एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी महानगरपालिकेचा अध्र्याहून जास्त कर्मचारी वर्ग कामाला लागलेला असताना रस्ते, पाणी आणि नालेसफाई या शहराच्या मुख्य कामांकडे लक्ष पुरवताना अधिकाऱ्यांची त्रेधातिरपिट उडत आहे. आता मे महिना संपण्यास अवघा महिना उरला असताना नालेसफाईचे काम २० टक्क्यांपर्यंतच झाले आहे. त्यामुळे ८० टक्के काम महिनाभरात संपवण्याचे आव्हान पालिकेच्या यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.
दक्षिण भाग, पूर्व व पश्चिम उपनगरे यातील नालेसफाई तसेच मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम जोरदार सुरू आहे. या तिन्ही ठिकाणी मिळून तब्बल तीन लाख २० हजार मीटर लांबीचे नाले आहेत. त्यातील एक लाख ३० हजार मीटरचे नाले पश्चिम उपनगरात तर ९० हजार मीटरचे नाले पूर्व उपनगरात आहेत. या सर्व ठिकाणचा सुमारे तीन लाख ६५ हजार घनमीटर गाळ बाहेर काढायचा असून तो एकूण गाळाच्या ७० टक्के असेल. गेल्या आठवडय़ाच्या अखेपर्यंत यातील ७५ हजार घनमीटर गाळ पालिकेकडून काढण्यात आला असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.
मिठी नदीच्या साफसफाईची मोहीमही हाती घेण्यात आली आहे. तिच्या पात्रापकी १२ हजार मीटर पूर्व उपनगरात, चार हजार मीटर पश्चिम तर सहा हजार मीटर भाग दक्षिण भागात आहे. एकूण २२ हजार मीटर लांबीच्या या नदीतून अडीच लाख घनमीटर गाळ निघण्याची शक्यता आहे. या गाळापकी ५४ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.
मिठी छोटी पण गाळ मोठा..
संपूर्ण मुंबईतील मुख्य नाल्यांच्या तीन लाख २० हजार मीटर जाळ्याचा विचार करता मिठीचा विस्तार अगदीच कमी म्हणजे केवळ २२ हजार मीटर आहे. मात्र संपूर्ण मुंबईच्या नाल्यांमधील गाळाच्या दोन तृतीयांश भाग केवळ मिठी नदीत आहे. त्यामुळे मिठी नदी साफ करणे हे पालिकेसमोरील आव्हान ठरले आहे.