13-lp-saurabh-naikवर्षभरात किती तरी नाटक येतात, त्यातली चारपाच चालतात, बरीचशी बुडतात. चारपाच चेहऱ्यांच्या जिवावर नाटकाला गर्दी खेचली जाते. मराठी नाटकांचं क्षेत्र बॉलीवूडसारखं का वागतंय?

नाटक म्हणजे जिवंत माणसांचा जिवंत कलाकृतींशी चालत असलेला जिवंत खेळ. त्यात कुठेही कृत्रिमता नसते. कुठेही ओढूनताणून दृश्य उभं केल्याचं जाणवत नसतं. एखादा प्रसंग आपल्यासमोर आपल्या जीवनात घडतोय याची अनुभूती येत असते. आणि हेच नाटकाचं वेगळेपण बाकी सगळ्या कला माध्यमांमध्ये वेगळं ठरतं. अगदी याउलट चित्रपट माध्यमाचं असतं. त्यातही िहदी चित्रपट तुलनेने यात अधिकच सरस असतात. कमालीची कृत्रिमता, आपल्याला काय दाखवायचंय या बुद्धिमत्तेपेक्षा प्रेक्षकांना काय हवंय याचा अट्टहास आणि काहीही असलं तरी विकायचं कसं याची गणिते ही त्रिसूत्री िहदी चित्रपटाला एका विशिष्ट उंचीवर (गुणवत्तेच्या बाबतीत खोलीमध्ये) घेऊन जाते. पण हल्ली नाटकांमध्येही याचेच प्रतििबब पडताना दिसतेय का, असा प्रश्न पडतो, तो नाटकांच्या बदलत चाललेल्या स्वभाव वैशिष्टय़ांमुळे. आपण नाटकाच्या प्रत्येक नव्या सादरीकरणाला ‘प्रयोग’ म्हणतो. कारण तो प्रत्येक वेळेस एक नवा प्रयोग असतो. काही तरी नवं करून बघणं असतं. शास्त्रज्ञ जसा नवीन शोध लावताना अनेक प्रयोग करतो तसेच प्रयोग नाटक जन्माला आल्यानंतरही सतत करीत राहावे लागतात, तरच नाटक जिवंत राहतं. पण हल्ली हीच प्रयोगशीलता हरवत चालल्याचं सतत जाणवतं.

‘मराठी नाटकांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीय’ अशी सर्व स्तरांतून ओरड होत असताना नेमकी का पाठ फिरवलीय याची कारणं न शोधता व्यावसायिकांनी प्रयोगशीलता सोडून प्रेक्षकांना नेमकं काय हवंय याचा शोध घेऊन तसं पुरवायला सुरुवात केली. ‘मागणी तसा पुरवठा’ हा मंत्र लक्षात ठेवता मधल्या काळात विनोदी नाटकांचं पेव फुटलं होतं. नाटकांच्या जाहिरातीच्या पानावर ८० टक्के नाटकं विनोदी असल्याची जाणीव व्हायला लागली आणि आलटूनपालटून विनोदी अभिनेतेही तेच तेच असल्याचे जाणवू लागले. आता हा विनोदी नाटकांचा महापूर काही प्रमाणात ओसरला असला तरी त्याचं भूत काही मानगुटीवरून उतरल्याचं दिसत नाही. त्याला काही प्रमाणात शहरी भागाची मानसिकताही जबाबदार आहे. ‘दिवसभर थकूनभागून आल्यानंतर प्रेक्षकांनी तीच रडगाणी गाणारी, विचारशील आणि मनाला हुरहुर लावणारी नाटकं का पाहावी, काही तरी विनोदी पाहिल्यास मन फ्रेश होऊन नव्याने कामास उभारी येते’ अशा प्रकारचा ढोबळ पािठबा आणि विचारसरणी त्या नाटकांच्या निर्मितीमागील प्रमुख कारणे सांगताना मांडण्यात आली. आता हे कुठल्या प्रेक्षकांनी ठरवलं असेल आणि नाटय़ निर्मात्यांकडे विनोदी नाटकांची मागणी केली असेल, असं तरी पाहण्यात नाही आणि असं जर झालं असेल तर मग मराठी नाटकांच्या प्रेक्षकवर्गाची एके काळची प्रगल्भता हरवत चालली आहे, अशी भीती व्यक्त करायला हरकत नाही. कारण मराठी नाटय़ प्रेक्षकांकडे फार आदराने पाहिलं जातं. त्यांना एखादी कलाकृती मनापासून आवडली म्हणजे ती कलाकृती खरंच चांगली-उत्तम आहे असं गृहीत धरण्यात येतं. कारण प्रत्येक मराठी प्रेक्षकांत एक छुपा समीक्षक दडलेला असतो. आणि एवढं सगळं पार करून नाटकाने प्रेक्षकपसंती मिळवली तर ते नाटक जगाच्या पाठीवर कुठेही चालू शकतं, अगदी कुठल्याही भाषेत. यामुळे मराठी नाटकांपेक्षा मराठी प्रेक्षकांनी सजग राहणं गरजेचं आहे.

यामध्ये कुठेही विनोदी नाटकांना कमी लेखण्याचा प्रश्नच येत नाही. विनोद हा कठीण आहेच. उत्तम विनोदवीरांची आपल्याला परंपरा आहेच आणि आपल्याला त्यांचा अभिमान आहेच. परंतु हल्लीच्या विनोदाची पातळी प्रचंड घसरली आहे,  ही तितकीच सत्य परिस्थिती आहे. आणि त्या विनोदांचं प्रतििबब आपल्याला नाटक आणि रिअ‍ॅलिटी शोजमधून दिसतं. कंबरेखालील विनोद, मिळमिळीत शाब्दिक कोटय़ा, मूळ स्वरूपातील शिव्यांच्या जागी दुसरा शब्द वापरून विनोद निर्माण करणं यात विनोदाला कुठल्या प्रकारची पातळी निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला जातो, हे न उमगलेलं कोडं आहे. निदान आपण महाराष्ट्रात असून पु.लं.चा विनोदी नाटय़वारसा आनुवंशकतेने का होईना पण जपतोय याचे भान विनोद निर्माण करणाऱ्यांनी ठेवावे. हे असंच जर होणार असेल तर बॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये आणि मराठी नाटकांत फरक तो काय? मराठी नाटक सरळ सरळ िहदी चित्रपटाच्या पावलावर पाऊल ठेवतंय असं म्हणायला हरकत नाही. यामध्ये काही अनुकूल बदलही आहे आणि काही प्रतिकूलसुद्धा. जे अनुकूल बदल आहेत ती काळाची गरज आहे आणि जे प्रतिकूल बदल आहेत, ते जाणीवपूर्वक गुणवत्ता घसरण्याकडे झालेले-फसलेले बदल दिसतात. आता याचा अनुकूल-प्रतिकूलपणा व्यक्तिपरत्वे बदलू शकतो.

िहदीत जो स्त्री-पुरुष संबंधामधला थेटपणा (बोल्डनेस) होता तो मराठी नाटकांमध्ये सहजतेने येताना दिसतोय. मराठी नाटकांमध्ये हल्ली सहज प्रणय दृश्ये दिसतात. ‘या गोजिरवाण्या घरात’ या नाटकातील नायक-नायिका अंमळ अधिक जवळ आल्याचे भासतात. नाटकांमध्ये काही धीट (बोल्ड) प्रसंग, अभिनेत्रींच्या कपडय़ांमध्ये आलेला धाडसीपणा (बोल्डनेस)आणि संवादात वापरलेले शब्द हे धीटपणे सादर केले जातात. काही नाटकं ही मुळातच एखाद्या थेट, धाडसी विषयांवर करून त्याला बोल्ड नाव देऊन प्रेक्षकवर्गाला आकृष्ट करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. ‘एक चावट मधुचंद्र’ हे याचं उत्तम उदाहरण. आणि प्रेक्षक अशा नाटकांना आवर्जून येतातदेखील. बऱ्याचशा नाटकांत हल्ली तंत्रज्ञान उत्तम वापरल्याचं जाणवतं. रंगमंचावर स्क्रीन लावून त्यावर वेगवेगळे प्रयोग केले जातात. ‘आईचं पत्र हरवलं’ या नाटकात असे प्रयोग झाल्याचे जाणवतात किंवा परदेशात केलेलं शूटिंग नाटकात दाखवून नाटकाला पुढील वळण दिलं जातं. उत्तम तंत्रज्ञान वापरल्याने नाटकाचा दर्जा सुधारतो यात शंकाच नाही. नाटकासाठी मुद्दाम स्वतंत्र गाणी निर्माण करणं आणि त्यावर नृत्य सादर करणं याचाही नाटकात मोठय़ा प्रमाणात वापर वाढलेला दिसतो.

िहदीकडून घेतलेला अजून एक गुणधर्म म्हणजे एकाच मोठय़ा चेहऱ्याचा वापर करून त्याच्या किंवा तिच्या नावावर बुकिंग ‘खेचणं’. िहदीत जसे मोठय़ा अभिनेत्याच्या नावावर प्रेक्षक चित्रपट पाहायला जातात, मग चित्रपटात काहीही का दाखवलं असेना! त्यांचं फॅन फॉलोइंग आíथक फायदा मिळवून देतं. मराठीतही तशीच लाट आल्याचं दिसतं. मराठीतसुद्धा असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या नावावर बुकिंग होतं. प्रशांत दामले, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, मुक्ता बर्वे, स्पृहा जोशी, उमेश कामत ही त्यातील काही आघाडीची नावं. बऱ्याचदा टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्यांना घेऊन नाटक केलं जातं. ‘गोष्ट तशी गमतीची’, ‘अमर फोटो स्टुडिओ’ ही त्यातील काही ताजी उदाहरणे. अशा वेळेस ते नाटक न विकता ते चेहरे विकले जातात. अर्थातच मराठी नाटकांचं प्रमोशन वाढलंय त्यामुळे हे सहज शक्य आहे. मराठी नाटकांना प्रमोट करण्यासाठी पुरेशा संधी उपलब्ध झाल्याने आणि जाहिरात संधी सुधारल्याने मराठी नाटक सगळीकडे पोहोचतंय असं म्हणायला हरकत नाही. पण त्याच वेळेस या सगळ्यामुळे मराठी नाटकाला नवे चेहरे, नव्या संधी मिळत नसल्याची खंत जाणवते. नाटकाच्या व्यावसायिकतेमुळे नवीन चेहऱ्यांची कमतरता रंगभूमीला भासतेय हे मात्र खरं.

िहदी चित्रपटाप्रमाणे मराठी नाटकांची संख्यासुद्धा वाढलीये. वर्षभरात अनेक नाटकं येतात पण तितकीच नाटकं बुडतातसुद्धा. नाटकाच्या प्रयोगात सातत्य असण्यात यश आलेलं फार कमी प्रमाणात कमी नाटकांबाबत दिसतं. ‘बुकिंगसाठी काहीही’ या मानसिकतेमुळे नाटकाच्या दर्जावर परिणाम होताना दिसतोय. म्हणूनच मराठी नाटकाचा स्वतंत्र गुणधर्म हरवलाय का, असा प्रश्न पडतो. हल्ली बरेच अमराठी निर्माते-दिग्दर्शक मराठी नाटकांच्या क्षेत्रात पाऊल ठेवताना दिसतायत, मग मराठी नाटकांच्या निर्मितीक्षमतेवरही याचा परिणाम होईल का? मराठी नाटकांना ‘गॉडफादर’ ची कमतरता जाणवतेय का? की त्यामध्ये राजकारण शिरू पाहून नाटक वरदहस्त मिळवतंय? या सगळ्या प्रश्नांचा मागोवा घेतल्यास एकच उत्तर मिळतं की मराठी नाटकांनी स्वत: खंबीर राहणं गरजेचं आहे. जगात जे जे उत्तम आणि आधुनिक आहे त्यांची नक्कल टाळावी, स्वत: प्रयोग करावेत, तरच आपण नाटकाच्या नव्या सुवर्ण काळाचे साक्षीदार होऊ!
सौरभ नाईक – response.lokprabha@expressindia.com