रेल्वेतील गंभीर गुन्हे पोलिसांची डोकेदुखी ठरत असताना रेल्वेच्या विशेष कृती दलाने गेल्या दोन महिन्यांतील तब्बल २४ गंभीर गुन्ह्य़ांची उकल केली आहे.
दररोज लाखो लोकं रेल्वेतून प्रवास करत असतात. त्यामुळे येथे होणाऱ्या गुन्ह्य़ांचं प्रमाणही जास्त आहे. चोरी, पाकीटमारी, मोबाइल चोरी आदी गंभीर गुन्ह्य़ांचा त्यात समावेश आहे. या गुन्ह्य़ांचा तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष कृती दलाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१४ या मागील दोन महिन्यांतील तब्बल २४ गुन्ह्य़ांची तपास लावून आरोपींना अटक केली आहे. चोरांनी चोरलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. याबाबत बोलताना या विशेष कृती दलाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राहुल उडानशिव यांनी सांगितले की, अनेक गुन्हेगारी टोळ्या रेल्वेत कार्यरत आहेत. प्रवाशांना लुटण्याबरोबरच ते रेल्वेच्या मालमत्ताही चोरत असतात. प्रवाशांची बॅग कापून आतील सामान चोरणे, पाकीटमारी करणे याबरोबर मोबाइल लंपास करण्यात या टोळ्या आघाडीवर आहेत. आमच्या पथकाने अविरत परिश्रम करून या २४ गुन्ह्य़ांची उकल केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये महिलांचाही समावेश आहे. विशेष पथकातील एस. पी. चव्हाण, पी. डी. दळवी, एस. एम. गायकवाड, जी. आर. क्षीरसागर, ए. एन. थोरात आदींच्या पथकाने ही कारवाई केली.