विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ात काँग्रेसची पुरती वाट लावण्याचे काम मतदारांनी केले. एकूण १५ जागांपैकी काँग्रेसला केवळ दोनच जागांवर विजय मिळविता आली. विशेष म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील या पक्षाला पराभव स्वीकारावा लागलेल्या मतदारसंघांमध्ये केवळ एकाच जागेवर दुसरे स्थान मिळाले. अन्यथा तिसऱ्या स्थानापासून पाचव्या क्रमांकापर्यंत या पक्षाची घसरण झालेली आहे. मालेगाव मध्य या मतदारसंघात माजी आमदार रशिद शेख यांचे पुत्र आसिफ आणि इगतपुरीत निर्मला गावित यांनी थोडीफार काँग्रेसची लाज राखण्याचे काम केले.
निवडणुकांचे बिगूल वाजल्यावर राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचे या वेळी पानिपत होणार, असा अंदाज बहुतेकांनी व्यक्त केला होता. १५ वर्षांपासून सत्तास्थानी असलेल्या आघाडी सरकारविषयी जनतेच्या मनात प्रचंड रोष असल्याने त्यांना पायउतार व्हावे लागणार हे काही वाहिन्यांनी केलेल्या निवडणूकपूर्व चाचण्यांमधूनही स्पष्ट झाले होते. त्यामुळे काँग्रेसची उमेदवारी नको म्हणून सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणूक निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पुरती वाताहत झाल्याचे दिसून आले. नाशिक जिल्हय़ातही त्यांची अवस्था बिकट झाली. अर्थात मागील निवडणुकीतही त्यांच्या खात्यावर दोनच जागा होत्या. त्यात कोणताच बदल झाला नसला तरी चांदवड मतदारसंघाच्या रूपाने एक जागा अधिक मिळण्याची काँग्रेसला अपेक्षा होती. परंतु तीही फोल ठरली.
इगतपुरीत निर्मला गावित यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला असला तरी त्यासाठी त्यांना खूपच झगडावे लागले. त्यांचे मताधिक्य केवळ १० हजार ३३७ मतांचे राहिले. काँग्रेसला मालेगाव मध्य मतदारसंघात दुसरे यश मिळाले. माजी आमदार रशिद शेख यांचे पुत्र आसिफ यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार मौलाना मुफ्ती यांच्यावर मात केली. या मतदारसंघातही प्रारंभी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले मौलाना हेच विजयी होतील, अशी परिस्थिती होती, परंतु प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात परिस्थिती पूर्णपणे पालटली. या दोन मतदारसंघांव्यतिरिक्त काँग्रेसने चांदवडमध्ये बऱ्यापैकी लढत दिली. येथे शिरीषकुमार कोतवाल यांनी ४३ हजार ७८५ मते मिळविली. त्यांना ११ हजार १६१ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. चांदवड आणि देवळा या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात प्रादेशिकता आणि मतविभागणी यामुळे कोतवाल यांना हार पत्करावी लागली. चांदवड तालुक्यातील तीन प्रबळ उमेदवार िरगणात असल्याने त्यांच्यात मतविभागणी होऊन देवळा तालुक्यातील एकमेव प्रबळ उमेदवार भाजपचे डॉ. राहुल आहेर यांचा सहज विजय झाला. येवला मतदारसंघात तर काँग्रेसचे उमेदवार निवृत्ती लहरे यांनी प्रचार सुरू झाल्यावर थेट राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या तंबूत शिरकाव करून काँग्रेसचे पुरते नाव घालविले. लहरे यांनी उमेदवारी अर्ज माघारीच्या वेळीच जर भुजबळ यांना पाठिंबा जाहीर केला असता तर, या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवारच नसता. प्रचारास सुरुवात झाल्यानंतर लहरे यांनी माघार घेतल्याने किमान मतपत्रिकेवर काँग्रेसचे नाव तरी राहिले.
जिल्हय़ात इतरत्र मात्र तिसऱ्या ते पाचव्या क्रमांकासाठीच काँग्रेसला लढत द्यावी लागली. तिसऱ्या क्रमांकावर राहाव्या लागणाऱ्या उमेदवारांमध्ये संपत काळे (सिन्नर), रामदास चारोस्कर (दिंडोरी), उद्धव निमसे (नाशिक पूर्व), शाहू खैरे (नाशिक मध्य) यांचा समावेश आहे. चौथ्या क्रमांकावर अनिल आहेर (नांदगाव), जयश्री बर्डे (बागलाण), राजेंद्र मोगल (निफाड), दशरथ पाटील (नाशिक पश्चिम), पाचव्या क्रमांकावर डॉ. राजेंद्र ठाकरे (मालेगाव बाह्य), धनराज गांगुर्डे (कळवण), निवृत्ती लहरे (येवला), गणेश उन्हवणे (देवळाली) यांचा समावेश आहे.