स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलासांठी ५० टक्के आरक्षण जाहीर झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच पालिका निवडणुकीत ६५ टक्के महिला नवीन सभागृहात निवडून आल्या आहेत. त्यामुळे सभागृहात महिलाराज तर दिसणार आहेच. पण एखाद्या महिलांच्या प्रश्नावर सर्वपक्षीय मतभेद विसरुन ६० महिला रणरागिणीचे रूप धारण करू शकणार आहेत. नवी मुंबई पालिकेच्या नवीन सभागृहात १११ प्रभागांपैकी ५६ प्रभाग हे महिलांसाठी राखीव आहेत. यात विविध संर्वगातील महिला असून या वेळचे महापौरपद एखाद्या महिलेच्या वाटय़ाला येऊ शकणार आहे. ते अनूसूचित जातीसाठी राखीव आहे. या प्रवर्गातून सहा महिला निवडून आल्या आहेत. ५६ प्रभागांत महिला राखीव म्हणून आलेल्या महिला बरोबरच तुर्भे येथून शुभांगी पाटील, दिघा येथून अपर्णा गवते, तळवलीतील मोनिका पाटील, आणि घणसोलीतील सायली शिंदे ह्य़ा चार महिला पुरुषांच्या खुल्या प्र्वगातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे ही संख्या ६० नगरसेविकांची झाली आहे. त्यामुळे सभागृहात स्त्रीशक्ती दिसून येणार आहे. स्त्रीशक्तीत काँग्रेसची इभ्रत महिलांनी राखली असून या पक्षाच्या नऊ महिला नगरसेविका आहेत. महिलाराजबरोबर तरुणाईदेखील या वेळी १८ जण असून यात कोपरखैरणे येथील मेघाली राऊत या सर्वात तरुण नगरसेविका ठरणार आहेत तर उपमहापौर अशोक गावडे हे ज्येष्ठ नगरसवेक आहेत.