गेल्या अनेक वर्षांत क्षयरोगांबाबत नागरिकांमध्ये होत नसलेली जागृती आणि नागरिकांचे या व्याधीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे भारतामध्ये दर तीन मिनिटाला क्षयरोगाचे दोन रुग्ण म्हणजे जवळपास एक हजार रुग्ण रोज मृत्युमुखी पडतात. भारतामध्ये २.५ लाख एचआयव्हीने तर २० लाख लोक क्षयरोग एचआयव्हीने बाधित आहेत. नागपूर जिल्ह्य़ातील नागपूर ग्रामीण, उमरेड, सावनेर, रामटेक आणि काटोल या भागात १०२ लोक क्षयरोगामुळे निधन झाले आहे. एचआयव्ही क्षयरोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासकीय प्रयत्न केले जात असले तरी फारसे यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
जागतिक पातळीवर विचार केला एक तृतियांश लोकांना क्षयरोगाचा संसर्ग आहे. भारतातील ४० टक्के लोकसंख्या क्षयरोगाने संसर्गित आहे. एचआयव्ही संसर्गित व्यक्तीमध्ये क्षयरोग होण्याचा धोका हा साठ टक्के आहे तर सर्वसामान्य व्यक्तीमध्ये क्षयरोग होण्याचा धोका हा दहा टक्के आहे. भारतामध्ये ४० टक्के लोकसंख्या क्षयरोगाने संसर्गित आहे. संसर्गिक रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण भारतात मोठय़ा प्रमाणात असून त्यात क्षयरोगामुळे सर्वात जास्त मृत्यू होत असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग विभागाने दिली. एमडीआर टीबी ही नवी व्याधी क्षयरुग्णांमध्ये तीन टक्के व पुनर्उपचारावर आलेल्या रुग्णांमध्ये १२ ते १७ टक्के आढळून येतो. जिल्हा क्षयरोग केंद्राने दिलेली आकडेवारी ही देशाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे.
क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलोसीस या जंतुपासून होणारा रोग आहे. हे जंतू वातावरणातील हवेत असतात व श्वसनाद्वारे फुफ्फुसामध्ये ओढल्या जाऊन शरीरात क्षयरोगाचा संसर्ग होत असतो. हा संसर्गजन्य रोग हवेद्वारा पसरतो. त्यामुळे नागरिकांनी त्यातही विशेषत: मुलांनी काळजी घेण्याची गरज आहे. क्षयरोग हा सर्व व्यक्तींना होऊ शकतो. मात्र, अनुवांशिक नाही. दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी खोकला, ताप, भूक मंदावणे, वजन कमी होणे आणि खोकलताना रक्त येणे ही सर्व क्षयरोगाची लक्षणे आहेत. क्षयरोग हा केवळ वैयक्तिक रोग नाहीतर सामाजिक रोग सुद्धा असल्याचे दिसून येते. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर क्षयरोगावर उपचार करीत असताना समाजातील क्षयरोगाची समस्या कशी करता येईल किंवा यावर नियंत्रण कसे आणता येईल, असे समाज आणि शासन पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. क्षयरोग फुफ्फुसाचा आणि फुफ्फसेतर होत असतो. त्यात लसग्रंथी, मेंदू व मेंदूचे आवरण, फुफ्फुसाचा आवरणाचा क्षयरोग, हृदयआवरणाचा क्षयरोग, आतडय़ाचा क्षयरोग आणि हाडांचा क्षयरोग रुग्णांना होत असतो. त्यासाठी दोन पद्धतीने उपचार पद्धती आहे. त्यात पहिल्या विभागात २६ आठवडे आणि दुसऱ्या भागात ३४ आठवडे रुग्णांवर उपचार केले जातात. रुग्णांना एक दिवसाआड औषधोपचार हा ‘डॉट्स’ पद्धतीने दिला जातो. क्षयरोगाला आळा घालण्यासाठी जागतिक पातळीवर आरोग्य संघटनेच्या मार्फत प्रयत्न केले जात असले तरी त्याच्या नियंत्रणासाठी जनतेचे सहकार्य मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. खाजगी रुग्णालयात मोठय़ा प्रमाणात क्षयरोग आणि एचआयव्ही क्षयरोगाचे रुग्ण आढळून येतात. मात्र, त्यांची माहिती जिल्हा आणि शहर आरोग्य केंद्राला दिली जात नाही. जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन ग्रामीण भागातील खाजगी रुग्णालय क्षयरोगाच्या रुग्णांची माहिती देत नसल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मध्यमा चहांदे यांनी सांगितले.