lp19ब्रिटिशांविरोधातील लढय़ाला सर्वत्र व्यापक रूप येत असताना धुळय़ामध्येही ‘विदर्भाचे टिळक’ शंकरराव ऊर्फ नानासाहेब देव यांनी इसवी सन १८९३ मध्ये ‘सत्कार्योत्तेजक सभा’ नावाने एक स्वातंत्र्य यज्ञ चेतवला. या स्वातंत्र्य यज्ञाचेच एक उपांग – श्री समर्थ वाग्देवता मंदिर! त्याची स्थापना  १९३५ मध्ये झाली.

हजारो जुनी कागदपत्रे, बाडे, पोथ्या, ग्रंथ, काव्यरचना, पत्रव्यवहार आणि अन्य साहित्यसाधनांची ही मांडणी. वेद, पुराण, कला, कौशल्य, साहित्य, संस्कृती, इतिहास, भाषा, व्याकरण, संगीत, आयुर्वेद अशा नाना विषयांचा इथे स्पर्श. समर्थानी लिहिलेले ‘वाल्मिकी रामायण’ हे या संग्रहातील सर्वात मोठा ठेवा. समर्थानी हा ग्रंथ नाशिकजवळ टाकळी मठात लिहिला. इसवी सन १६२२ मध्ये तयार झालेले हे हस्तलिखित रामायणाच्या बाल, अयोध्या, अरण्य, किष्किंधा, सुंदर, युद्ध आणि शेवटच्या उत्तरकांडातून आपल्यापुढे येते. ते पाहताना समर्थाची अक्षरवाटिका जशी भावते तशीच प्रत्येक खंडाच्या मुखपृष्ठावर त्यांनी चितारलेली चित्रेही लक्ष वेधून घेतात.

Departure of Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony on 29th June
पुणे : ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २९ जूनला प्रस्थान
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
Sri Swami Samarth Maharaj s prakat din Celebrations to Commence in Akkalkot with Religious and Cultural Programs
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रम

समर्थानी लिहिलेले हे ‘रामायण’ समाजापर्यंत घेऊन जाण्याचा ध्यास संस्थेने घेतला आहे. आठ खंड आणि त्याची सहा हजार पृष्ठे असा हा प्रचंड वाङ्मयीन विस्तार आहे. यासाठी मोठा खर्च आणि हाती संशोधकांची फळी लागणार आहे. पण या दोन्ही गोष्टींवर मात करत संस्थेने यातील पहिला ‘बालकाण्ड’ खंड नुकताच समाजसुपूर्द केला.

हजारो ऐतिहासिक कागदपत्रं हे या संग्रहालयाचे वैशिष्टय़! संस्थेच्या दफ्तरी आज पाच हजार बाड आहेत. या प्रत्येक बाडामध्ये पुन्हा शेकडो कागद. हे सारे कागद देव यांनी भारतभरामध्ये पसरलेल्या मठ, संस्था, व्यक्तींकडून मिळवले. यामध्ये त्यांनी भेट दिलेल्या मठांचीच संख्या अकराशेहून अधिक आहे. अखंड पायपीट, कष्ट, वेळप्रसंगी धन मोजत देवांनी हे सारे भांडार इथे जमा, सुरक्षित केले. या कागदपत्रांच्याच संशोधनाचे कार्य इथे सुरू असते. एकटय़ा देवांनी यातील तीन हजारहून अधिक कागदपत्रांचे संशोधन केले आहे. या संशोधित हस्तलिखितांवर आधारित चार सूचिखंडही तयार करण्यात आले आहेत.

देवांनी गोळा केलेला हा वाङ्मयीन खजिना तपासतानाच छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित एक ना दोन तब्बल सात पत्रे हाताशी लागली. महाराजांची ही पत्रे आज वाग्देवता मंदिरांचा ठेवा आहेत. यामध्ये काही आदेशपत्रे आहेत, काही सनदा आहेत तर काही निवाडेदेखील. छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, समर्थ, त्यांचे शिष्य कल्याणस्वामी, अन्य काही ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा पत्रव्यवहारही इथे लावलेला आहे. समर्थानी त्यांचे संपूर्ण लेखन हे पद्यात केले आहे. पण त्यांचे गद्यातील एकमेव पत्र इथे पाहण्यास मिळते.

ताडपत्र – ताम्रपटांवरचे लेख, प्राचीन बखरी, पोथ्या, अन्य संतांचे साहित्य, श्रीकल्याणस्वामींनी रेखाटलेले हनुमानाचे चित्र आणि कल्याणस्वामींचे त्याकाळी काढलेले चित्र, सचित्र पंचरत्न गीता, एकनाथी भागवताची ऐतिहासिक प्रत, देवांचा गांधी-सावरकरांबरोबरील पत्रव्यवहार, टिळकांनी भेट दिलेली ‘गीतारहस्य’ची प्रत असे काय काय पाहायला मिळते.

ही ज्ञानपोई गेली ऐंशी वर्षे सारस्वतांची तहान भागवत आहे. देवांच्या पाठी  त्यांच्या अनुयायांनी हा ज्ञानयज्ञ आजही त्याच आस्थेने सुरू ठेवला आहे. प्राचीन वाङ्मयाच्या जतन, संशोधन, अभ्यासाचे काम आजही त्याच गतीने सुरू आहे. हे सर्व कार्य केवळ दानशूरांच्या मदतीवर चालू आहे. वाङ्मय संशोधनाचे कार्य सुरू असणाऱ्या या संस्थेच्या नावात ‘मंदिर’ हा शब्द आहे म्हणून आजवर सरकारी अनुदान नाकारण्यात आले.

खरेतर अडचणी खूप आणि आव्हाने निरंतर आहेत. जुनी झालेली इमारत, मोडकी कपाटे, कसेबसे भिंतीवर साकारलेले प्रदर्शन, अभ्यासक-संशोधकांसाठी नसलेल्या सोयी, एक कर्मचारी व्यवस्था..अशी मोठी यादी तयार होईल. पण समर्थ निष्ठेतून ही मंडळी त्यावरही मात करत आहेत. आज या वाङ्मयाचे जतन करणे, अभ्यासक-संशोधकांसाठी व्यवस्था करणे, अद्ययावत संग्रहालयाची उभारणी ही संस्थेपुढची तातडीची कामे आहेत. राष्ट्राचा हा वारसा पुढच्या पिढीला पाहता-अभ्यासता यावा, या हेतूने देवांनी गोळा केला. आजवरच्या विश्वस्तांनी तो निगुतीने सांभाळला; पण आता त्याला समाजाच्या उबदार हातांचीही गरज आहे.
अभिजित बेल्हेकर – response.lokprabha@expressindia.com