भाऊबीजनिमित्त मुंबईत येणाऱ्या आणि आसपासच्या शहरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन २५ ऑक्टोबर रोजी जादा बसगाडय़ा सोडण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. या दिवशी एकूण २०१ जादा बसगाडय़ा सोडण्यात येणार असून त्याचा प्रवाशांना फायदा होईल, असा विश्वास बेस्टकडून व्यक्त करण्यात आला आहे.
भाऊबीजेच्या दिवशी प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई शहर, पूर्व-पश्चिम उपनगरे, मीरा रोड, भाईंदर, मॅरेथॉन चौक, लोकमान्य नगर, कोपरी, दादलानी पार्क (ठाणे), रेतीबंदर-कळवा, वाशी, नवी मुंबई, कोपरखैरणे, कळंबोली, नेरूळ, ऐरोली, सीबीडी बेलापूर या ठिकाणी जाण्यासाठी विविध बसमार्गावर जादा बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दिवळीनिमित्त खरेदीसाठी जाणाऱ्यांच्या सोयीसाठी वीर कोतवाल उद्यान – प्लाझा (दादर), वांद्रे, महात्मा फुले मार्केट, काळबादेवी, एपीएमसी मार्केट, वाशी इत्यादी ठिकाणांहून १५ ते २१ ऑक्टोबर दरम्यान २५ जादा बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठी गर्दी असणाऱ्या बसथांब्यावर, तसेच रेल्वे स्थानकांबाहेरील बसथांनकावर बस निरीक्षकांची, वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या जादा बसगाडय़ांचा प्रवाशांनी  लाभ घ्यावा, असे आवाहन ‘बेस्ट’तर्फे करण्यात आले आहे.