आपला आमदार भ्रष्टाचारी आहे याची जाणीव निम्म्याहून अधिक मुंबईकरांना मतदान करतानाच होती. मात्र तो ‘नाममात्र भ्रष्टाचारी’ आहे, असे सुमारे ६८ टक्के नागरिकांना वाटते!!! मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा प्रजा फाऊंडेशनने मांडला असून त्यात या जाणिवा प्रकट झाल्या आहेत. मुंबईतील ३६ आमदारांची कामगिरीच्या आधारावर क्रमवारी लावण्यात आली असून पहिल्या दहा आमदारांमध्ये काँग्रेसचे पाच, मनसेचे दोन, भाजपचा एक, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि शिवसेनेच्या एका आमदाराचा समावेश झाला आहे. मुंबईत गेल्या कित्येक वर्षांपासून सत्ता असूनही शिवसेनेच्या आमदारांना म्हणावा तितका प्रभाव पाडता आला नाही, असा या अहवालाचा सूर आहे.
‘प्रजा फाऊंडेशन’ने आमदारांकडून विधिमंडळात विचारले जाणारे प्रश्न, त्यांचा दर्जा, विधिमंडळाच्या कामकाजातील सहभाग, त्यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी, भ्रष्टाचार, मतदार संघात केलेली विकासकामे आणि स्थानिक जनमत याच्या आधारे मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी हे मूल्यमापन केले जात असून यंदाचा अहवाल या फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त निताई मेहता यांनी मंगळवारी जाहीर केला. मुंबईत ३६ आमदार असले तरी त्यातील चार मंत्र्यांना वगळून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
मुंबईतील ५० टक्के आमदारांवर फौजदारी खटले दाखल आहेत. त्यातील १५ जणांवर २००९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत, तर १० आमदारांवर नव्याने गुन्हे दाखल झालेत. गेल्या पाच वर्षांत मुंबईतील विविध समस्यांबाबत सर्वपक्षीय आमदारांनी तब्बल ४०,२२० प्रश्न विधिमंडळात मांडले. त्यातील १२ टक्के म्हणजेच ४९३३ प्रश्न एकटय़ा बाळा नांदगावकर यांनी विचारले. आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणण्यातही नांदगावकरच आघाडीवर असून त्यांनी तब्बल ८ कोटी ८२ लाख निधी मतदारसंघात खर्च केला आहे, तर बाबा सिद्दिकी यांनी सर्वात कमी ६.९२ कोटींचा निधी मतदार संघात वापरला. मुंबईकरांचे प्रश्न सभागृहात मांडण्याबरोबरच सदनाच्या कामकाजात भाग घेणाऱ्या आमदारांमध्ये मधुकर चव्हाण आणि रवींद्र वायकर अव्वल असून सर्वात कमी उपस्थिती कृपाशंकर सिंह आणि प्रकाश मेहता यांची आहे.