शेजाऱ्यांशी झालेल्या वादामुळे त्यांना धडा शिकवण्याचा एका तरुणाचा प्रयत्न त्याच्याच अंगाशी आला आहे. शेजाऱ्यांचा घरात शस्त्र ठेवून त्यांना दहशतवादी ठरविण्याचा या तरुणाचा प्रयत्न होता. पण कुर्ला रेल्वे पोलिसांनी त्याला शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे.
चहाची टपरी चालविणारा फैय्याज खान (३२) हा तरुण भेंडी बाजार येथे राहतो. त्याचे कुटुंब उत्तर प्रदेशातील संत कबीर जिल्ह्य़ातील एका गावात राहतात. या गावातील शेजाऱ्यांचा फैय्याजच्या कुटुंबियांशी वाद होता. त्या वादातून एकदा फैय्याजच्या वडिलांना मारहाण देखील झाली होती. त्याचा सूड उगविण्यासाठी फैय्याजने एक अनोखी योजना आखली. या शेजाऱ्यांच्या घरात शस्त्र आणि काही आक्षेपार्ह छायाचित्रे ठेऊन त्यांना दहशतवादी ठरवायचे अशी त्याची योजना होती. नंतर पोलिसांना त्याबाबत माहिती देऊन शेजाऱ्यांना अडकविणार होता. ठरल्या योजनेप्रमाणे त्याने भेंडिबाजारातून एक पिस्तुल आणि काही काडतुसे मिळवली. एका बॅगेत चॉकलेटस ठेवून त्यात त्याने हे पिस्तुल लपवले. तसेच कुख्यात डॉन दाऊन इब्राहीमचे छायाचित्र आणि उर्दुभाषेतील मजकूर असलेला कागदही सोबत ठेवला. रविवारी सकाळी गोरखपूर एक्सप्रेसने तो गावी जाण्यासाठी निघाला होता. परंतु कुर्ला रेल्वे पोलिसांनी त्याची बॅग तपासण्यासाठी मागितली. आपण पकडले जाऊ या भितीने तो पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या बॅगेतून एक पिस्तुल आणि काडतुसे तसेच ही आक्षेपार्ह छायाचित्रे सापडली. चौकशीत त्याची ही योजना उघड झाली.