एक हजार रुपयांच्या बनावट नोटा खऱ्या  असल्याचे भासवत बँकेच्या चलनात भरणा केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या एका घटनेत डेबिट कार्ड हॅक करून संबंधिताच्या खात्यातील ९९८४३ रुपये काढून घेत फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट नोटा चलनात भरण्याचा प्रकार गंगापूर रस्त्यावरील सारस्वत बँकेच्या शाखेत घडला. कोणी तरी या नोटा खऱ्या असल्याचे भासवत त्या चलनात आणण्याचा प्रयत्न केला. तपासणीअंती या नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी बँकेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना आयसीआयसीआय बँकेच्या खातेदाराबाबत घडली.
त्याचे शरणपूर रस्त्यावरील या बँकेत खाते आहे. त्याचे डेबिट कार्ड हॅक करून त्यातील ९९ हजार रुपयांहून अधिक रक्कम काढून घेण्यात आली. या प्रकाराने चक्रावलेल्या खातेदाराने पोलिसांकडे धाव घेतली. या तक्रारीवरून माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.