पर्यावरण संवर्धन आणि जल प्रदूषण रोखण्याच्या हेतूने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा २०१३’ अंतर्गत घरगुती गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्यांना येथे आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात आले.
सर्वसामान्यांमध्ये पर्यावरणविषयक जागृती निर्माण करण्याचा एक भाग म्हणून ‘इको फ्रेंडली गणेशोत्सव’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. शहरातील दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्राच्या सभागृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात औरंगाबाद विभागातून जळगावच्या सुनीता महाजन यांना बक्षीस देण्यात आले.
दीपस्तंभचे प्रा. यजुर्वेद्र महाजन यांच्या हस्ते महाजन बक्षीस प्रदान करण्यात आले. महाजन यांनी पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करून गणेशोत्सवासाठी केलेली सजावट बक्षिसासाठी पात्र ठरली. या वेळी उपस्थितांकडून गणेशोत्सवातून पर्यावरणाविषयी प्रबोधन करण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. या वेळी सुनीता महाजन यांचे पती सोमनाथ महाजन यांच्यासह ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक मुकुंद कानिटकर, स्थानिक वितरण व्यवस्थापक अनिल सोनवणे आणि  दीपस्तंभच्या सुनीता भोळे उपस्थित होत्या.