पूर्वी राजे-महाराजे मोठय़ा प्रमाणावर वन्यप्राणी बाळगत. त्यांची शिकारीच्या निमित्ताने हत्याही करत. संस्थानिकांच्या सामर्थ्यांचे गुणगानही त्याने किती प्राणी मारले यावर होत असे. मात्र या वृत्तीमुळे तसेच चोरटय़ा शिकारीमुळे पृथ्वीतलावरील अनेक प्राणी-पक्षी नष्ट झाले. त्यातील काही तर आता केवळ प्राणी संग्रहालयात पाहावयास मिळतात. पर्यावरणाच्या रक्षणासाठी पशू-पक्ष्यांचे संरक्षण गरजेचे आहे. या दृष्टीने शालेय जीवनापासून व्यापक स्वरूपात प्रयत्न होण्याची गरज अहमदाबाद येथील वन्यप्राणी संरक्षक आर. के. साहू यांनी मांडली.
येथील यशवंतराव महाराज पटांगणावर आयोजित वसंत व्याख्यानमालेत साहू यांनी ‘वन्यजीव व्यवस्थापन आणि माझे अनुभव’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. सर्वसाधारणपणे प्राणिसंग्रहालय म्हणजे वन्यजीवांचे कैदखाने, असा समज आहे. प्राणिसंग्रहालयात मात्र वन्यजीवांच्या संवर्धनाचे काम केले जाते. अलीकडे बिबटय़ांसारखे वन्यजीव शहरांमध्ये येऊ लागले आहेत. त्यांच्या या आगमनास मानवाचे अर्निबध वागणे कारणीभूत आहे. मानवाने मोठय़ा प्रमाणावर जंगलावर अतिक्रमण केले आहे. वाढत्या जंगलतोडीमुळे वन्यप्राण्यांची आश्रयस्थानेच नाहीशी होऊ लागली आहेत. जंगलात त्यांना मिळणारे खाद्यही त्यामुळे मिळेनासे झाले आहेत. वन्यप्राण्यांना संरक्षण देण्याची तसेच पर्यावरणरक्षणाची गरज आहे. भावी पिढीपर्यंत निसर्गाचा हा अमूल्य ठेवा कायम ठेवावयाचा असल्यास पर्यावरण संरक्षण आवश्यक झाले आहे. आज विविध कारणांनी जगातील अनेक पक्षी व प्राणी दुर्मीळ या श्रेणीत गणले जात असून त्यांचे दर्शन फक्त प्राणिसंग्रहालयातच होऊ शकते. किमान प्राणिसंग्रहालयांमुळे असे प्राणी, पक्षी सुरक्षित तरी राहू शकत आहेत. पशू-पक्ष्यांना वाचविले तरच निसर्ग वाचेल. या स्थितीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात केवळ विविध छायाचित्रांच्या माध्यमातूनच मुलांना प्राणी व पक्षी यांची माहिती द्यावी लागेल, असा इशारा साहू यांनी दिला.
या वेळी पडद्यावर गुजरातमधील प्राणिसंग्रहालय, फुलपाखरू-उद्यान, सर्प-उद्यान यांचे चित्रण दाखविण्यात आले. अहमदाबाद येथील प्राणिसंग्रहालयाची माहितीही साहू यांनी दिली. १४ व्या शतकात तयार करण्यात आलेल्या काकडिया तलावाभोवती प्राणिसंग्रहालय उभे करण्यात आले आहे. या संग्रहालयात वेगवेगळी उद्याने विकसित करण्यात आली आहेत. संग्रहालयात प्राण्यांना वा पक्ष्यांना सहजता वाटावी यासाठी नैसर्गिक वातावरणनिर्मिती केली जाते. त्यामुळेच वन्यजीवांची संख्या वाढल्यानंतर त्यांना जंगलात सोडणे सहज शक्य होते, असे साहू यांनी सांगितले.