संस्थांच्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या बहुतांश रुग्णवाहिका या चालकांच्याच ताब्यात असतात व त्यांनी रुग्णालयांशी व्यवस्थित संधान बांधलेले असते. कमीत कमी ४०० रुपयांपासून ते तीन ते चार हजार रुपयांपर्यंत शुल्क रुग्णांकडून आकारले जाते. विदर्भातून नागपुरात रुग्ण आणण्यासाठी साधारणत: तीन ते चार हजार रुपये घेतले जातात तर शहरातही हा आकडा हजारापर्यंत पोहोचल्याची उदाहरणे आहेत. रुग्ण पाठविणाऱ्या डॉक्टरला ३० टक्क्यांपर्यंत कमिशन दिले जाते तर एका रुग्णामागे रुग्णवाहिकेच्या चालकाला हजार ते दोन हजार मिळतात. चालकामार्फतच हे पैसे परस्पर डॉक्टपर्यंत पोहोचविले जातात. धंतोली, रामदासपेठ, शंकर नगर, खामला यासह शहरातील इतर भागातील रुग्णालये या सगळया प्रकारांमध्ये समाविष्ट असून वाहनचालकांचे त्यांच्याशी संगनमत असल्याचेही दिसून येते. उघडपणे कुणीही या विषयावर बोलावयास तयार नसले तरी खासगीत रुग्णवाहिकांचे वाहनचालक किंवा डॉक्टर्सही असे प्रकार घडत असल्याचे मान्य करतात.
रुग्णांची पळवापळवी किंवा रुग्णवाहिकांशी असलेले संधान यामध्ये कार्पोरेट पध्दतीने चालविली जाणारी रुग्णालये आघाडीवर आहेत. डॉक्टरांच्या वैयक्तिक नर्सिग होम्समधून असे प्रकार होत नाहीत असे नाही. मात्र, हे प्रमाण तुलनेने कमी आहे. एखाद्या डॉक्टरच्या वैयक्तिक नावावर रुग्णालय चालत असल्याने स्वत:ची प्रतिष्ठा जपण्यासाठी काही प्रमाणात का होईना पण रुग्णांची सरसकट लुबाडणूक करण्याचे टाळतात. परंतु, कार्पोरेट रुग्णालयांमधून ‘टार्गेट’ समोर ठेवून व्यवसाय होत असल्याने रुग्णवाहिकेच्या चालकांना दलाली देणे किंवा रुग्ण पाठविणाऱ्या डॉक्टरला त्याचा वाटा पोहोचता करणे हे प्रकार तेथे सर्रास चालतात.
रुग्णालये व रुग्णवाहिका यांच्यात होणारा व्यवहार हा साधारणत: वार्डबॉय, नर्सेस किंवा जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत असतो. रुग्ण पोहोचल्यावर संबंधित रुग्णालयाकडून पाठविणाऱ्या डॉक्टरला व्यवस्थित विचारणा करून कमिशन पोहोचविले जाते. अमुक एका ठिकाणी रुग्ण पोहोचविण्याऐवजी चालकाने दुसऱ्याच रुग्णालयात नेल्याचे प्रकारही घडले आहेत व यामागची ‘प्रेरणा’ ही नेहमीच आर्थिक असते हेही उघड आहे.
मंदार मोरोणे, नागपूर

महामार्गावरचे पोलीस किंवा टोल नाक्यांवरील लोकांनीही रुग्णवाहिकांशी संधान बांधलेले असते. अपघात होताच ठराविक रुग्णवाहिकेला संपर्क केला जातो व या समाजसेवेचा आर्थिक लाभ संबंधित व्यक्तीला इमानेइतबारे पोहोचविला जातो.