ठाकुर्लीतील हनुमान मंदिर ते म्हसोबानगर झोपडपट्टी दरम्यानचा तीनशे ते चारशे मीटरचा रस्ता रूंदीकरण करण्याचा कार्यक्रम पालिका प्रशासनाने हाती घेतला आहे. या रस्ता रूंदीकरणामुळे डोंबिवलीतील बहुतेक वाहने ठाकुर्लीतील रस्त्याने कल्याणकडे जाऊ शकतील. कल्याणकडे जाण्यासाठी चार रस्ता, इंदिरा चौक, टिळक चौक भागात वाहनांच्या ज्या रांगा लागतात. त्यामधील बहुतेक वाहने ठाकुर्ली रस्त्याने गेल्यास डोंबिवलीतील वाहतुकीचा भार कमी होण्यास साहाय्य होणार आहे.
या रस्ता रूंदीकरणाच्या पहिल्या टप्प्यात या भागातील गटारे तयार करण्याची कामे पालिकेने सुरू केली आहेत. या भागात रस्त्यावर सात ते आठ झाडे, इमारतींच्या संरक्षक भिंती आहेत. त्या सोसायटी चालकांनी स्वत:हून काढून टाकण्यास सुरूवात केली आहे.
भाजपचे स्थानिक नगरसेवक श्रीकर चौधरी यांच्या प्रयत्नामुळे नागरिकांनी पालिकेला सहकार्याचा हात पुढे केला आहे.
रेल्वेचा विरोध
रेल्वेच्या जागेवर वसलेल्या म्हसोबानगर झोपडपट्टीतून रस्ता तयार करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेला मध्य रेल्वे प्रशासन  जमिन देण्यास तयार नाही. त्यामुळे वळण रस्त्याचा प्रस्ताव अंमलात आणण्यात येत आहे. पालिकेच्या विकास आराखडय़ात म्हसोबानगर झोपडपट्टीतून ३० फुटी रस्ता प्रस्तावित आहे. या रस्त्यावर गाळे, इमारती, चाळी असल्याने या रस्त्याचा विकास करणे पालिकेला शक्य होत नव्हते. चार महिन्यांपूर्वी पालिकेच्या नगररचना विभागाने ठाकुर्लीतील विकास आराखडय़ातील प्रस्तावित तीस फुटी रस्त्यावरील अतिक्रमणांचे सीमांकन निश्चित केले होते. पावसाळ्यात अतिक्रमणा विरूध्द कारवाई करणे शक्य नसल्याने व त्यानंतर विधानसभा निवडणुका आल्याने ही कारवाई पालिकेकडून पुढे ढकलण्यात येत होती. पालिका, पोलिस आणि नगरसेवक चौधरी यांनी स्थानिक रहिवाशांना रस्त्याचे महत्व पटून सांगितल्याने या रस्ते कामाला सहकार्य देण्याची तयारी नागरिकांनी केली आहे. अतिक्रमणामुळे हा रस्ता पंधरा ते वीस फूट रूंद आहे. विस्तारीकरणामुळे हा रस्ता काही प्रमाणात मोठा होणार आहे.
अशी जातील वाहने
* कल्याणमधून बाहेर पडून डोंबिवलीत येणारी वाहने टाटा नाका, मानपाडा पोलीस ठाणे मार्गे न जाता पत्रीपुला कडून कुष्ठरूग्ण वसाहत, नेतिवली रस्त्याने ठाकुर्लीत येतील.
* तेथून पुढे ती म्हसोबा झोपडपट्टी रस्ता, हनुमान मंदिर, ठाकुर्ली रेल्वे फाटक किंवा जलाराम मंदिर, स. वा. जोशी शाळा मार्गे डोंबिवलीत येतील.
* ठाकुर्ली रेल्वे फाटकाजवळ नियोजित उड्डाण पूल झाल्यावर डोंबिवली पश्चिमेत जाणारी वाहने फडके रस्ताकडे न जाता गणेशनगर, भावे सभागृहाकडून पश्चिम भागाकडे निघून जाणार आहेत.