महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेण्याच्या अगणित घटना अव्याहतपणे घडत असताना त्यात आता तोतया पोलिसांकडून महिलांची लुबाडणूक होण्याच्या घटणांची भर पडत आहे. पोलीस असल्याचे भासवत महिला व वयोवृद्धांकडील दागिने लंपास करण्याचे प्रकार रोखण्यासाठी अशा तोतया पोलिसांपासून सावध राहण्याचे आवाहन नवनियुक्त पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी केले आहे. तोतया पोलिसांकडून खोटी माहिती देऊन नागरिकांची दिशाभूल केली जाते. वास्तविक, पोलीस यंत्रणा अशा पध्दतीने कधी काम करत नाही. यामुळे तोतया पोलिसांच्या बोलण्याला बळी न पडता त्याबाबतची माहिती पोलीस ठाण्यास कळवावी असेही आवाहन करण्यात आले आहे. वेगाने धावणाऱ्या दुचाकींच्या सहाय्याने महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेण्याचे मागील तीन ते चार वर्षांत शेकडो प्रकार घडले आहेत. कोटय़वधी रुपयांचे सोन्याचे दागिने या घटनांमधून लंपास झाले. फारशी वर्दळ नसलेल्या रस्त्यांवर पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आधी अशा घटना घडत असत. आता चोरटय़ांची हिंमत प्रमुख रस्ते वा वर्दळीच्या भागातुन दागिने गायब करण्यापर्यंत वाढल्याचे लक्षात येते. साधारणत: वर्षभरापूर्वी पतीसमवेत दुचाकीवर निघालेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने खेचण्यास चोरटय़ांनी मागे पुढे पाहिले नाही. त्यावेळी दुचाकीवरून पडल्याने महिला गंभीर जखमी झाली होती. हे प्रकार सातत्याने घडत असताना दागिने पळविण्यासाठी चोरटय़ांनी पोलीस असल्याची बतावणी करण्याचा मार्ग स्वीकारला. आम्ही पोलीस आहोत, पुढे दंगल सुरू आहे, पुढे खून झाला आहे, पुढे वाद सुरू आहेत असे सांगत संबंधितांनी आपले दागिने काढून सुरक्षित ठेवा अशी दिशाभूल करून दागिने पळविले. काही घटनांमध्ये तोतया पोलिसांनी तुमच्याकडे अंमली पदार्थ आहेत, तुमची झडती घ्यायची असल्याचे सांगत फसवणूक केली.
दुचाकीवरून येत पायी चालणाऱ्या महिलांचे दागिने खेचून नेण्याचे प्रकार रोखण्यात पोलीस यंत्रणेला यश आले नाही. शहर पोलिसांचे दुचाकी वाहनधारी ‘बिट मार्शल’ पथक कार्यान्वित असले तरी त्यांनी सोनसाखळी चोरटय़ांना पकडले असे ऐकिवात नाही. ज्या ठिकाणी या पथकाची खरी निकड असते, तिथे ते अपवादाने दृष्टीपथास पडतात. महाविद्यालयीन तरुण-तरुणी जिथे भ्रमंती करतात, तिथेच बिट मार्शलची अधिक तपासणी सुरू असते असे चित्र आहे.
आयुक्तांनी या आवाहनाव्यतिरिक्त पोलीस यंत्रणेलाही कार्यप्रवण केल्यास या घटनांना पायबंद घालता येईल अशी सर्वसामान्यांची भावना आहे.