उन्हाळ्याच्या सुटय़ा लागल्या की, आपसूकच पावले नागझिरा आणि नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने वळतात. गेल्या वर्षभरात पर्यटनाचा तपशील बघितल्यास मुख्यमंत्र्यांच्या पत्नी, व्हीआयपी राजकारणी, उद्योगपती आणि मराठी सिनेतारकांनीही येथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतला.
नागझिरा आणि नवेगावबांधसाठी गेल्या काही वर्षांतील २०१२-१३ हे वर्ष इको-टुरिझमकडे वाटचाल करणारे ठरले आहे. नागझिरा आणि न्यू नागझिरात या वर्षांत १ एप्रिल ते ३१ मार्चपर्यत ५० हजार ५३२ पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद आहे. न्यू नागझिरात ३ हजार २५५ पर्यटक येऊन गेले. यासोबत नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचे नसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी २ हजार ९२३ पर्यटक आले, तर उद्यानाच्या बाजूला असलेला मालडोंगरी तलाव, विविध जातींचे पक्षी बघण्यासाठी येथील विश्रामगृहाला एक लाख पर्यटकांनी भेट दिली.  नागझिऱ्यात ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्यशीला चव्हाण, रोहयोमंत्री डॉ.नितीन राऊत, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटले, वर्षां पटेल, अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख, वनविभागाचे सचिव प्रवीण परदेशी, डब्ल्युसीटीचे संचालक अनिश अंधेरिया, तसेच मराठी चित्रपटतारका मृणाल कुलकर्णी, आदेश बांदेकर यांनीही येथे कुटुंबासह भेटी दिल्या आहेत. या पर्यटनाने गाईड, वाहनचालक आणि पर्यटकांना आकर्षति करण्यासाठी सेवा पुरविणाऱ्या संस्था, बचतगट आणि विक्रेत्यांनाही रोजगार मिळाला आहे.
राज्यात ताडोबानंतर नागझिरा आणि नवेगावबांध अभयारण्याचे आकर्षण कायम असल्याचा तपशील सांगतो. येथील वनसंरक्षक व संबंधित यंत्रणेमुळे येथे येणारा पर्यटक काही तरी कॅमेरात कैद करूनच जातो. नुकत्याच अल्फा वाघिणीने तीन बछडय़ांना दिलेला जन्म आणि या बछडय़ांच्या हालचाली टिपण्यासाठीही पर्यटकांनी गर्दी केलेली आहे. लाखो रुपयांचे उत्पन्नही यातून वनविभागाला मिळाले आहे. ही संख्या वाढविण्यासाठी पर्यावरणपूरक साधनांची निर्मितीकडे अभयारण्याचे व्यवस्थापन काटेकोरपणे लक्ष देत असल्याचे पर्यटकांचे हीत जोपासणारा प्रत्येक अधिकारी कर्मचारी सांगत आहे.
अभयारण्याच्या परिसरातील गावांना वन्यजीव आणि जंगलाचे संरक्षण व्हावे, याकरिता विविध सामाजिक संस्था आणि वनविभागाच्या संयोगाने शिबिराचे आयोजन करण्यात येते. गेल्या वर्षभरात शालेय विद्यार्थी, युवक व नागरिकांना या मोहिमेत जोडण्यासाठी १२ निसर्ग शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यातून पर्यावरणप्रेमी नागरिक घडविण्याचा संकल्प वनविभागाचा होता. नागझिरा आणि नवेगावबांध अभयारण्यात वनविभागाने बौद्ध पौर्णिमा म्हणजेच शनिवार २५ मे रोजी प्राणीगणना आयोजित केली आहे. पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पाणवठय़ावर येणाऱ्या प्राण्यांचा निश्चित आकडा मिळेल. त्यामुळे या दिवशी अभयारण्यात पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.