महाविद्यालयीन तरुणांना अमली पदार्थाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी मुंबई पोलिसांनी ड्रग्ज फ्री कॅम्पस ही मोहीम सुरू केली आहे. तसेच इंटरनेटवरील अमली पदार्थाचे व्यवहार रोखण्यासाठी ऑनलाइन ट्रेडिंग सेलचीही स्थापना करण्यात आली आहे.
अमली पदार्थाचा सर्वात जास्त धोका हा महाविद्यालयीन तरुणांना आहे. ड्रग्ज माफियांनी तरुणांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे तरुणाईला अमली पदार्थाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी अमली पदार्थविरोधी शाखेने ही खास मोहीम सुरू केली आहे. याबाबत माहिती देताना अमली पदार्थविरोधी शाखेचे उपायुक्त नामदेव चव्हाण यांनी सांगितले की, आमचे मुंबईत एकूण चार युनिट्स आहेत. त्या प्रत्येक युनिटला महाविद्यालये विभागून देण्यात येणार आहेत. महाविद्यालयाच्या परिसरातील अमली पदार्थाचे व्यवहार रोखणे हा प्राथमिक उद्देश आहे. परंतु विद्यार्थ्यांना यातून बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत. या मोहिमेनुसार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य आणि पालक यांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. एखाद्या विद्यार्थ्यांचे वागणे बदलले तर त्याची माहिती पालक आणि शिक्षकांकडून घेतली जाऊन त्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. महाविद्यालय परिसरातील नाके, पानाच्या टपऱ्या किंवा अन्य ठिकाणी लक्ष ठेवले जाणार आहे. साध्या वेशातील पोलीसही महाविद्यालय परिसरात पाळत ठेवून असणार आहे. राष्ट्र सेवा योजनेतील विद्यार्थ्यांना अशा व्यवहारांची माहिती देण्यासाठी हेर बनवले जाणार आहे.
महाविद्यालय परिसरातून ही विषवल्ली समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण म्हणाले. अमली पदार्थाचे व्यवहार करणारे पेडलर्स म्हणजेच असे पदार्थ विकणारे महाविद्यालय परिसरात घुटमळत असतात. त्यांना या मोहिमेद्वारे लक्ष्य करून पकडले जाणार आहे.

ऑनलाइन ट्रेड सेल
बदलत्या काळात ड्रग्ज माफिया हायटेक झाले आहेत. अमली पदार्थाची खरेदी-विक्री ही ऑनलाइन केली जाते. त्यासाठी सांकेतिक भाषेचा वापर केला जातो. ते रोखण्यासाठी अमली पदार्थविरोधी शाखेने ऑनलाइन ट्रेड सेलची स्थापना केली आहे. या सेलचे पोलीस इंटरनेट आणि सोशल साइटवरली अमली पदार्थाच्या व्यवहारावर लक्ष ठेवणार आहेत. त्यांची सांकेतिक भाषा, देवाण घेवाणीची पद्धत आदी शोधून त्यावर कारवाई केली जाणार आहे. यासाठी या सेलच्या कर्मचाऱ्यांना सायबर सेल तज्ज्ञांकडून आणि मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून खास प्रशिक्षण दिले जाणार आहे, असेही चव्हाण म्हणाले. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी हे ड्रग्ज माफिया इंटरनेटचा वापर करतात. इंटरनेटद्वारे त्यांचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे. युवा पिढी त्याचा वापर करत असते. हे फार मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. त्यामुळे या नव्या ऑनलाइन ट्रेडिंगसेलला हे इंटरनेटवरील जाळे उद्ध्वस्त करावे लागणार आहे.