पुसद येथील अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका प्रेमीयुगलाची रेणूकेच्या माहूर येथील रामगडावरील हत्तीखान्यात धारदार शस्त्राने अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना गुरुवारी पहाटेस उघडकीस आली. शाहरुख खान फिरोज पठाण (२३,रा. उमरखेड) आणि निलोफर मारिीाा खलीद बेग मिर्झा (२०,रा. फुलसावंगी, ता. महागाव) अशी हत्या करण्यात आलेल्या प्रेमी युगलाची नावे आहेत.
हे दोघेही पुसद येथील अनुक्रमे  खासगी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. घटनेच्या दिवशी शाहरुख हा एमएच २९/३७७० या कारने पुसदला आला. दुपारी १२ वाजता प्रेयसी निलोफरला घेऊन तो माहूरजवळील रामगड किल्ला पाहण्यासाठी गेला. सायंकाळ होऊनही परत का आला नाही म्हणून दोघांचा नातेवाईकांनी मोबाईलवर संपर्क केला असता तो बंद आढळून आला. त्यामुळे पोलिसांना माहिती देऊन नातेवाईक माहूरकडे रवाना झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ठाणेदार अरुण जगताप, सहा. पोलीस निरीक्षक जगदीश गिरी, अनिल जाधव, प्रियंका वासनिक यांनीही घटनास्थळावर धाव घेतली. उभ्या असलेल्या टाटा इंडिका कारवरून अंदाज घेत पोलिसांनी रामगड किल्ल्यात शोध मोहीम सुरू केली असता समजले की, या दोघांच्या मागे तीन युवक त्याच दिशेन गेले आणि परत आलेले होते. रात्र झाल्याने पुन्हा गुरुवारी सकाळी पोलिसांनी शोध सुरू केला.  रामगडच्या हत्तीखान्यापासून 40 ते 45 फुट अंतरावर अरुंद पायवटेवर एका झुडुपात शाहरुख आणि निलोफर या दोघांचेही मृतदेह आढळून आले. शाहरुखच्या डोक्यावर व मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे, तर निलोफरच्या डोक्यावरही आरपार वार केल्याचे पोलिसांना दिसून आले.
पंचनामा करुन दोघांच्याही मृतदेहांना  माहूर ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. उच्चशिक्षण घेत असलेल्या प्रेमीयुगलाच्या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. निलोफरच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून माहूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अरुण जगताप, प्रवीण शेळके, पी.एम. गेडाम, पी.एन करडेवार हे पोलीस अधिकारी करीत आहेत.