स्वप्ने हा जगण्याचा आधार असतो. दीर्घ आजारांशी लढत असलेल्या मुलांनाही त्यांच्या भावविश्वातली सर्वात सुंदर गोष्ट, त्यांनी पाहिलेली स्वप्नं प्रत्यक्षात आणता यावीत यासाठी शहरातील काही संस्था मदतीचा हात देत असतात. मेक अ विश फाउंडेशन ही त्यापकीच एक. भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिलेल्या दोन मुलींची इच्छा शुक्रवारी पूर्ण करण्यात आली. महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात या छोटय़ा डॉक्टरांनी रुग्णांची भेट घेत आपले स्वप्न प्रत्यक्षात आल्याचे सुख अनुभवले.
भविष्याची स्वप्ने पाहणे हा आशेचा किरण असतो. नवी मुंबई येथील पालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आरती सूर्यवंशी या दहा वर्षांच्या मुलीला डॉक्टर व्हायचे आहे. तिची ही इच्छा मेक अ विश फाउंडेशनच्या एका कार्यकर्त्यांला समजली. त्यानंतर पालिकेच्या टिळक रुग्णालयाशी संपर्क साधण्यात आला. पालिकेच्या एवढय़ा मोठय़ा रुग्णालयात डॉक्टरांसारखाच अ‍ॅप्रन घालून व स्टेथोस्कोप गळ्यात अडकवून वॉर्डमध्ये फिरताना, रुग्णांची विचारपूस करताना आरतीला खूप छान वाटले. मी तिसरीत असतानाच ठरवले की मला डॉक्टर व्हायचे आहे. आता मी पाचवीत आहे, असे राजा छत्रपती शाहूमहाराज शाळेत शिकत असलेल्या आरती सूर्यवंशीने सांगितले.  आरतीच्या जोडीने आणखीही एका मुलीने डॉक्टर होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात अनुभवले. मात्र तिचे नाव जाहीर करण्याची पालकांची इच्छा नाही.
फाउंडेशनकडून आम्हाला या मुलीची इच्छा समजली आणि आम्ही लगेचच होकार दिला. मुलांना स्वप्न पाहण्यासाठी व ती पूर्ण करण्यासाठी नेहमीच पािठबा द्यायला हवा असे टिळक रुग्णालयातील बालरोग विभागप्रमुख डॉ. ममता मंगलानी म्हणाल्या. असाध्य आजाराचा सामना करत असलेल्या मुलांना स्वप्नांची, त्यांच्या प्रत्यक्षात येण्याचे त्यांच्या भावविश्वातली सर्वात आवडती गोष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करत असलेल्या मेक अ विश फाउंडेशनने आतापर्यंत अनेक मुलांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत.