रंगपंचमीला होणाऱ्या रंगांच्या सामन्यांसाठी येवल्यात तयारी सुरू झाली असून शहराचे वैशिष्टय़े असलेले हे पारंपरिक सामने ११ मार्च रोजी रंगणार असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर झळके यांनी दिली
‘पैठणी’साठी प्रसिध्द असलेले येवला पतंगोत्सव आणि रंगपंचमीच्या दिवशी होणाऱ्या रंगांच्या सामन्यांसाठीही प्रसिथ्द आहे. रंगांच्या सामन्यांची चर्चा आता सर्वदूर झाल्याने हर्ष आणि उत्साहयुक्त असे हे सामने पाहण्यासाठी येवल्यात इतर ठिकाणांहूनही अनेक जण येत असतात. टिळक मैदानावर सायंकाळी पाच वाजता आणि नंतर लगेचच दारूगुत्ता रस्त्यावर हे सामने होतील. या उत्सवाचे पावित्र्य जपले जावे, कायदा व सुव्यवस्थेला बाधा येऊ नये, यासाठी एक आचारसंहिताही ठरविण्यात आली आहे. त्यानुसार दुकानावर किंवा दुकानांच्या फलकांवर, भिंतीवर, घरावर रंग टाकू नये, रंगाचे सामने खेळताना पत्राचा डबा, बादली न वापरता प्लास्टिकचे डबे किंवा बादली वापरणे, शर्ट फाडून विजेच्या तारेवर किंवा इतरत्र फेकू नये, हेतुपुरस्सर महिलांवर पाण्याचे फुगे टाकू नयेत, रंगांचे सामने बघणासाठी आलेल्या पर्यटकांवर रंग टाकू नये, रंग खेळण्यासाठी बळजबरी करू नये, नैसर्गीक रंग व खात्रीशीर रंगाचाच वापर करणे, या कलमांचा रंगपंचमी उत्सव समितीने ठरवून दिलेल्या आचारसंहितेत समावेश आहे.
अनेक वर्षांपासून शहरात रंगांचे सामने अतिशय शांततेत होत असून शहरातील सर्वच नागरिकांचे सहकार्य आणि भूमिका त्यासाठी महत्वपूर्ण ठरत आहे. हे सामने खेळताना कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही. शहराची बदनामी होणार नाही, यासाठी येवलेकर कटाक्षाने लक्ष ठेवून असतात. शहरातील ज्येष्ठांसह युवावर्गाकडून त्यांना मिळणारे सहकार्य त्यासाठी महत्वपूर्ण मानले जात आहे.
या सामन्यांमध्ये प्रामुख्याने नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात येत असल्याने त्याचा कोणताही विपरित परिणाम त्वचेवर होत नाही. रंगांचे सामने पाहण्यासाठी पर्यटकांनी शहरात येण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.