नवी मुंबई पालिका क्षेत्र तसेच प्रस्तावित विमानतळ प्रभाव क्षेत्रात खूप मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असल्याची कबुली देताना यानंतर सिडको अशा बांधकामांच्या विरोधात सर्वप्रथम गुन्हे दाखल करून त्यांनतर कारवाई करणार असल्याचे संकेत मंगळवारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी दिले. त्यासाठी बीडमध्ये वाळू माफियांच्या विरोधात उभे ठाकलेले प्रशासक सुनील केंद्रेकर यांची विशेष नियुक्ती करण्यात आली असून अनधिकृत बांधकामे करणारे किंवा त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्यास मला आनंद वाटेल असे केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे कळविण्यासाठी या वेळी व्हाट्स अ‍ॅप या संदेशप्रणालीचा वापर करण्यात आला आहे.

नवी मुंबई, पनवेल, उरण या सिडकोनिर्मित क्षेत्राबरोबरच आता नयना क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. उघडय़ा डोळ्याने ही बांधकामे इतकी वर्षे पाहणाऱ्या सिडकोने उशिरा का होईना आता या प्रश्नाकडे लक्ष देण्याचे ठरविले असून त्यासाठी सक्षम असा विभाग तयार करण्यात आला आहे. केंद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक विकास अधिकारी, दोन साहाय्यक विकास अधिकारी, दोन सर्वेक्षक, आठ आरेखक, ११ पोलीस शिपाई, चार सुरक्षा रक्षक आणि २५ खासगी सुरक्षा रक्षकांचे पथक तयार करण्यात आले असून आवश्यकतेनुसार स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेतले जाणार आहे. सिडकोने या वर्षी पालिका क्षेत्रातील २५० पालिका क्षेत्र वगळून ७५ आणि नयना क्षेत्रातील ५१ अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिलेल्या असून ९८ बांधकामांवर कारवाई केली आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण भागातील गावांत सध्या फिफ्टी फिफ्टी तत्त्वावर मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामांच्या नावाखाली टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत.
त्यांच्यावर कारवाई करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले असून गावाजवळील दोनशे मीटर बाहेर उभ्या राहिलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे तळवळी, घणसोली, गोठवली, कोपरी, या गावांच्या बाहेर उभ्या राहिलेल्या चाळी इमारतींवर सिडकोचा लवकरच बुलडोझर चालविला जाणार आहे. त्यासाठी या बांधकामांवर प्रथम एफआयआर दाखल केला जाणार असून त्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचे केंद्रेकर यांनी स्पष्ट केले. गो. रा. खैरनार यांच्यानंतर केंद्रेकर यांच्याकडे या विभागाचा स्वतंत्र भार दिला गेला असून कारवाई करताना छोटा-मोठा, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असे केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.