अचानक इमारतीखाली पोलिसांची गाडी थांबते.. गाडीतून उतरलेले ‘अमली पदार्थविरोधी पथका’चे पोलीस इमारतीतल्या एका वकिलाच्या घरात शिरतात. या वकिलाच्या आईने घरात अंमली पदार्थ ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळालेली असते. हे ऐकून त्या वकीलाच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसतो. पण पोलिसांना त्यांचे काम करणे भाग होते. घराची कसून झडती घेतली गेली. आईचीही चौकशी झाली. पण काहीच निष्पन्न झाले नाही. पोलीस निघून गेले. पण या मानहानीकारक  प्रकाराने कोलमडलेले ते कुटुंब अजून सावरलेले नाही..!
अमली पदार्थविरोधी पथकाला माहिती मिळाल्यानंतर ते अशा प्रकारे छापे मारून तपासणी करत आहेत. अमली पदार्थ विभागाला मिळणाऱ्या अशा अनेक खबरा प्रत्यक्षात बोगस असल्याचे निष्पन्न होत आहे. पोलिसांसाठी ही मोठी डोकेदुखी बनली आहे.
अमली पदार्थाच्या विरोधात अमली पदार्थविरोधी पथकाने तीव्र मोहीम उघडली आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे. याबाबत माहिती देण्यासाठी जनतेला आवाहनही करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसादही मोठा मिळतोय. परंतु पोलिसांकडे येणाऱ्या माहितीपैकी ७५ टक्के माहिती खोटी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर आम्ही धडक कारवाई सुरू केली आहे. पण आता त्याचा गैरफायदा घेतला जाऊ लागला आहे. दूरध्वनी अथवा निनावी पत्राद्वारे वा कधीकधी नावानिशी अर्ज करून माहिती दिली जाते. पोलीस जाऊन तपासणी करतात पण काहीच आढळत नाही, अशी माहिती अमली पदार्थविरोधी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त काळे यांनी दिली.
एखाद्याकडे अमली पदार्थ आहे, तो त्याची विक्री अथवा सेवन करतो अशी माहिती पोलिसांना दिली की लगेच पोलीस जाऊन कारवाई करतात, हे लोकांना समजले आहे. त्यामुळेच अनेक जण खोडसाळपणे खोटी माहिती देत आहेत. एखाद्याला धडा शिकवायचा असले, पूर्ववैमनस्य असेल, मानसिक त्रास द्यायचा असेल तर असा डाव टाकला जातो. शेजाऱ्यांना, कार्यालयातील सहकाऱ्यांना त्रास देण्यासाठी अशा प्रकारे तक्रारी केल्या जात आहेत.
* मुलाला वेश्यागमनापासून रोखण्यासाठी
अशाच एका प्रकरणाबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, एका श्रीमंत व्यक्तीचा मुलगा एका विशिष्ट हॉटेलात वेश्यागमनासाठी जात असे. या व्यक्तीने आपल्या मुलास खूप समजावले. पण तो ऐकत नव्हता. त्यामुळे त्याने हा उपाय केला. या हॉटेलात अमली पदार्थ पुरवले जातात, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी छापा घालून हॉटेलाची तपासणी केली. पण त्यांना काही सापडले नाही. नंतर ही तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाले.
*  जावयाला धडा शिकविण्यासाठी
एका इसमाचा जावई त्याच्या मुलीला नीट वागणूक देत नव्हता. त्यामुळे घरात भांडणे होत होती. मध्यस्थांनी खूप प्रयत्न केले. पण जावई ऐकत नव्हता. एक दिवस अचानक त्याच्या कार्यालयात पोलीस गेले आणि त्याला तपासणीसाठी नेले. त्याची भरपूर नाचक्की झाली. पण नंतर काहीच सापडले नाही. नंतर सासऱ्यानेच हा बनाव रचल्याचे उघड झाले.
* घर रिकामे करण्यासाठी
एका मोक्याच्या जागेवर असणाऱ्या झोपडीत जाऊन पोलिसांनी झडती घेतली. येथे अमली पदार्थ विकले जातात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पण शेवटी काहीच सापडले नाही. या झोपडीच्या शेजारी उभ्या रहात असलेल्या इमारतीच्या बिल्डरने ही झोपडी हटविण्यासाठी त्यांना त्रास देण्यासाठी हा मार्ग अवलंबला होता. माहिती देणाऱ्याचे नाव असेल तर नंतर त्याला आम्ही विचारतो. पण मला संशय होता म्हणून सांगितले, असे सांगून तो हात वर करतो. त्यामुळे आम्ही हतबल असतो असे पोलिसांचे म्हणणे आहे.
*  कारवाईत वाढ..
अमली पदार्थविरोधी विभागाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे कारवाईत मोठी वाढ झाली आहे. जानेवारी २०१४ ते जुलै २०१४ या काळात अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांविरोधात एकूण ४,७०८ गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल ७ हजार लोकांना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ हजारांनी वाढ झाली आहे. तर अमली पदार्थ विकणाच्या एकूण ७५ गुन्हे दाखल करण्यात आले असून ९६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २८२ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेल्यामंध्ये २० परदेशी नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती काळे यांनी दिली.