शहर स्वच्छ ठेवण्यासाठी रात्रंदिवस घाणीत काम करणाऱ्या सफाई कामगारांपैकी अनेकांना अनारोग्यकारक परिस्थितीमुळे पन्नाशीच्या आतच मृत्यूला सामोरे जावे लागते. गेल्या सहा वर्षांत पालिकेच्या १३५६ कामगारांचा अशा पद्धतीने दुर्देवी अंत झाला आहे. हे मृत्यू रोखण्यासाठी कामगाराची दर महिन्याला आरोग्य तपासणी तसेच त्यांना अधिक चांगली आश्रयस्थाने देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली आहे.
कचरा काढण्यापासून गटारे, नाले साफ करण्यासाठी पालिकेत सुमारे ३५ हजार सफाई कर्मचारी आहेत. त्यातील काही कर्मचारी कंत्राटी पद्धतीवरही आहेत. या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेकडून साधने दिली जात असली तरी ती अपुरी असतात.
सतत कचरा, घाण, मैलामध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना १५-२० वर्षांतच आरोग्याच्या तीव्र समस्या जाणवतात. तंबाखू सेवन, दारू पिणे, ड्रग्ज घेणे यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र सफाई कामगार करत असलेल्या कामाचे स्वरूप पाहता प्रशासन त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसते, असे देवेंद्र आंबेरकर यांनी सांगितले. वीस वर्षे पूर्ण केलेल्या सफाई कामगारांना आश्रय योजनेखाली घरे उपलब्ध करून दिली जातात. मात्र सतत गटारांमध्ये काम करत असलेल्या अनेक कामगारांचा वीस वर्षांंपूर्वीच मृत्यू होतो. या सर्व कामगारांकडे पालिकेने संवेदनशीलपणे पाहायला हवे. त्यांची दर महिन्याला आरोग्यतपासणी केली जावी, त्यांना योग्य साधनांचा नियमित पुरवठा व्हावा तसेच त्यांच्या घरांची समस्या सोडवावी, अशी मागणी देवेंद्र आंबेरकर यांनी केली आहे.  

१३५६         कामगारांचे मृत्यू
२००९        – २६९
२०१०         – ३२२
२०११         – २६४
२०१२         – २२२
२०१३        – १८६
२०१४         – ९३  
(आतापर्यंत)