महापालिकेला सुमारे तीन कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या महानगर गॅस आणि टाटा पॉवर कंपनीसह पाच कंपन्यांना खोदकामास मनाई करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी पाइप गॅसच्या प्रतीक्षेत असलेल्या तब्बल सहा हजार ग्राहकांचे अर्ज रखडले आहेत.
एम-पूर्व विभागातील जी. एम. लिंक रोडवर ‘टाटा पॉवर’ आणि ‘महानगर गॅस’ यांना पालिकेने ३४४० मीटर लांब रस्ता खोदण्याची परवानगी दिली होती. परवानगी मिळताच या कंपन्यांनी खोदकाम केले आणि आपापले काम उरकून घेतले. दरम्यानच्या काळात टय़ुलिप टेलिकॉम, रिलायन्स कम्युनिकेशन आणि टाटा टेली सव्‍‌र्हिसेस या कंपन्यांनीही खोदलेल्या खड्डय़ांचा फायदा उठवत आपलेही काम करून घेतले. पालिकेची परवानगी न घेताच या कंपन्यांनी कामे उरकून घेतली. यामुळे पालिकेला २ कोटी ९७ लाख ९० हजार रुपये तोटा झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पालिका आयुक्तांनी या पाच कंपन्यांना खोदकामासाठी परवानगी देऊ नये, असे परिपत्रक सर्व विभाग कार्यालयांना पाठविले आहे.
उपरोक्त तीन कंपन्या वरील रक्कम भरत नाहीत, तोपर्यंत महानगर गॅस आणि टाटा पॉवर या कंपन्यांची अनामत रक्कम त्यांना देऊ नये, असे स्पष्ट निर्देश या परिपत्रकात देण्यात आले आहेत. गॅस नोंदणीसाठी मुंबईभरातून सुमारे सहा हजारांपेक्षा अधिक अर्ज महानगर गॅस कंपनीकडे आले आहेत. परंतु पालिकेकडून खोदकामास परवानगी मिळत नसल्यामुळे ग्राहकांना नवी गॅस जोडणी देणे महानगर गॅस कंपनीला शक्य झालेले नाही.