जवळपास १२ ते १४ वर्षांपासून शासकीय आश्रमशाळांमध्ये तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या रोजंदारी शिक्षकांच्या प्रश्नाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ येथील आदिवासी विकास भवन कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी आदिवासी विकास मंत्र्यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. ३० डिसेंबर रोजी या विषयावर बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तथापि, आंदोलकांनी सकारात्मक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. सुमारे २५० किलोमीटर पायपीट करून आलेल्या मोर्चेकऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला असून सात जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. दुसरीकडे आंदोलनामुळे गडकरी चौक ते त्र्यंबक नाका मार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने शहरवासीयांची दमछाक होत आहे.
आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत असलेल्या राज्यातील ५५२ आश्रमशाळांमध्ये रोजंदारी अथवा तासिका तत्त्वावर नियुक्त केलेल्या शिक्षकांना दिवसाचे ७५ रुपये वेतन दिले जाते. रोजंदारीवरील शिक्षकांना कायम करावे या मागणीसाठी वारंवार आंदोलने करूनही दखल घेतली जात नसताना या विभागाने शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली. या विरोधात रोजंदारी शिक्षकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाच्या आदेशाकडे आदिवासी विकास विभागाने दुर्लक्ष केले. रोजंदारी शिक्षकांना कायम करण्याच्या प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने नाशिक विभागाच्या अंतर्गत आश्रमशाळेतील शिक्षकांनी बिऱ्हाड मोर्चा काढला. १८ डिसेंबरपासून पायी चालत निघालेले शेकडो मोर्चेकरी मंगळवारी नाशिक येथे पोहोचले. तेव्हापासून त्यांनी आदिवासी विकास विभागाच्या मुख्यालयासमोर ठिय्या दिला आहे. प्रारंभीचे दोन दिवस आंदोलनाची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. शेकडो किलोमीटर पायी चालत आलेले मोर्चेकरी थंडीचा फटका सहन करत आहे.
यामुळे विलास पाडवी, सविता वळवी, मंदाकिनी वळवी यांचा दीड वर्षांचा मुलगा, ताईबाई तडवी, एस. पी. गावित व आर. टी. ठाकूर यांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले. गुरुवारी संघटनेच्या प्रतिनिधींशी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. ३० डिसेंबर रोजी या विषयावर बैठक बोलावून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. परंतु, आंदोलकांनी बैठकीतील निर्णय पाहून आंदोलन मागे घ्यायचे की सुरू ठेवायचे हे ठरविले जाईल अशी भूमिका घेतली आहे.
आदिवासी विभागाच्या मुख्यालयावर जवळपास ४०० ते ५०० आंदोलकांनी पत्नी व मुला-बाळांसह ठिय्या दिला आहे. या संदर्भात योग्य तो निर्णय न झाल्यास घरच्या इतर मंडळींनाही आंदोलनात सहभागी करण्याचा इशारा त्यांनी दिला. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गडकरी चौक ते त्र्यंबक सिग्नल या मार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. वाहतूक बंद असल्याने वाहनधारकांना नाहक अन्य पर्यायी मार्गाने मार्गक्रमण करावे लागत आहे.