विनय जोशी

..आणि २२ मार्च १९५७ या दिवसापासून भारतीय राष्ट्रीय  दिनदर्शिका (Indian National Calendar) ही आपल्या देशाची आणि पर्यायाने सगळय़ा भारतीयांची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका  झाली.

Mukta Barve danced with Laxmikant berde in the film Khatyal Sasu Nathal Sun
लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर जबरदस्त नाचली होती मुक्ता बर्वे, अवघ्या चार वर्षांची असताना झळकली होती ‘या’ लोकप्रिय चित्रपटात
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Abigail Lupi
फेनम स्टोरी: केअर गर्ल अबिगेल
baba kalyani
अग्रलेख: तीन पिढय़ांचा तमाशा!

सगळय़ा भारतीयांचे नवीन वर्ष कधी सुरू होते? म्हटलं तर सोपा आणि अवघड प्रश्न. भारतात जशी भाषा, वेशभूषा, खानपान यांच्यात विविधता आहे अगदी तशीच कालगणना आणि कॅलेंडरमध्ये देखील आहे. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात शालिवाहन संवत आणि बहुतांश उत्तर भारतात विक्रम संवत प्रचलित आहे. याचे नवीन वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याला होते. गुजरातमध्ये कार्तिक पाडव्याला नवीन वर्षांची सुरुवात होते. इतर काही राज्यांत सूर्याने निरयन मेष राशीत प्रवेश केल्यावर म्हणजे ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार १४ एप्रिलच्या आसपास वर्षांरंभ मानला जातो. हा दिवस पंजाबमध्ये बैसाखी, आसाममध्ये रोंगाली किंवा बोहाग बिहू, तमिळनाडूमध्ये पुथंडु, केरळमध्ये विशू, ओडिसात पाना संक्रांति  तर बंगालमध्ये पहेला वैशाख म्हणून साजरा होतो. या शिवाय काही राज्यांत स्थानिक भागात देखील वेगळी कालगणना आणि वेगळे वर्षांरंभ  आहेत. या सगळय़ा गोंधळात  अवघे भारतीय एकमेकांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देऊ शकतील असा दिवस कुठला? आता हा प्रश्न अवघड वाटू शकेल. पण सगळय़ा भारतीयांचा नववर्ष आरंभ दिन म्हणता येईल असा एक दिवस आहे. तो म्हणजे १ सौर चैत्र !! हा आहे आपल्या राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेचा पहिला दिवस.

 १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. युनियन जॅक जाऊन तिरंगा आपला राष्ट्रध्वज झाला. आपण रुपया हे चलन स्वीकारले. व्यवहारात दशमान पद्धती आली. राष्ट्रीय पक्षी म्हणून मोर, राष्ट्रीय प्राणी म्हणून वाघ, राष्ट्रीय फूल म्हणून कमळ घोषित करण्यात आले. याच धर्तीवर देशाचे राष्ट्रीय कॅलेंडर असावे असा विचार सुरू झाला. या उद्देशाने भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि प्राद्यौगिक अनुसंधान परिषदेने १९५२ मध्ये एक कॅलेंडर पुनर्चना समिती स्थापन केली. प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. मेघनाद साहा हे या समितीचे अध्यक्ष होते. देशातील  सगळय़ा  कालगणना पद्धतींचा अभ्यास करणे आणि  सगळय़ांना समान वाटेल अशी कालगणना सुचवणे हा या समितीचा उद्देश होता. असे राष्ट्रीय कॅलेंडर शास्त्रीयदृष्टय़ा अचूक असावे आणि ते व्यवहारात वापरणे शक्य असावे हा देखील समितीपुढील महत्त्वाचा मुद्दा होता.

समितीने भारतातील विविध पंचांगांचा सविस्तर अभ्यास केला. आणि १४ सप्टेंबर १९५४ ला आपला अहवाल  परिषदेला सोपवला. या अहवालात नमूद केलेली सौर दिनदर्शिका भारताच्या संसदेने कायद्याद्वारे स्वीकारली. आणि २२ मार्च १९५७ या दिवसापासून भारतीय राष्ट्रीय  दिनदर्शिका ((Indian National Calendar)) ही आपल्या देशाची आणि पर्यायाने सगळय़ा भारतीयांची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका  झाली.

राष्ट्रीय दिनदर्शिका ही ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे शुद्ध सौर सायन कालगणना आहे. मुळात हे पंचांग नाही, दिनदर्शिका आहे. त्यामुळे यात प्रतिपदा, द्वितीया अशा तिथी नसून एक ते एकतीस असे दिनांक आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री १२ वाजता दिवसाची सुरुवात होते. दिनदर्शिकेचे वर्ष हे सांपातिक आहे. वर्षांत ३६५.२४२२ दिवस होतात. वर्षमान जरी सौर असले तरी यात महिन्यांची नावे मात्र चैत्र, वैशाख अशी चांद्रमासांची ठेवली आहेत. मार्गशीर्षांचे नाव यात अग्रहायण असे आहे. यात वर्षमापनासाठी शालिवाहन शक घेतला गेला आहे. २२ मार्च १९५७  हा दिनदर्शिका स्वीकारण्याचा दिवस होता १ सौर चैत्र १८७९.

ग्रेगेरियन दिनदर्शिकेसुसार २२ मार्च म्हणजे १ सौर चैत्र हा राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या नवीन वर्षांचा पहिला दिवस.  ग्रेगेरियन दिनदर्शिकेप्रमाणे यात देखील दर चार वर्षांनी अधिक एक दिवस घ्यावा लागतो. व्यावहारिक सोयीसाठी जे ग्रेगेरियन वर्ष लिपवर्ष असते त्या वर्षांत सुरू होणाऱ्या राष्ट्रीय दिनदर्शिकेत ३६६ दिवस असतात. अशा वर्षी २२ मार्च ऐवजी २१ मार्चला नवे वर्ष सुरू होते. २०२४ हे लिपवर्ष असल्याने यंदा २१ मार्चला १ सौरचैत्र होते. राष्ट्रीय दिनदर्शिका आणि ग्रेगेरियन दिनदर्शिका दोन्ही सौर कालगणना असल्याने यांच्यातील दिवसांची जोडी कायम राहते. उदाहरणार्थ, भारतीय स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट हा २४ सौर श्रावण या दिवशी येतो तर प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी हा ६ सौर माघ या दिवशी येतो.

ग्रेगेरियन कॅलेंडरमध्ये १ जानेवारी हा वर्ष आरंभ दिन असण्याला खगोलीय आधार नाही, तसेच फेब्रुवारीचे दिवस २८/२९ आणि इतर महिन्यांचे दिवस ३०/३१  असण्याला देखील काही तर्क नाही. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही संपूर्णपणे खगोलशास्त्रावर आधारित आहे. १ सौर चैत्र हा वसंत संपात  दिन (vernal equinox) आहे. या दिवशी सूर्य बरोबर पूर्वेला उगवतो. सगळय़ा पृथ्वीवर दिनमान आणि रात्रमान समान असतात. उत्तर गोलार्धात वसंत ऋतूला सुरुवात होते. या नंतर तीन महिन्यांनी १ सौर आषाढ या दिवशी उत्तर गोलार्धात  सर्वात मोठा दिवस असतो (Summer solstice). सूर्य कर्कवृत्तावर येऊन दक्षिणायन सुरू होते. पुढे ३ महिन्यांनी शरद संपात दिनी (autumnal equinox) वर्षांचे  सहा महिने पूर्ण होऊन १ सौर अश्विन येतो. या वेळी सूर्य विषुववृत्तावर येत दिनमान आणि रात्रमान  समान असतात. उत्तर गोलार्धात शरद ऋतूची सुरुवात होते. ३ महिन्यांनी सूर्य मकर वृत्तावर येऊन उत्तरायणाची  सुरुवात होते. १ सौर पौष या दिवशी सर्वात मोठी रात्र असते (Winter solstice).अशा प्रकारे दर तिमाहीची सुरुवात निसर्गातील या चार महत्त्वपूर्ण खगोलीय घटनांशी सांगड घालणारी आहे.

सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे दिसत असताना त्याचा  आपल्या आकाशातील प्रवास मंदावतो. म्हणून या  काळातले सौर वैशाख ते सौर भाद्रपद हे सलग ५ महिने ३१ दिवसांचे आहेत. सूर्य विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे दिसत असताना सूर्याची पृथ्वीसापेक्ष गती जास्त भासते. म्हणून त्या काळातले  सौर अश्विन ते  सौर फाल्गुन हे महिने ३० दिवसांचे घेतले गेले आहेत. सौर चैत्र हा लिपवर्षांत ३१ दिवसांचा असतो. तसेच दिनदर्शिकेत ऋतुचक्राशी सांगड उत्तमरीत्या घातली गेली आहे. 

राष्ट्रीय दिनदर्शिका ही जगातली सगळय़ात शास्त्रीय आणि ऋतुचक्राशी पूरक दिनदर्शिका आहे असे म्हणता येईल. ती तिरंगा, राष्ट्रगीत यांच्यासारखीच आपले राष्ट्रीय प्रतीक देखील आहे. भारत सरकारचे सगळे व्यवहार, संसदेचे कामकाज हे तांत्रिकदृष्टय़ा भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाणे चालते. भारतीय राजपत्र, दूरदर्शन, आकाशवाणीने प्रसारित केलेल्या बातम्या यात देखील हिचा उल्लेख केला जातो. राष्ट्रीय सौर दिनांक चेकवर लिहिणे ग्राह्य आहे.

ही आपली अधिकृत राष्ट्रीय  दिनदर्शिका असली, तरी सर्वसामान्यांना हिच्याबद्दल फारशी माहिती नाही असे दिसून येते. दैनंदिन व्यवहारात ग्रेगेरियन दिनांकासोबत राष्ट्रीय दिनांक लिहिणे अशा काही सोप्या उपायातून  या विषयी जागृती होऊ शकते.  Indian National  Calendar हे  नि:शुल्क अँड्रॉईड अ‍ॅप  वापरून रोजचा सौर दिनांक सहज कळू शकतो. यंदा २१ मार्च पासून  १ सौर चैत्र १९४६ पासून नव्या राष्ट्रीय वर्षांची सुरुवात झाली. कागदोपत्री देशाची अधिकृत  दिनदर्शिका असणारी राष्ट्रीय दिनदर्शिका जनमानसात  देखील रुजावी ही सदिच्छा. आणि सर्व भारतीयांना नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!

viva@expressindia.com