टंचाई…पाणी, गॅस आणि नियोजनाची
राज्यात वीज निर्मितीत मोठी घट काही दिवसात झाली असून येत्या काही दिवसात यात अधिक भर पडणार आहे. पाणीटंचाईमुळे परळी येथील दोन संच बंद झाले असून येत्या काळात येथील सर्वच संच बंद होण्याची शक्यता आहे. विजेची मागणी भरून काढण्यासाठी कोराडी येथील नवीन संच लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या जोरदार हालचालींना वेग येणार आहेत. परळी येथील काही अधिकारी व कर्मचारी कोराडी येथील नवा संच सुरू करण्यासाठी पुढील काही महिने व्यस्त राहण्याची शक्यता आहे.
 पारस येथील एक संच दुरुस्तीसाठी बंद होता. तो पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. भुसावळ येथे कोळशाचे नियोजन नसल्याने येथे स्थापित क्षमतेपेक्षा कमी विजेची निर्मिती होत आहे. पाणी, गॅस व नियोजनाच्या टंचाईमुळे राज्य वीज भारनियमन येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे. राज्यात महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पांची स्थापित वीज निर्मितीची क्षमता सुमारे ६ हजार ९८० मेगाव्ॉट आहे, पण आज औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून सुमारे २५ टक्के कमी वीज निर्मिती होत होती. राज्यात सद्यस्थितीत ५ हजार ३०१ मेगाव्ॉट विजेची निर्मिती होत आहे. पाणीटंचाईमुळे परळी येथील पाच संचांपैकी दोन संच बंद करावे लागले आहेत. त्यामुळे सुमारे ४६० मेगाव्ॉट वीज निर्मिती ठप्प झाली, तर इतर तीन संच कमी क्षमतेने सुरू असल्याने सुमारे ११० मेगाव्ॉट कमी विजेची निर्मिती परळीत होत आहे. येत्या काळात येथील सर्व संच पाण्याअभावी बंद करावे लागल्यास येथील कोळसा भुसावळ येथील संचात वर्ग करण्यात येईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
भुसावळ येथे कोळशाचा पुरेसा साठा नसल्याने स्थापित क्षमतेपेक्षा कमी विजेचे उत्पादन करावे लागत आहे. काही तांत्रिक कारणांनी भुसावळ येथील बंद असलेले दोन संच तात्काळ सुरू करून उत्पादन कायम ठेवण्यात महानिर्मिती प्रयत्न करणार आहे. पारस येथील २५० मेगाव्ॉटचा एक संच दोन दिवसांपूर्वी तांत्रिक कारणांमुळे बंद करावा लागला होता. तो आज सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, येत्या काळात कोराडी येथील नवीन संच लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या जोरदार हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत. परळी येथील काही अधिकारी व कर्मचारी कोराडी येथील नवा संच सुरू करण्यासाठी पुढील काही महिने व्यस्त राहण्याची शक्यता आहे.
वीज निर्मिती घटल्याने राज्यातील भारनियमनात वाढ झाली नसल्याचा दावा महावितरण कंपनीने केला आहे. राज्यात वीज निर्मितीत मोठी घट निर्माण झाल्यास राज्यात भारनियमन नसलेल्या ए, बी, सी व डी या वर्गवारीतील सव्वा तीन ते साडेपाच तास भारनियमन करण्याचा विचार सुरू झाला आहे, पण तूर्तास त्याची अंमलबजावणी नसल्याची माहिती मिळाली. उरण आणि दाभोळ येथे गॅस टंचाईमुळे प्रकल्पातून वीज निर्मिती घटली आहे. पाणी, गॅस व नियोजनाच्या टंचाईमुळे राज्य वीज भारनियमन येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे.