला व्हिज्युअल सेन्स कसा आहे, तो टिपण्याची तुमची दृष्टी कशी आहे हे सर्वात महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर हे तांत्रिक क्षेत्र आहे याचं भान हवं. कारण तुमच्याकडे अद्ययावत उपकरण आहे, छायाचित्राची रचना डोक्यात आहे पण कॅमेऱ्यातील खाचाखोचा माहीत नसतील तर त्याचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे छायाचित्रणाचं औपचारिक प्रशिक्षण हे गरजेचंच आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, पूर्वी छायाचित्र काढल्यानंतर फिल्मचं प्रोसेसिंग हे छपाई करणाऱ्या लॅबचं काम असायचं. आता डिजिटलमुळे ही गणितं बदलली आहेत. त्यामुळे तुमच्या छायाचित्रणाचे पोस्ट प्रोसेसिंग तुम्हालाच करावे लागते. त्यासाठी प्रशिक्षणाची ही आत्यंतिक गरज असते. अशा प्रशिक्षणासाठी सध्या जागतिक दर्जाच्या संस्था भारतात उपलब्ध आहेत. त्यांचे कोर्सेस महागडे असले तरी, तेथे मुख्यत: तुम्हाला जागतिक दर्जाची अद्ययावत साधनसामग्री हाताळायला मिळते. ही तांत्रिक जाणीव तुम्हाला कैकपटीने फायद्याची ठरू शकते.
केदार भट – response.lokprabha@expressindia.com
शब्दांकन – सुहास जोशी