सर रॉबिन नॉक्स जॉनस्टन यांनी १९६८-६९ मध्ये कोठेही न थांबता शिडाच्या बोटीतून सर्वप्रथम जगप्रदक्षिणा पूर्ण केली होती. या घटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांतील सागर परिक्रमा स्पर्धेत कमांडर अभिलाष टॉमी हे विशेष आमंत्रित स्पर्धक आहेत.

असं म्हणतात की साहस हे अमर्याद असते. गरज असते ती ते साहस झेलण्याची. असंच काहीसं वेडं साहस जगभरातील ३० दर्यावर्दी पेलणार आहेत. ते आहे शिडाच्या बोटीतून जगप्रदक्षिणा करण्याचे. अर्थात अशा प्रकारे जगप्रदक्षिणा करणाऱ्यांची संख्या तीनशेच्या घरात आहे. मग या तीस जणांचे वैशिष्टय़ काय असणार आहे? तर ते त्यांच्या नौकानयनाच्या तंत्रात दडलंय. कोठेही न थांबता सर रॉबिन नॉक्स जॉनस्टन  यांनी सर्वप्रथम शिडाच्या बोटीतून सागर परिक्रमा पूर्ण केल्याच्या घटनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष जून २०१८ साली सुरू होत आहे. त्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सर रॉबिन यांनी वापरलेल्या सुहाली (Suhaili) बोटीसारखीच बोट आणि नौकानयनाबाबतीच्या केवळ तत्कालीन साधनसामग्रीचाच वापर या गोल्डन ग्लोब रेसमध्ये होणार आहे हे याचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. इंग्लंडमधील प्लेमाउथ या बंदरातील ३० जून २०१८ ला ही स्पर्धा सुरू होणार आहे. तब्बल ३१२ दिवस चालणाऱ्या या सागर परिक्रमा स्पर्धेत तब्बल ३० हजार सागरी मैल अंतर पार करण्यासाठी जगभरातील २५ दर्यावर्दी उतरले आहेत आणि पाच दर्यावर्दीना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. त्यापैकीच एक म्हणजे आपल्या देशातील नौसेनेचे अधिकारी कमांडर अभिलाष टॉमी.

कमांडर अभिलाष टॉमी यांनी यापूर्वी २०१२-१३ मध्ये १५० दिवसांमध्ये कोठेही न थांबता सागर परिक्रमा पूर्ण केली होती. अर्थात त्या वेळी त्यांच्याकडे संपर्काची तसेच नौकानयनाची साधनंदेखील अत्याधुनिक होती. त्यातच म्हादेई ही सागर परिक्रमेसाठीच अलीकडच्या काळात बांधली गेलेली शिडाची विशेष बोटही जमेची बाजू होती. याच म्हादेईवरून कमांडर दिलीप दोंदे (निवृत्त) यांनी २००९-१० मध्ये चार थांबे घेत सागर परिक्रमा केली होती. अभिलाष यांना सागर परिक्रमेचा अनुभव असला तरी त्यांनी केलेली सागर परिक्रमा आणि गोल्डन ग्लोब रेसमध्ये जमीन-अस्मानाचं अंतर असणार आहे.

हा नेमका फरक स्पष्ट करताना अभिलाष सांगतात की, या स्पर्धेसाठी मला म्हादेईचा वापर करता येणार नाही. कारण स्पर्धेसाठीची बोट ३२ ते ३६ फूट या रचनेत असायला हवी. म्हादेई तुलनेने मोठी आहे. त्यामुळे नौकानयनाचा तिचा वेगदेखील बराच आहे. पण या वेळी बोटीचा आकार लहान असल्यामुळे तसा वेग पकडता येईलच याची खात्री नाही. अशा अगदी मूलभूत गोष्टीतच फरक असल्यामुळे एकूणच आव्हान मोठं असल्याचे ते सांगतात. या सर्व आव्हानात सर्वात महत्त्वाचे आव्हान असणार आहे ते नौकानयनाचे. या स्पर्धेतील नौकानयनाचे तंत्रच पूर्णपणे वेगळे असणार आहे. म्हादेईवर नौकानयनासाठी नकाशे, जीपीएस प्रणाली, संपर्क यंत्रणा व हवामानाचा अंदाज देणारी  यंत्रणा, ऑटो पायलट यंत्रणा असे सारे काही पूर्णपणे अत्याधुनिक होते. फक्त बोटीचे चलनवलन मात्र केवळ शिडांच्या आधारेच करणे हा त्यातील महत्त्वाचा भाग होता. त्याचबरोबर एका दिवसात किती अंतर जायचे, बंदराच्या किती जवळ जायचे, मार्ग बदलायचा का, अशा सर्वासाठी अभिलाषवर कोणतीही बंधनं नव्हती. त्याचा तो मुखत्यार होता. पण येथे या सर्वच घटकांवर अनेक बंधनं आणि आयोजकांचे नियंत्रण असणार आहे. कारण ही स्पर्धा केवळ स्पर्धा म्हणून नसून एका साहसाची पुनरावृत्तीच आहे. सर रॉबिन यांनी त्या काळात झेललेल्या सर्व आव्हानांचा अनुभव देणारी आहे. सर रॉबिन यांनी जेव्हा सागर परिक्रमा केली तोदेखील स्पर्धेचाच भाग होता. त्या वेळेपर्यंत अनेकांनी थांबे घेत सागर परिक्रमा केली होती. पण न थांबता कोण ही परिक्रमा करू शकतो हे आजमावण्यासाठी १९६८ मध्ये ही स्पर्धा घेतली गेली होती. नऊ स्पर्धक त्यामध्ये सहभागी झाले होते. त्यामध्ये सर रॉबिन ३१२ दिवसांत सागर परिक्रमा करून पहिले आले होते.

अर्थात तो सारा थरार पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी नियमांची बंधनं कडक आहेत. त्यामुळेच केवळ होकायंत्र, छापील नकाशे आणि ग्रह-ताऱ्यांचा आधार इतकीच मदत या वेळी असणार आहे. त्यापलीकडे जाऊन कोणशाही संपर्क साधण्यास पूर्णपणे मनाई असणार आहे. स्पर्धा आयोजकांमार्फतच संपर्क करावा लागणार आहे. थेट संपर्कावर पूर्णपणे बंदी आहे. अर्थात स्पर्धा आयोजकांशी संपर्क साधण्यासाठीदेखील केवळ एक एचएस रेडिओ हाच काय तो आधार असल्याचे अभिलाष सांगतात. इतकेच नाही तर ग्रह-ताऱ्यांच्या आधारे नौकानयन हे पुन्हा एकदा नव्याने शिकावे लागणार असल्याचे ते नमूद करतात. नौदलात दाखल झाल्यानंतर २० वर्षांपूर्वी हे तंत्र त्यांनी आत्मसात केले होते. पण आत्ता त्या तंत्राचा वापर होत नसल्यामुळे या तंत्राचा कसून सराव करावा लागणार असल्याचे ते सांगतात. त्याचबरोबर हवामानाचा अंदाज देणारी कसलीही पूर्वसूचना वगैरे येथे असणार नाही. त्याचे अंदाज तुमचे तुम्हालाच लावावे लागणार आहेत.

अर्थात हे झाले संपर्काचे. पण इतर बाबतींतदेखील प्रवासादरम्यान समुद्रावर तुम्हाला कोणाकडूनही कसलीही मदत घेता येणार नसल्याचे ते सांगतात. बोटीचा आकार तुलनेने लहान असल्यामुळे खाद्यपदार्थ आणि पाण्याचा वापर जपूनच करावा लागणार आहे. इतकेच नाही तर सर रॉबिन्स यांनी तर पावसाचे पाणी जमा करून त्याचा वापर केला होता. कदाचित आम्हालादेखील तसेच करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अभिलाष सांगतात. समुद्राचे पाणी शुद्ध करून वापरण्याची वगैरे यंत्रणादेखील वापरता येणार नाही. काही तांत्रिक अडचण असल्यास म्हणजे बोटीची दुरुस्ती अथवा आरोग्याच्या तक्रारी, तर त्यासाठी आयोजकांच्या माध्यमातून संपर्क साधता येईल, मात्र बोटीची दुरुस्ती स्वत:लाच करावी लागणार आहे. कोणत्याही बाह्य़ माध्यमांचा आधार त्यासाठी घेणे यामध्ये शक्य होणार नाही.

त्याचबरोबर सर्वात मोठे आव्हान हे एकूणच या प्रवासाच्या कालावधीचेदेखील आहे. यापूर्वीची अभिलाष यांची सागर परिक्रमा १५० दिवसांत पूर्ण झाली होती. आणि २२ हजार सागरी मैल अंतर पार केले होते. पण स्पर्धेसाठी नौकानयनाच्या तंत्रात आणि बोटीमध्ये झालेल्या मूलभूत बदलामुळे हा कालावधी ३१२ दिवसांपर्यंत खेचला जाऊ शकतो. सर रॉबिन्स यांना ३१२ दिवस लागले होते. म्हणजेच जवळपास वर्षभर सागरावरच राहायची तयारी ठेवावी लागणार आहे. तर इंग्लडमधून ही सागर परिक्रमा सुरू होणार असल्यामुळे एकूण परिक्रमेचे अंतरदेखील ३० हजार सागरी मैल असणार आहे. मात्र अभिलाष यांना त्यांची बोट भारतातून इंग्लडमधील प्लेमाउथ येथे न्यावी लागणार आहे. हे अंतरदेखील ते सागरावरूनच स्पर्धेत भाग घेणाऱ्या बोटीवरूनच पार करणार आहेत. त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारी २०१८ मध्येच ते ही बोट घेऊन निघतील. म्हणजेच जवळपास दीड वर्ष अभिलाषचे वास्तव्य समुद्रावरच असणार आहे.

अभिलाष हे सध्या गोव्यातच त्यांच्या सरावात पूर्ण वेळ मग्न आहेत. तर कमांडर दिलीप दोंदे (निवृत्त) हेदेखील सध्या त्याच्या या मोहिमेच्या तयारीत त्याला मदत करत आहेत. स्पर्धा जिंकणे अथवा न जिंकणे हे त्या त्या वेळच्या परिस्थितीवर असेल. पण साहसाचे हे आव्हान स्वीकारणे हे महत्त्वाचे आहे. अभिलाष यांनी ते स्वीकारलंय आणि त्यात यशस्वी होण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

असा आहे डोलारा

अभिलाष यांच्या यापूर्वीच्या मोहिमेला नौदलाचा पूर्णपणे आधार होता. पण गोल्डन ग्लोब स्पर्धेतील त्यांचा सहभाग हा सध्या तरी वैयक्तिक स्वरूपाचा असणार आहे. त्यामुळे बोट बांधणीपासून ते छोटय़ा-मोठय़ा प्रशासकीय कामांसाठी त्यांना निधी जमा करावा लागणार आहे. बोट बांधणी, अन्नसामग्री, पाणी, प्रवेश फी, विविध कामांसाठी समन्वयक, प्रवासखर्च  असा हा एकूण खर्च सुमारे नऊ कोटींच्या आसपास होणार आहे. हे आव्हान सागर परिक्रमेइतकेच कठीण आहे. त्यासाठी प्रायोजक व देणगीदारांच्या माध्यमातून निधीसंकलन सुरू आहे. क्राऊड फंडिंगचा पर्यायदेखील वापरण्यात येत आहे. https://www.ketto.org/fundraiser/abhilashtomyGGR या लिंकवर अधिक माहिती मिळू शकेल.

बोटीची रचना

गोल्डन ग्लोब रेसमध्ये भाग घेण्यासाठीची तयारी मागील वर्षांपासून सुरू झाली ती बोट बांधणीपासून. म्हादेई बांधली त्या रत्नाकर दांडेकर यांनीच ही बोटदेखील बांधली आहे. ‘तुरिया’ असे या बोटीचे नाव आहे. ‘तुरिया’ म्हणजे धान्याची चौथी अवस्था. चेतनेची चौथी अवस्था. स्थल-कालाच्या, निद्रेच्या, स्वप्नांच्या पलीकडे पोहचलेली स्थिती. सर रॉबिन यांच्या मूळ बोटीप्रमाणेच (मूळ रचनाकार विल्यम एटकिन्स) तुरिया बांधण्यात आली आहे. सर रॉबिन यांची बोट पूर्णपणे लाकडाची होती. पण १९६८ मध्ये फायबर ग्लासच्या वापराचे तंत्रज्ञान उपलब्ध होते, त्यामुळे तुरियाच्या बांधणीत फायबरचादेखील वापर केला आहे. ३२ फूट लांबीच्या तुरियाचे वजन जवळपास आठ ते नऊ टन इतके आहे. स्पर्धेच्या नियमानुसार बोटीचे संतुलन सांभाळणारे किल म्हणजेच बोटीचा तळ पूर्ण लांबीचा असणार आहे. अंतर्गत रचनेत थोडाफार बदल केला आहे, पण मुख्यत: सर रॉबिन यांच्या ‘सुहाली’ या बोटीची ती प्रतिकृतीच आहे. तुरियाच्या बांधणीसाठी सुमारे तीन कोटी खर्च आला आहे. सात ऑगस्टला नारळी पौर्णिमेच्या दिवशी तुरियाचे जलावतरण होणार आहे.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com