तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या करंजा या मच्छीमारांच्या सतरा हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावातील अनेक वर्षांपासून सुरू असलेली पिण्याच्या पाण्याची वणवण संपुष्टात येणार आहे. सिडकोने या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी हेटवणे धरण्यातून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सुमारे ७२ लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. मात्र यासाठी ग्रामस्थांना एक वर्षांची वाट पाहावी लागणार आहे. या गावाला सिडकोकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. गावातील विहिरींमध्ये टँकरचे पाणी सोडण्यात येते. पाणी प्रश्न मार्गी लागावा म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोटय़वधी रुपये खर्च करून अनेक योजना राबविण्यात आल्या. मात्र पाण्याचा प्रश्न काही सुटला नाही. पंधरा दिवसांतून मिळणारे पाणी ग्रामस्थांना साठवून ठेवावे लागते. याच साठवलेल्या पाण्यामुळे ग्रामस्थांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो. पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी याकरिता ग्रामस्थांनी व महिलांनी अनेकदा उरण पंचायत समितीवर मोर्चे, घेराव टाकून आंदोलनेही केली आहेत. सिडकोने पाणीपुरवठा करावा याचा पाठपुरावा केल्याने सिडकोच्या वतीने करंजा परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी द्रोणागिरी नोड परिसरातील नवी मुंबईच्या हेटवणे धरणातील खोपटा परिसरातून साडेतीन किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोच्या कार्यकारी अभियंता एस.एम. पाटील यांनी दिली आहे. या योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे.