गाण्याचा क्लास, कॉलेजची लेक्चर्स झाली की मग ब्युटी ट्रीटमेंटसाठी क्लायंट ऑर्डर्स घ्यायच्या. नंतर ब्रायडल मेकअपचं प्रशिक्षण घ्यायचं. तो क्लास सुटल्यावर उरलेल्या ऑर्डर घ्यायच्या. या सगळ्यात थोडीशी ‘टाईम मँनेजमेंट’ करत मी सगळं एंजॉय करत राहिले. कॉलेजचं शिक्षण, शास्त्रीय गायनाचे धडे आणि ब्युटी पार्लर अशा तीन गोष्टी सांभाळणाऱ्या वेदवती कीर्तनेविषयी…
झर्रझर्र.. सर्रसर्र.. एकाग्रपणं तिचा हात चालतोय.. ‘मान नको हलवू हं.’. तिनं पुढ्यात बसलेल्या लहानगीला प्रेमळ सूचना दिली. ‘ही ताई किती वेळ लावत्येय ? मी तर ज्याम बोअर झाल्येय’ हे चिमुरडीच्या मनातले भाव तिनं ओळखले असावेत. मग तिचं लक्ष वेधण्यासाठी सा रे ग म प ध नी सा.. असे छान सूर लावत लहानगीलाही ते म्हणायला लावले. ‘वा वा छानच. मी तुला देते वरचा सा..’ एवढं बोलून होईपर्यंत हेअरकट करण्याचं काम साधलेलं असतं. बेबी खूश, बेबी की मॉं खूश और ‘वो’भी खूश. तिच्या गोड गळ्याचं कौतुकही आपोआपच होतं. ही कलाकार आहे वेदवती किर्तने !
वेदवती गुरुनानक खालसा महाविद्यालयात टी. वाय. बी. ए.ला असून तिचा रिझल्ट अजून लागायचाय. टी. वाय.ला तिनं मराठी विषय घेतला होता. संत वाङ्मय, अभंग, ओव्या आणि साहित्याचा अभ्यास करण्यासाठी तिनं मराठी विषय घेतला. पुढं ती ब्युटी पार्लर आणि गायन क्षेत्रात करियर करणारेय. सहावीत असल्यापासून ती गाणं शिकत्येय. तिला मध्यमाच्या परीक्षेत प्रथम श्रेणी मिळाल्येय. ती ‘श्री गुरुसमर्थ गायन-वादन विद्यालया’त मधुवंती पटवर्धन यांच्याकडं गाणं शिकत्येय. बारावीच्या सुट्टीत तिनं माया परांजपे यांच्या ‘ब्युटिक’मधून ‘डिप्लोमा इन अँस्थेटिक्स’ आणि ‘डिप्लोमा इन बेसिक ब्युटी’चे कोर्स केलेत.
ती सांगते की, ‘सध्या माझं पार्लर नि गाण्याचा क्लास चालू आहे. कॉलेज चालू असताना सकाळी लेक्चर्सना जायचं.  मग क्लायंट ऑर्डर्स घ्यायच्या. नंतर घाटकोपरच्या संजय ठक्कर यांच्याकडं ब्रायडल मेकअपचं प्रशिक्षण घ्यायचं. तो क्लास सुटल्यावर उरलेल्या ऑर्डर घ्यायच्या. या सगळ्यात थोडीशी ‘टाईम मँनेजमेंट’ करत मी ऑर्डर अँडजस्ट केल्या. कधी तिन्ही गोष्टी एकदम जमायच्या नाहीत, तरी ऑर्डर कँन्सल केली नाही. ब्युटिशिअनच्या कोर्सनंतर ओळखीपाळखीतून ऑर्डर्स मिळाल्या. माऊथपब्लिसिटी होत गेली. पुढचे अँडव्हान्स कोर्स करता प्रँक्टिस म्हणून ही कामं उपयोगी पडली. क्लाएंटसनाही माझं काम आवडायला लागलं. एकीनं दुसरीला, तिनं तिसरीला असं सांगत सांगत कामाचं सर्कल वाढलं. आता मी कार्डसही छापलीत. हळूहळू सगळं सेट होतंय. मी पार्लरमधल्या सगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स घेते. या वर्षांपासून ब्रायडल मेकअपच्या ऑर्डर्सही घ्यायला लागल्येय.’  
मध्यंतरी तिच्या गाण्याची परीक्षेच्या सुमारासच ब्रायडलची ऑर्डरही होती. ते सगळं एकटीलाच मॅनेज करायच होतं. साडीपासून सगळ्या मँचिंग गोष्टी नि ब्रायडल मेकअपची तयारी करायची होती. तिची खूप धांदल उडाली. पण ते निभावून नेता आलं. त्या परीक्षेत फर्स्टक्लास मिळवण्याचं ध्येय नि ऑर्डरही पूर्ण करण्याचा निश्चयही साध्य झाला. टी.वाय.चा अभ्यास, गाणं शिकणं नि पार्लर या अँक्टिव्हिटीजमध्ये थोडी ओढाताणच झाली होती. पण कॉलेजमधल्या मत्रिणींनी तिला भरपूर मदत केली. त्यांच्यामुळं नोटस् वगरे रेडीमेड हातात मिळाल्या. मराठीच्या प्राध्यापकांनीही मदतीचा हात दिला. या मदतीमुळंच तिला टी. वाय.ची परीक्षा देणं सोपं गेलं.
वेदवती म्हणते, ”माझे बाबा गायक असल्यानं गाण्याचं वेड पहिल्यापासूनच आहे. गाणं, अभ्यास नि पार्लर या गोष्टींचा मेळ घालताना घरच्यांचा भरभक्कम पािठबा मिळालाय. गाण्याच्या आवडीप्रमाणं शिक्षणही पूर्ण झालं पाहिजे, असं घरच्यांनी सांगितलं होतं. मला गाण्यात करिअर करायचंय. कारण बाबा पंडित जसराज यांच्याकडं शिकल्येत. ते सध्या अमेरिकेतील पंडित जसराज यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत. तिकडं जायची मला प्रचंड क्रेझ असून तिथं जाऊन बाबांना मदत करायची आहे.”  
लहानपणापासून ती हेअरकटसाठी एका पार्लरमध्ये जायची. अकरावीत असताना तिथं गेल्यावर दीदी तिच्यासमोर विद्याíथनींना शिकवत होती. ते बघून वेदवतीला वाटलं की, ‘हे सगळं आपणही करू शकू. टापटीप राहायला सगळ्यांनाच आवडतं. तेव्हा आपणही हे शिकूया.’ अर्थात तेव्हा करिअर म्हणून याकडं तिनं बघितलं नव्हतं. ती सांगते की, ‘पुढं ऑर्डर्स मिळून क्लाएंटचं सर्कल वाढत गेलं. तेव्हा यात आपल्याला खूप चांगला स्कोप असल्याचं लक्षात आलं. आतापर्यंतच्या सगळ्याच क्लाएंटनी मला पुन्हा पुन्हा बोलावलंय. मी कितीही बिझी असले, तरी त्या माझ्यासाठी थांबून राहतात. वेळ अँडजस्ट करतात. त्यांना माझं काम आवडतंय. मी घरी जाऊन काम करत असल्यानं तो वेळ फक्त त्यांच्यासाठीच असतो. हा क्लाएंट, तो क्लाएंट अशी पार्लरसारखी धावपळ नसते. हे त्यांनाही आवडलंय. त्यातून माऊथपब्लिसिटी होत क्लाएंट सर्कल आणखी मोठंमोठं होतंय.’
बोलता बोलता ती म्हणते की, ‘माझ्या एका मैत्रिणीनं बेसिक पार्लरचा कोर्स केला होता. घरच्या परिस्थितीमुळं तिला पुढचा कोर्स करता आला नाही. मग मी तिला अँडव्हान्स कोर्सचे फोटो दाखवून तसं शिकवत गेले. माझं बघून बघून तीही शिकली. सगळी कामं एकटीनं करण्यात माझा वेळ जात होता. तेव्हा फारशी कुठं ओळख नसल्यानं मुलीही मिळत नव्हत्या. मग मी तिलाच तयार केलं. आता मी मेकअप करते. ती हेअरस्टाईल करून साडी नेसवते. आमचं टीमवर्क खूपच छान जमलंय.’  फ्युचर प्लॅनविषयी वेदवती सांगते, ‘पुढं मला हेअरकटचा अँडव्हान्स कोर्स टोनी अँण्ड गाय’ मध्ये करायचाय. दादरमध्ये पार्लर उघडून ते दुसऱ्यांना चालवायला द्यायचंय. कारण मला परदेशी जायचंय. माया परांजपे यांच्या ‘ब्युटिक’मधला ‘सिडेस्को’चा कोर्स करायचाय. अमेरिकेत बाबांकडं गेल्यावर गाणं आणि पार्लरचंही काम करायचं, असं माझ्या डोक्यात आहे.’
ती सांगते की, ‘कधीतरी घरी आल्यावर दिवसभराच्या कामाचा आढावा घेताना क्वचित कधीतरी आपण तेच तेच काम करतोय, असं वाटतं. पण प्रत्यक्ष काम करताना कधीच कंटाळा येत नाही. कधी घरी आल्यावर दमायला झालं तरी तिथं मी कधीच मरगळलेली नसते. मस्त फ्रेश असते. क्लाएंटला माझ्या कामामुळं आनंद मिळाला की मला समाधानी वाटतं. शिवाय काम केल्यावर प्रत्येकाची रिअँक्शन वेगवेगळी असते. काहीजणांना ते खूप आवडतं नि तेही माझ्याबरोबर एन्जॉय करतात. या मी प्रोफेशनमुळं बोलकी झाल्येय. आता माझं क्लाएंट सर्कल खूपच मोठं झालं असून सगळ्याजणी मत्रिणी झाल्यात. एक घरगुतीपणा आलाय.’ गप्पा संपतानाच ती उद्याच्या ऑर्डरची चेकलिस्ट तयार करायला घेते. फोनवरून पुढच्या ऑर्डर्स घेते. ही व्यवधानं सांभाळताना ती पंडित जसराज यांचं पुरिया धनाश्री रागातील ‘श्याम मुरारी..’ भजन नकळतपणं गुणगुणायला लागते. त्या सुरांत आपणही हरवतो.. आपसूकच..