आरोग्य सेवेच्या नावाखाली मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांचा मुंबईत सुळसुळाट झाला असून अशा डॉक्टरांना वेसण घालण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी संपूर्ण मुंबईत तपासणी सत्र सुरू होणार असून दोषींवर पोलिसी कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर बोगस डॉक्टरांनी आपापले दवाखाने थाटले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून झोपडपट्टय़ा, बकालवस्त्यांमध्ये हे डॉक्टर दवाखाने चालवित आहेत. हाती पैसा नसल्यामुळे झोपडपट्टीवासी अथवा मोलमजुरी करणारे अनेक जण अशा डॉक्टरांकडे जाणे पसंत करतात. मात्र अनेक वेळा या डॉक्टरांचा उपचार त्यांच्यासाठी जीवघेणाही ठरतो. त्यामुळे आता बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घालण्यासाठी लवकरच पुनर्विलोकन समितीची स्थापना करण्यात येणार आहे. पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना या बैठकीमध्ये बोगस डॉक्टरांबाबत माहिती सादर करावी लागणार आहे. संशयित डॉक्टरशी संपर्क साधून त्याच्या व्यवसायाचा संपूर्ण पत्ता, दवाखान्याचे छायाचित्र, डॉक्टरची शैक्षणिक पात्रता आणि महाराष्ट्र राज्य कौन्सिलकडे केलेल्या नोंदणीची प्रत घेण्याचे आदेश प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांना संबंधित ठिकाणी संपर्क साधून डॉक्टरने केलेल्या नोंदणीबाबत खातरजमा करावी लागणार आहे. या चौकशीमध्ये संबंधित डॉक्टर बोगस असल्याचे निदर्शनास आल्यावर त्याच्याविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार आहे. एखाद्या विभागात एकापेक्षा अनेक बोगस डॉक्टर आढळून आल्यात प्रत्येकाविरुद्ध पोलीस ठाण्यात वैयक्तीक तक्रार नोंदविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. इतकेच करून अधिकाऱ्यांची सुटका होणार नाही तर कौन्सिलकडे पाठविलेल्या प्रकरणांचा, तसेच पोलिसात केलेल्या तक्रारीचा आढावा घेण्याची जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची तपशीलवार माहिती पुनर्विलोकन समितीच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना सादर करावी लागणार आहे.
१० नोव्हेंबपर्यंत मुदत
डॉक्टरांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (अ‍ॅलोपथी), महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन (आयुर्वेद युनानी व सिद्ध), महाराष्ट्र होमिओपॅथी कौन्सिल (होमिओपॅथी), महाराष्ट्र स्टेट डेन्टल कौन्सिल (दंतचिकित्सा) यापैकी संबंधित संस्थांमध्ये नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबईतील ठिकठिकाणच्या दवाखान्यांमध्ये जाऊन डॉक्टरांनी नोंदणी केली आहे का याची खातरजमा पालिका अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. ही सर्व माहिती १० नोव्हेंबपर्यंत आरोग्य विभागाकडे सादर करावी लागणार आहे. आरोग्य विभागाने एक परिपत्रक जारी करून डॉक्टरांविषयीची माहिती सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशाची खबरबात अनेक बोगस डॉक्टरांना मिळाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.