भारतीय स्वातंत्र्य लढयास जगभरातून पाठिंबा मिळत होता. स्वातंत्र्यासाठीच्या या लढाईत त्यावेळी परदेशात राहणाऱ्या भारतीयांचेही फार मोठे योगदान होते. आझाद हिंद सेनेत लेफ्टनंट म्हणून कामगिरी बजावलेले अंबरनाथ येथील प्रीतमसिंग गुणवंतसिंग गिल त्यापैकीच एक. गेल्याच महिन्यात आपला ९५ वा वाढदिवस साजरा केलेल्या प्रीतमसिंग यांना अजूनही देशप्रेमाने भारलेला तो काळ लख्खपणे आठवतो. त्यांचा जन्म मलेशियाचा. सुभाषचंद्र बोस यांनी केलेल्या ‘तुम मुझे खून दो, मै तुम्ही आझादी दुंगा’ या आवाहनाला प्रतिसाद म्हणून त्यावेळी आशियाई देशांमधील अनेक भारतीय आझाद हिंद सेनेत भरती झाले. ज्यांना सेनेत भरती होणे शक्य झाले नाही, त्यांनी पैसे दिले. त्यातून आझाद हिंद सेनेसाठी इतका पैसा जमा झाला की, सिंगापूरमध्ये आझाद हिंद सेनेच्या नावाने स्वतंत्र बँक स्थापन करावी लागली, या आठवणीला प्रीतमसिंग यांनी ‘लोकसत्ता ठाणे’ शी बोलताना उजाळा दिला.
आझाद हिंद सेनेत पुरवठा विभागात प्रीतमसिंग यांची नेमणूक झाली होती. त्याचकाळात सुभाषचंद्र बोस यांना भेटण्याची, तसेच त्यांचे विचार ऐकण्याची संधी त्यांना मिळाली. त्या सोनेरी क्षणांचे साक्षीदार होता आले, याबाबत ते स्वत:ला भाग्यवान समजतात.
दुसऱ्या महायुद्धात आझाद हिंद सेनेने ब्रह्मदेशापर्यंत मुसंडी मारली होती. पुढे हिरोशिमा-नागासाकी शहरांवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्यावर जपानचे अवसान गळाले आणि दुसऱ्या महायुद्धाचे पारडे फिरले. इंग्रजांनी पुन्हा उचल खाल्ली. याचकाळात प्रीतमसिंग गिल यांना अटक होऊन त्यांची रवानगी रंगून येथील कारागृहात झाली. एक वर्ष शिक्षा भोगल्यानंतर त्यांची सुटका झाली. त्यानंतर १९४६ मध्ये ते भारतात आले. त्यावेळी त्यांच्या एका दूरच्या बहिणीने त्यांना त्यांचे पंजाबमधील मूळ गाव दाखवले. पंजाबमधील मोगा जिल्ह्य़ातील मेहना पराव गावात मग ते काही काळ राहिले. पूर्वजांच्या घराची त्यांनी डागडुगी केली. प्राथमिक शिक्षण मलेशियात पूर्ण केलेल्या प्रीतमसिंग यांचे पुढील बारावीपर्यंतचे शिक्षण मात्र नागपूरमध्ये झाले. पुढे गृहरक्षक दलात नोकरी नोकरी केलेल्या प्रीतमसिंग यांची कर्मभूमीही महाराष्ट्रच राहिली. राज्यात ठिकठिकाणी त्यांनी गृहरक्षक दलात सेवा बजावली. १९८१ मध्ये सेवा निवृत्त झाल्यानंतर ते अंबरनाथमध्ये स्थायिक झाले.