महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. या घटनांची तात्काळ तड लावता यावी, यासाठी दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या प्रत्येक जिल्ह्य़ात कौटुंबिक न्यायालये सुरू करण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी येथे केली. डोंबिवलीत अशा स्वरूपाचे न्यायालय सुरू व्हावे, यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जातील, असेही त्या म्हणाल्या.
शिवसेना कल्याण जिल्ह्य़ातर्फे डोंबिवलीत महिला अत्याचारविरोधी संघर्ष मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी अनिता बिर्जे, मीना कांबळी, गोपाळ लांडगे, पुंम्डलिक म्हात्रे, प्रभाकर चौधरी, अ‍ॅड. रेखा कांबळी, अ‍ॅड. तृप्ती पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. तडीपार झालेले गुंड सुटतात आणि असे गुन्हे पुन्हा वाढीस लागतात. विनयभंग, बलात्काराचे गुन्हे अजामीनपात्र होण्यासाठी कायद्यात बदल करावेत. या गुन्ह्य़ातील आरोपींना भर चौकात फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी शासनाकडे शिवसेनेतर्फे पाठपुरावा करण्यात येईल. परप्रांतीय मंडळी मोठय़ा संख्येने मुंबईत येत असून येथे गुन्हे करून पुन्हा ती त्यांच्या प्रांतात पळून जातात. हे प्रकार रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. अशा गुन्ह्य़ातील खटल्याचा निकाल सहा महिन्यांत लागलाच पाहिजे. यासाठी कल्याण डोंबिवलीसह जिल्हा स्तरावर कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यासाठी शिवसेनेतर्फे प्रयत्न केले जातील, असे गोऱ्हे यांनी सांगितले.