कल्याण-डोंबिवली पालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक अरविंद मोरे यांना डेंग्यूची बाधा झाली असल्याचे पालिका रुग्णालयातील तपासणीनंतर पुढे आले आहे. गेले पाच दिवस मोरे तापाने आजारी होते. कल्याणमधील पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या शेजारीच ते राहतात. त्यांनी रुग्णालयात रक्त तपासणी करून घेतल्यानंतर त्यांना डेंग्यूची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी लीलाधर म्हस्के यांनीही मोरे यांना डेंग्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  कल्याण-डोंबिवली शहरात मोठय़ा प्रमाणात नियमित, अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. रस्ते खणून ठेवण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी पाण्याचा वापर होत असल्याने शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. पालिकेकडून नियमित धूर फवारणी होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. धूरफवारणीची काही कंत्राटे ही काही लोकप्रतिनिधींची असल्याचे बोलले जाते. गेल्या दोन महिन्यांत दीडशेहून अधिक जणांना डेंग्यूची बाधा झाली आहे.